top of page

ऋषी पंचमीचे वैदिक महत्व आणि सद्यस्थिती ||

ऋषि॒: स यो मनु॑र्हितो॒| ऋग्वेद - १०|२६|५

जो मनुष्याचे हित करतो, तो ऋषि...!


आज ऋषिपंचमी...! आपला हिंदुधर्म हा जसा ईश्वरप्रणीत आहे, तसा तो ऋषिप्रणीतही आहे. ऋषि कुणांस म्हणावं? शास्त्रकारांनी अनेक व्याख्या दिल्या आहेत.

ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।

व्याकरण महाभाष्य आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो.
ऋषी शब्दाची व्युत्पत्ती :

ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो.

“ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्या शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी 'वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा' दोघांनाही ऋषि मानले आहे.


जो स्वत: आत्मज्ञानी होऊन वेदार्थ प्रतिपादन तर करतोच पण सृृष्टीनिर्मितीचं रहस्यही उलगडतो, तोच खरा ऋषी...! जो अभ्युदय‌ नि नि:श्रेयसाचे परममंगल दान देतो तोच ऋषि...! जो पदार्थविद्येचंही दान देतो तो ऋषि...!


"आपला धर्म ऋषिप्रणीत आहे" असे आह्मीं वर का म्हटलं?

कारण सर्व प्राचीन शास्त्रकारांचे मत हे आहे की वेद हे मानवसृष्ट्यारंभी अग्नि, वायु आदित्य आणि अंगिरा या चार ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झाले. नि तिथून अष्टधा विकृतीने सुरक्षित होत कानामात्राचाही भेद न होता अद्यापवावेतो‌ आहेत व भविष्यांतही राहतील. जगातली ही एकमेव ईश्वरीय वाणी, एकमेवाद्वितीय अशी जी ईश्वराने त्या चार ऋषींना दिली, तीच पुढे आपणांस अन्य ऋषींच्या मंत्रव्याख्यानानेही प्राप्त होत राहिली, म्हणून हा ऋषिप्रणीत धर्म...! वेद अनेक ऋषींच्या अंत:करणांत प्रकट झालेले नसून केवळ चार ऋषींच्या अंत:करणांत आरंभी प्रकट झाले. ह्यावर कैकवेळा लिहिलंय, पुनरुक्ती नको.महाभारतकाळापर्यंत तरी हा धर्म ऋषिप्रणीत होता म्हणून तो विशुद्ध होता. दुर्देवाने महाभारतसमयीच ऋषींचा ह्रास सुरु झाल्याने सहा वेदांगांपैकी एक निरुक्तकार महर्षि श्रीयास्काचार्य आता आह्मांस मार्गदर्शक कोण ठरणार म्हणून चिंता व्यक्त करताना दिसतात.

को न: ऋषिर्भविष्यति| आता आमचा ऋषि कोण?

देव उत्तर देतात : तेभ्य: एतं तर्कं ऋषिं प्रायच्छन्| आता तर्क हाच आमचा ऋषि....!


आमचं सत्यासत्यतेच्या निर्णयाचं, प्रमाणत्वाचे सगळं न्यायशास्त्र ज्या तर्कावर अवलंबून आहे नि 'यस्तर्केणानुसन्धत्ते स वेद धर्म नेतर:' (जो तर्काने जाणता येतो, तोच खरा धर्म जाण, अन्य नाही) असे प्रत्यक्ष श्रीमनुमहाराजांचे वचन आहे, त्या तर्कालाच आह्मीं इतकं विसरलो, तो इतका आह्मांस त्याज्य झाला की ब्रह्मससूत्रांतल्या 'तर्काsप्रतिष्ठानात्' ह्या‌ सूत्राचा अत्यंत विपरीत अर्थ‌ काढत‌ बसलो व आमच्या वैदिक धर्मामध्ये अत्यंत ग्लानीस आरंभ झाली. अनेक वेदविरुद्ध प्रथा, शास्त्रविरुद्ध अशी कर्मकांड, अनेक कुप्रथा, रुढीपरंपरा निर्माण झाल्या नि आमचा घात झाला...!आमच्या प्राणप्रिय अशा आर्ष‌ म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याकडेही पाठ फिरवून आह्मीं अनार्ष साहित्याला डोक्यावर घेतलं नि आमचा घात झाला...! आमच्या वैदिक धर्माच्या पतनाचा हा आरंभ होता. महाभारतकालानंतरच्या अडीच सहस्त्रवर्षांंच्या ह्या‌संघर्षापश्चात् भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी त्यांच्या अलौकिक पुरुषार्थाने नि अपार वेदनिष्ठेने वैदिक धर्मांस पुन्हा आर्षदृष्टी प्रदान करण्याचा दिव्य प्रयत्न केला नि त्यात ते यशस्वीही झाले. पण पुढच्या पिढींनी त्यांचे ते‌ कार्य व तो‌ संदेशही विस्मृतीत टाकला व पुढे ब्रिटीशांपर्यंत ह्या भरतभूमींवर आक्रमणे होत राहिली.‌ सहा सोनेरी पाने आपण पाहतोच. संतांचेही कार्य आहेच. यद्यपि पुन्हा त्याच आर्षधर्माचा उद्धार करण्यासाठी महर्षि देव दयानंदांचा जन्म झाला नि त्यांनी हिंदुंना पुन्हा 'वेदांकडे वळा' म्हणत आर्षधर्मोपदेशकाचे कार्य केलं. पण त्यांनाही आह्मीं विस्मृतीत टाकलं...!


आज ऋषिपंचमीनिमित्त विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप ह्या‌ सप्तव्याह्रतींचे जसं चिंतन आवश्यक आहेच, त्याबरोबरंच पराशर, व्यास, वाल्मीक्यादि महर्षींचेही स्मरण आवश्यक आहे. षड्वेदांगकार ऋषि व षड्दर्शनकार ऋषींचेही चिंतन, स्मरण, पूजन आवश्यक आहेच. सर्वांचेच नामोल्लेख इथे विस्तारभयास्तव संभव नाहीत त्याविषयी क्षमा...! आपला हिंदु धर्म ह्या सर्व ज्ञात-अज्ञात ऋषींचाच संपन्न वारसा आहे, जो आपल्याला पुढे न्यायचा आहे...! त्यासाठी आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत साहित्याचे अध्ययन हेच आपलं कर्तव्य आहे, तरंच ती खरी ऋषिपंचमी होईल...!


आपलं भाग्य हे आहे की आपण आपलं कुल गोत्र सांगतानाही एखाद्या ऋषीशीच ते जोडतो...! ह्यापेक्षा आणखी गौरवाची गोष्ट काय???

या ऋषिप्रणीत वैदिक धर्मांस व त्याच्या या सर्व ऋषि नामक प्रणेत्यांस कोटी अभिवादन...!

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी

#ऋषिपंचमी_ऋषिस्मरण_पूजन_मंत्रद्रष्टा_वेद_शंकराचार्य_दयानंद


(सदरचा लेख पाखण्ड खण्डिणी यांचे pakhandkhandinee.blogspot.com blog वरून साभार.)Comments


bottom of page