top of page

|| अध्यात्माचे विद्यापीठ ||

Updated: Oct 17, 2020

-वै. ह. भ. प. सुधाकर शेंडगे.

आपला हिंदू धर्म, धर्माच्या आधारावर टिकून आहे कारण यासाठी आपल्या ऋषीमुनींनी नंतर संतांनी या अध्यात्माची इमारत बळकट केली  संत कृपा झाली | इमारत फळा आली ||

ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया ||

नामा तयाचा किंकर | तेणे केला हा विस्तार ||

जनार्दन एकनाथ | खांब दिला भागवत ||

तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||

अशी ही भक्कम इमारत अध्यात्माचे जागतिक विद्यापीठच ठरले. पंढरपूर तीर्थक्षेत्र हे विद्यापीठाचे मुख्य केंद्र आहे. व याचे प्रथम प्रवर्तक संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे असून आळंदी क्षेत्र हे ज्ञानपीठ ठरले. सातशे वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथांच्या अधिपत्याखाली संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले. कारण हा संप्रदाय त्या पूर्वीपासूनच सुरू होता. ज्ञानदेवांच्या कुळी व संत नामदेवांच्या कुळी पंढरीची वारी अखंड चालू होती. तेराव्या शतकात संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, नामदेवराय, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, चांगदेव, परीसा भागवत आदि संतांची मांदियाळी भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र आली व त्या सर्वांनी हे विद्यापीठ नियोजनबद्ध चालविले. त्याकाळी कर्मकांड व धर्ममार्तंडांचे साम्राज्य होते. जातिभेद तर होताच. परंतु स्त्री आणि शूद्रांना समाजात मान नव्हता. अशा प्रसंगी या संतमंडळींनी या संप्रदायात सर्व जाती धर्मातील उच्च-नीच स्त्री व आबालवृद्धांना आपल्यात सामावून घेतलं. आणि हे विद्यापीठ सर्वांसाठी विश्वविद्यालय झाले. सर्व संतांनी मिळून या विद्यापीठाची पुनर्बांधणी केली. यामध्ये मुख्य कार्य पंढरीची वारी याला विशेष महत्त्व होते. कारण भूवैकुंठ पंढरपूर येथे निर्गुण-निराकार असलेले परब्रम्ह प्रथम विटेवर सगुण रूपात प्रकटले. 

गुणा आला विटेवरी | पितांबर धारी सुंदर ||

या परमात्म्याने मत्स्य, कूर्म आदि अनेक अवतार घेऊन दुष्टांचा संहार केला व भक्तांचे रक्षण केले. तसेच लोप पावलेला भागवत धर्म पुन्हा प्रस्थापित केला. परंतु श्री पांडुरंग अवतारात भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ सेवे मुळे भुलून तो येथेच विटेवर, दोन हात कटेवर ठेवून, आज अठ्ठावीस युगे तो उभा आहे. या अवतारात दुष्टांचा नाश न करता सर्व जड जीवांचा उद्धार करणे हेच अवतार कार्य महत्त्वाचे ठरले. म्हणून चतुर्भुज पैकी चक्र व गदा ही आयुधे बाजूला ठेवून, फक्त उल्पाचे प्रतिक शंख आणि भक्तांची पूजा करण्यासाठी कमळ ही दोनच हस्त भूषण ठेवली. 

हा देव भावाचा व भक्तीचा भुकेला आहे. नुसत्या तुळशी बुक्क्यावर हा भक्तांवर कृपा करतो. त्याच्या बदल्यात इतर देवदेवतांची प्रमाणे भक्तांकडून काहीही मागत नाही. व नवस फेडला नाही तरीही भक्ताला त्रास देत नाही. कारण हा सर्व देवांचा ही देव आहे. उलट केवळ नामस्मरणाने हा वैकुंठ सोडून भक्ताघरी लक्ष्मीसहित वास्तव्य करतो व त्यांची घर कामेही करतो. 

