- वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
आपली भारतीय संस्कृृती व परंपरा ही जगामध्ये अग्रगण्य ठरली आहे. कारण भारतीय संस्कारात वाढलेली आपली पिढी ही मानवतेच्या एका मर्यादेत सुदृढ, सुसंस्कृत, विनम्र, सेवाभावी, गुणवान, आज्ञाधारक, प्रेमळ, सात्विक आणि निर्भर अशीच घडत आली आहे. आपली भारतीय स्त्री ही आदर्श माता, आदर्श पत्नी व आदर्श कन्या म्हणूनच प्रचलित होती. त्यामुळेच वधु-वरांचे सांसारिक जीवन सुखमय होत असे. परंतु हल्लीच्या तरूण पिढीकडे पाहता असे दिसते की, त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीची गडद छाया पडलेली आहे. त्यातून टी.व्ही., सिनेमा, मोबाईल या प्रसार माध्यमाद्वारे त्यांचे जीवन अधिक विस्कळीत झाल्याचे दिसते. त्यांची मानसिक अवस्था व वैचारिक दिशा चुकीच्या ध्येयाप्रत जाताना दिसते. प्रत्येक युवकाला वाटते आपल्याला जोडीदार म्हणून एखाद्या पिक्चरमधल्या नटीसारखी बायको असावी. सुंदर, देखणी व श्रीमंत असावी. त्याचप्रमाणे मुलींचीही अपेक्षा तशीच असते. सिनेमातील हिरो जसा असतो तद्वत आपला जीवनसाथी असावा. मग तो व्यसनी असला तरी त्याकडे त्या दुर्लक्ष करतील. अशा मृगजळाच्या मागे जावून पुढे त्यांना पश्चातापाची पाळी येते. वैवाहिक जीवन सुखी न होता दुःखी व शेेवटी घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. असे सर्वांच्याच बाबतीत घडते असे नाही. तरीपण आपण आपले आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
हल्ली काळया सावळया मुलींना बहुतेक मुले नाकारतात. मग ती पदवीधर असो वा सव्र्हिसला. अशा मुलींच्या मनाची अवस्था काय होत असेल? त्यात ती गरीब घरची असेल तर आणखीनच कठीण. समाजात असे चित्र सर्वत्र दिसत आहे. परंतु आता यावर आपण पालकानीच विचार करायला हवा. परमेश्वराने जन्मतःच जे रूप दिले आहे ते नाकारता येत नाही. परंतु अशा परिस्थितीत मुलींनी खचून जाण्याचे कारण नाही. कारण अशी अडचण लक्षात घेवूनच आपल्या संतांनी या समाजाला उपदेशपर अभंग रचना केली आहे व परमेश्वरानेही त्याचा अवलंब करून दाखविला आहे.
एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असल्यास ती व्यक्ती आपल्या अन्य कला-गुण अविष्काराने ते न्यून भरून काढते हा सृष्टिनियम आहे. मुलींच्या बाबतीत सावळा रंग ही नैराश्याची बाब जरी असली तरी अशा मुली विनम्र, गुणवान, प्रेमळ व इतरांच्यापेक्षा अधिक सरस असतात. त्या आपली छाप इतर कलाविष्काराने पाहून सर्वांची मने जिंकतात. याउलट रूपवान स्त्री अभिमानी असते, चंचल असते. संत नामदेवराय म्हणतात.
लावण्य सुंदर रूपाने बरवी | भक्ताच्या भजना नाश करी किंवा
सुंदर आणि पतिव्रता | सावधान होय श्रोता | पुराणिक तरी ज्ञाता | हे दुर्लभ जी दातारा|
यामध्ये सर्वच रूपवान स्त्रियांना दोषी ठरविण्याचा हेतु नसून समाजात दिसणारे चित्र त्यांनी उभे केले आहे. तेव्हा वाचकांनी याचा समर्पक अर्थच ध्यानी घ्यावा. पुढे ते म्हणतात.
कायारुप तिचे हीनवट अति | माऊली धन्य ती आहे नारी ||
तियेवरी मन कदापि नवजाये | भजना न होये कदा चळ ||
ऐसिये माऊली परउपकारी | घात न करी भजनाचा ||
नामा म्हणे तिचे चरण वंदावे | वदन पहावे माऊलीचे ||
ही कुरूप, काळी स्त्रीबद्दल किती उदात्त भावना व्यक्त केली आहे यावरून दिसून येते.
