top of page

वै. सुधाकर शेंडगे प्रथम पुण्यास्मारणानिमित्त

- .ह भ. प. बाबुरावमहाराज वाघ सा. पंढरी संदेशच्या जडण घडणीमध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. त्यात मान्यवर संपादक, लेखक, जाहिरातदार, देणगीदार, हितचिंतक इत्यादिक सर्वांनी सा. पंढरी संदेश हे वारकरी संप्रदायाचे मुखपत्र ठरले पाहिजे याकरिता सहकार्य केले आहे, करत आहेत, करतील सुद्धां ! ही एक बाजू आहे. सा. पंढरी संदेशच्या परिवारात काम करणारी माणसे कशी असतात ? तर सतत धडपडणारी, विनयशील, वाचीक तप सांभाळणारी, सदाचारसंपन्न, सद्विचारसंपन्न, कोणाचाही हेवा न करता हाती घेतलेली कामे सचोटीने पूर्णत्वास नेणारी, निर्दांभिक अशा एकानेक गुणाने युक्त माणसे असल्यानेच सा. पंढरी संदेशची यशस्वी वाटचाल चालू आहे. अशा उक्त उल्लेखित गुणाने युक्त माणसापैकीच एक व्यक्तीमत्त्व म्हणजे आमचे परमसुहृद श्री. सुधाकर शंकर शेंडगे होत. त्यांचे चैत्र वद्य 11 शके 1939 दि. 12/4/2018 रोजी आकस्मिक निधन झाले. एक वर्ष झाले त्यानिमित्त हा लेखन प्रपंच ! घरची परिस्थिती अतिशय बेताचीच असूनही श्री. शेंडगे हे सा. पंढरी संदेशचे मालक गजानन बिडकर यांच्या सहकार्याने प्रेस व्यवसायात शिरले. त्या अभ्यासाबरोबर, सा. पंढरी संदेशमध्ये प्रकाशित होणार्‍या विविध लेखकांचे लेख, यांच्या वाचनाचा योग आला. त्यामुळे शेंडगे बहुश्रुत झाले. एका काळातील हा आळशी, कामचुकार माणुस सा. पंढरी संदेशच्या वेगवेगळ्या संतांच्या जीवनावरील लेखाच्या वाचन, चिंतनामुळे सश्रद्ध, उत्तम लेखक, सदा उद्यमशील बनला. ही वस्तुस्थिती आहे. सा. पंढरी संदेशचा प्रमुख अंग बनला. सतत वाचनाचा व्यासंगी माणुस ठरला. तुका म्हणे आता । उरलो उपकारा पुरता ॥’ घरातील सर्व व्यवहार मुलांचे स्वाधीन करत केवळ समाजाकरीता व स्वात:सुखाय जीवन असलेले आमचे वै. सुधाकर शेंडगे होते. ज्यावेळेस श्रीसंत नामदेवराय पुण्यतिथी महोत्सव असतो त्यावेळेस तर समाजातील माणसाबरोबर शेंडगे ‘समाज कार्यासाठी’ हजर असत. कुठल्याही समाजात खट-नट असतात. त्यामुळे समाजकार्य करणार्‍या माणसास समाजाचेच अतिशहाणे (शिक्षित) त्रास देत असतात. अविश्‍वास दाखवत असतात. पण जे खरे समाजकार्य करणारे असतात ते मात्र आपल्या कार्यापासून दूर जात नाहीत. असे सुधाकर शेंडगे हे हाडाचे समाजकार्य करणारे होते. सतत चिंतन, वाचन चालू असे. वेगवेगळ्या भागातील वृत्तपत्रास त्यांनी लेख दिले आहेत. यातून त्यांचा व्यासंग दिसून येतो. ‘श्रीसंत नामदेवराय चरित्र व वाङ्मय याचा त्यांचा सखोल व चिकित्सक अभ्यास होता. नामदेवराय हे तसे उत्कृष्ट गायक होते. त्यांचे कोणते अभंग कोणत्या रागामध्ये आळविले पाहिजेत याची देखिल श्री. शेंडगे यांनी सूचि तयार केली. तसेच नामदेवराय उत्तर भारतात राहिले त्यांचे तिकडचे शिष्य कोणकोणते आहेत याची देखिल यादी मला दाखविली आहे. कांही अंशात त्यांचा माझा मतभेद होता पण मनभेद नव्हता. कारण मतभेद असल्याशिवाय अभ्यासात चिकित्सकपणा तयार होत नाही. एकदा नाशिक त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरला होता. तो चातुर्मास्य काळ होता. अशा काळात कांही लोकांनी अकलेचे तारे तोडत पंढरपूरात सिंहस्थ काळात चंद्रभागा स्नान करु अशी भूमिका मांडली होती. त्यात एका बोडक्या डोक्याच्या स्वयंघोषित विद्वान् महाराजानेतर ‘सिंहस्थात चंद्रभागा स्नान करण्याविषयी आमच्याकडे ताम्रपट आहे’ अशी भाषा वापरली पण त्यास सडेतोड, सप्रमाण उत्तर सा. पंढरी संदेशच्या माध्यमातून सुधाकर शेंडगे यांनी दिले होते. परिणामी लबाडाची लबाडी उघडी पडली. ताम्रपट आरबी समुद्रांत बुडाला. सुधाकर शेंडगे कर्मकांडावर विश्‍वास ठेवत नसत. एकदा त्यांनी ‘शिवला कां कावळा ?’ या विषयावर भाद्रपद वद्य पक्षावर लेख लिहिला होता. मला त्या लेखावर खूप कुतूहल वाटले. पुढे ते वारले अन् त्यांचा दहावा दि. 21/4/2018 रोजी चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिक मंदिरामागे पंढरपूरात होता. सर्व विधी चालू होता. चि. विनोद व वैभव ही दोन मुले विधीसाठी बसलेली होती. सोलापूर नामदेवशिंपी समाजाचे अध्यक्ष धनंजयरावजी जवंजाळ व सर्व नातेवाईक, मित्र परिवार मी स्वत: आदि सर्व हजर होतो. विधी चालू असतांनाच 4 व 5 कावळे पिंड खात होते. माझे मित्र धनंजयरावजी जवंजाळ म्हणाले, "दादांना कुठलीही इच्छा राहिली नव्हती म्हणून हे घडत आहे." मी म्हणालो की श्री. शेंडगे दादांनी सा. पंढरी संदेशमध्ये शिवला कां कावळा ? असा प्रश्‍न केला होता त्यास ‘शिवला कावळा’ हे उत्तर आहे. असे निरिच्छ, सालस, निगर्वी, विद्यापिपासु, सतत उद्यमशील, तणावरहित जीवन जगणारे श्री. सुधाकर शंकर शेंडगे दादा ब्रह्मलीन होवून एकवर्ष पूर्ण होत आहे. त्यांना सा. पंढरी संदेश परिवार, बाबुरावमहाराज वाघ, बाळशास्त्री हरिदास यांचेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. * * *

40 views1 comment

1 Comment


Vaishali Shendge
Vaishali Shendge
Oct 11, 2020

राम कृष्ण हरि

Like
bottom of page