उच नीच काही नेणे भगवंत | तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ||हा जनाबाई संगे दळू  कांडू लागतो. नामया हातीचा नैवेद्य खातो. चोखोबाची गुरे ओढतो. कबीराचे शेले विणतो. गोरा कुंभाराची मडकी घडवितो. नरहरी सोनारा संगे फुंकू लागतो. सावता माळ्याच्या मळ्याची राखण करतो. एकनाथांच्या घरी पाणी वाहतो. तुकोबारायाच्या वह्या पाण्यातून कोरड्या वर काढतो. अशा प्रकारची सर्व कार्य तो भक्तीच्या प्रेमाला भुलून मोठ्या आनंदाने करतो. आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सतत मागे पुढे उभा राहून त्यांची संकटे दूर करतो. भक्तांची अशी सेवा इतर कोणतेही देव-देवता करीत नाहीत. ते आपल्या भक्ताकडूनच सेवा करून घेतात. व वर्म किंवा नवस चुकला की कोपतात. बरे हे भक्ताला जे काही देतात, ते श्री विठ्ठला कडूनच घेऊन देतात. म्हणून हा पंढरीचा राणा सर्वश्रेष्ठ आहे आणि हा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. 

या अध्यात्माच्या विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी गुरु करून घेण्याची आवश्यकता असते. भक्तांनी फक्त तुळशीची माळ गळ्यात घालणे, गोपीचंदनाचा टिळा लावणे, मद्यमांस यांचे सेवन न करणे, ज्ञानोबा तुकारामचा गजर करणे हाती टाळ, पताका घेऊन पंढरीची पायी वारी करणे, सत्संग करणे, रामकृष्णहरी हा बीजमंत्र सतत चालू ठेवणे असे सर्वसाधारण व अत्यंत सुलभ नियम आहेत. या प्रक्रियेमुळे म्हणजेच भक्तीमुळे सर्वांच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य निर्माण होते त्यामुळे काम, क्रोध, मत्सर, लोभ, अहंकार इत्यादी शरीरातील शत्रूंचा नाश होतो व दया-क्षमा-शांती प्रकट होते. 

दया क्षमा शांती तेथे देवाची वसती |   अशी विश्व भावना निर्माण होते 

जे जे देखे भूत | ते ते मानिजे भगवंत |

हीच या विद्यापीठाची मुख्य डिग्री होय. येथे जातीचा दाखला, प्रवेश फी, देणगी यांची गरज नाही 

यारे यारे लहान थोर | हो का भलते नारी नर ||


वारकऱ्यांचे मुद्रा अलंकार1 तुळशीची माळ : तुळस ही अति पवित्र व औषधी वनस्पती आहे. कारण ती आपल्या पानांमधून 24 तास प्राणवायू बाहेर सोडते. त्यामुळे ती दरवाज्यात ठेवल्यास आरोग्यदायक ठरते. तिची माळ घालणे  म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवणे होय. म्हणजे हा देह परमेश्वराच्या सेवेत व संतांच्या संगतीत घालविणे व मुक्ती मिळविणे. यासाठी संसाराचा त्याग करण्याची जरुरी नाही. असोनी संसारी जीवे वेगु करी |2. गंध : गोपीचंदनाचा टिळा हा वारकऱ्यांचे सौभाग्याचे लेणे आहे मथुरेत गोपींनी ज्याठिकाणी भगवंता बरोबर रासक्रीडा केली, त्या ठिकाणची ही पवित्र माती आपल्या कपाळी कुंकवा प्रमाणे दररोज लावावी आणि तुळशी माळेचे मंगळसूत्र सतत गळ्यात मिळवावे म्हणजे मी पांडुरंगाची अध्यात्मिक पत्नी आहे असे मानणे.