सावळया रंगाची वधु हीच पुरूषाला शोभते व सुंदर मुलापेक्षा चतुर मुलगाच स्त्रीला शोभतो मग त्याच्याकडे द्रव्य नसले तरी चालेल.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक परमात्मा पांडुरंग हा कोटी सूर्याच्या प्रकाशाहून अधिक तेजःपुंज आहे नव्हे नव्हे या सूर्याने पांडुरंगापासूनच तेज मिळविले आहे. परंतु असे असूनहि त्या परमात्याने निगुर्णातून भक्तासाठी सगुण रूप धारण केले. परंतु आपला सावळा रंग त्याने अधिक प्रभावीपणे दाखविला. त्याच्या त्या सावळ्या रंगाला सारे जग भुलले कारण ती सावळी मूर्ति म्हणजे शुध्द आणि पवित्र आहे. सावळा रंग सर्वाना आकर्षून घेतो. तो विलोभनीय आहे.
सावळे सुंदर रूप मनोहर | राहो निरंतर हृदयी माझे ||
संत ज्ञानेश्वर महाराज सावळया विट्ठलाचे वर्णन करतात.
सावळे परब्रम्ह आवडे या जीवा | मने मन राणिवा घर केले ||
काय करू सये सावळे गोवित | आपेआप लपत मन तेथे ||
बापरखुमादेवीवरू सावळी प्रतिमा | मने मनी क्षमा एक झाले ||
सावळिये बुंथी सावळिया रूपे | सावळिया स्वरूपे वेधियेले ||
काय करू गे माये सावळे न सोडी | इंद्रिया इंद्रिय जोडी एकतत्वे ||
कैसे याचे तेज सावळे अरूवार | कृष्णी कृष्ण नीर सतेजपणे ||
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे | सावळेची होणे यासी ध्याता ||
श्री पांडुरंगाची रूक्मिणी सावळी होती. परंतु सत्यभामा रूपवान होती तिला त्याचा अभिमान होता. त्यामुळे ती देवाला अंतरली. शुध्द आणि पवित्र म्हणजेच सावळे रूप होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रम्हरंध्रातील तेजोमय ज्योतीच्या सावळया तेजात सावळा श्रीहरीच आहे अशा हया श्यामवर्ण श्रीहरीच्या मनोहर मूर्तिवर माझे नितांत प्रेम आहे.
दिल को देखो चेहरा न देखो, चेहरोने लाखों को लुटा, दिल सच्चा और चेहरा झूठा
गुणमयी माया ही मनुष्याला भुलविण्यासाठी स्त्रीरूपाने प्रगट झाली आहे. व त्याच्यावर मात करण्यासाठी परब्रम्ह श्रीविट्ठलाने सावळे रूप धारण केले आहे. आणि तो भगवंत श्रीमंतापेक्षा भक्तीप्रेमाने भजन करणाÚया दरिद्री व्यक्तीची स्वतः सेवा करतो व त्यांचा उध्दार करतो.
सावळाच रंग तुझा करी जीवा बैचेन आणि नजरेत तुझ्या झालो गडे बंदिवान
सावळा वर बरा गौर वधूला सूरत से सीरत भली
रूपवान स्त्रीला अनेक शत्रू निर्माण होतात. रूपवती भार्या रिपुः |
असे अनेक दाखले देण्यासारखे आहेत. परंतु वधु-वर मेळाव्यात एकमेकांना योग्य असा साथीदार निवडण्यासाठी वरील गोष्टीचा विचार करणेकामी अतिशय गरजेचे व सुखसमाधानाचे ठरेल अशी माझी खात्री आहे. एकमेकांना समजून घेणे त्यासाठी संवाद साधणे व आपले भवितव्य उज्वल करणे हे पत्रिकेवर अवलंबून नसून आपल्या कर्तृत्वावर व आत्मविश्वावर अवलंबून आहे. आणि याचीच आता आवश्यकता आहे. मुलाचे कर्तृत्व व मुलीची गुणवत्ता हीच खरे सौंदर्य आहे आपण आत्मपरिक्षण करा व सुखी व्हा
काळया पाषाणातील पाण्यामध्येच स्वच्छ तळ दिसतो.
काळया मातीच्या जमिनीतच सुपीक अन्नाची पैदास होते.
शेतीच्या आवश्यक असणाऱ्या पावसाचे पाणी काळया ढगातच असते.
मधुर कंठाने सुस्वरात गाणारी कोकीळा काळीच असते.
सर्व रंग एकत्र केल्यास तो काळा होतो..
काळे काजळ सौंदर्य खुलवते
कोळश्याच्या खाणीतच हिऱ्याची उत्पत्ती होते.
सावळा रंग गोऱ्यापेक्षा उजळ नाही परंतु त्यापेक्षा कमीही नाही.
Comments