3 बुक्का : पूर्वीपासून आयुर्वेदिक व अनेक सुगंधी मसाले वापरून औषधी बनविण्याची पद्धत आहे याचे शास्त्रीय व आरोग्यदायक कारण असे की, सर्व वारकरी आषाढी कार्तिकी यात्रेमध्ये पायी चालत येतात. पावसाळ्याचे दिवस असताना वारकऱ्यांच्या पायाला भेगा पडणे, चिखल्या होणे, जखमा चिघळणे, पाय सुजणे असे अनेक विकार होतात. त्याकाळी पालखी सोहळा सोबत औषध उपलब्ध नव्हते. ही सोय अलीकडे वीस पंचवीस वर्षात झाली आहे आणि पंढरीचे वारकरी एकमेकांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करतात. ही  रूढीच आहे. त्यावेळी कपाळी आयुर्वेदिक बुक्का लावलेला असल्याने रोगाचा प्रादुर्भाव होत नव्हता.


4 पताका :  भागवत धर्माची शिकवण म्हणजे भगवी पताका होय कारण भगवा रंग हा वैराग्याचे लक्षण आहे. आणि ही भगवत पताका खांद्यावर घेऊन वारकरी जेव्हा विठ्ठल नामाचा गजर करतात तेव्हा कळीकाळाला दरारा बसतो. साक्षात यम देखील दूर पळून जातो. 


5. टाळ : टाळांचा मंजुळ ध्वनी  ह्रद्यसंगीत बनते. अभंग म्हणताना तसेच मृदंगाची यांच्या संगमाने प्रेम भरीत भजन गायले असता परमेश्वर सुद्धा तुमच्या भजनात नाचू लागतो डोलू लागतो. कारण ही सर्व वाद्ये सत्वगुणी आहेत. डफ, तुणतुणे, हलगी ही तमोगुणी वाद्य आहेत. म्हणून ती शृंगारिक असतात. म्हणून भजनात टाळ, वीणा, पखवाज बासरी अवश्य असावी.

६. सत्संगती : एवढे सर्व करीत असताना सत्संगती ची खरी आवश्यकता आहे कारण सत्संग शिवाय भगवत्प्राप्ती दूर आहे अनेक जन्माची पुण्याई असल्याशिवाय विठ्ठलाचे नाम ओठावर येत नाही व भक्तीची आवडही निर्माण होत नाही.  बहुत सुकृताची जोडी | म्हणुनी विठ्ठली आवडी

 एवढे सर्व नियमांचे पालन केल्याने मनुष्य जन्माचे सार्थक होते व परमेश्वर प्राप्ती होते. मग मुखी नाम हाती मोक्ष अशी अवस्था प्राप्त होते. हा देह सत्कारणी लागतो. म्हणूनच परमेश्वराने पशुपक्षी, कीडे, जलचर प्राणी निर्माण केले. त्यांचे जीवन म्हणजे आहार, निद्रा, भय, आणि मैथुन असेच असते. परंतु या देहात परमेश्वर प्राप्ती करता येत नाही. म्हणून परमेश्वराने बुद्धी आणि वाणी देऊन मनुष्यप्राणी जन्माला घातला. याच देहात तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आणि परमेश्वर प्राप्ती चे सर्व ज्ञान मिळवू शकतो. असा दुर्लभ मनुष्य जन्म पशुपक्षांचे प्रमाणे वाया न घालविता भगवंत चरणी लावावा यासाठी आळंदी पंढरी पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यावर उच्च शिक्षणाचे मानवाला धडे मिळतात. समाधान प्राप्त होते. कळी काळावर मात करण्याची संधी प्राप्त होते. एकमेकांवर प्रेम व परस्परांस मदत करण्याने परमेश्वराचीच सेवा घडते. या वारी मधून अनेक गोष्टींची शिकवण मिळते ती इतर कुठल्याही विद्यापीठात पैशाने मिळत नाही. येथे प्रेमाची उत्कटता पाहिजे. 

हा सुखसोहळा देवाशी दुर्लभ |आम्हा सुलभ चोखा म्हणे ||136 views0 comments

Comentários


bottom of page