top of page

करिअर म्हणजे काय ?

Updated: Oct 31, 2020


गुणवत्तापूर्ण कामगिरी, मानसिक समाधान, आर्थिक स्थैर्य म्हणजे करिअर.

आजची शैक्षणिक क्षेत्रातील एकंदरीत परिस्थिती, ही मुलं आणि पालकांची सत्वपरीक्षा पाहणारी आहे. उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थीच  या स्पर्धेच्या प्रचंड रेटारेटीत आवश्यक त्या दालना पर्यंत पोहोचू शकतात. सध्या पेपर फुटी व कॉपीचे प्रमाण वाढले असल्यामुळे व शिक्षण संस्था राज्यकर्त्यांच्या व कारखानदार यांच्या अधिपत्याखाली गेल्यामुळे तेथे फक्त श्रीमंतांचीच डाळ शिजते. अशा अवस्थेत गरीब व मध्यम वर्गीयांची होणारी दुर्बलता शिक्षणाचा दर्जा खालावण्यास भाग पाडते. अशा विद्यार्थ्यांची व पालकांची स्थिती कमी गुण मिळाल्याने मोठी विचित्र होते. अनेकदा आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता, आपल्या मुलाचा कल कोठे आहे, किंवा त्याची कुवत काय आहे, याबाबत मात्र कोणीही पालक गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. 


जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला ईश्वराने एक स्वतंत्र देणगी दिलेली असते. कोणाच्या तरी कुंचल्यातून सुंदर चित्र साकारते. एखाद्याची कविता चार ओळीत खूप मोठा अर्थ सांगून जाते. एखाद्या मुलीचे नृत्य देहभान विसरायला लावते. सतारीच्या तारा छेडत असताना कुणाच्यातरी बोटात वीज उतरते, कोणाच्या गळ्यात मोहून टाकणारी असते. प्रत्येक व्यक्तिची प्रतिभा स्वतंत्र असते. प्रत्येकाकडे एक स्वतंत्र कौशल्य हातोटी व कला असते. परंतू आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करीत असतो. जसे झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल, हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व स्वधर्माकडे दुर्लक्ष करू नये. आजकालच्या सर्व तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर घडवणे असे वाटते. पण यामुळे समाजाच्या गरजांची पूर्तता होणार आहे काय? 


एका राजाची गोष्ट.. त्याला काही अधिकारी नेमण्याचे होते त्याने गावात दवंडी दिली. आलेल्या तरुणातून शारीरिक चाचणी घेऊन त्याने चार तरुण निवडले. प्रधानजी ना वाटत होतं की या मंडळींना राजाने लगेचच नोकरीवर घ्यावे. पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला त्या चौघांची परीक्षा घ्यावयाची होती. राजाने आदेश दिला या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठडीत बंदिस्त करून ठेवा आणि त्यांना चार दिवस उपाशी ठेवा. त्याप्रमाणे प्रधानाने केले. चार दिवसानंतर राजाने पुन्हा आदेश दिला. आता चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा. राजाची आज्ञा पाळून सर्वजण या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत जेवणाचे ताट आणि कुत्रे घेऊन येताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट त्या कुत्र्यापुढे ठेवले. आणि तो देवाची प्रार्थना करू लागला. राजा म्हणाला याला आपल्या अध्यात्म व धार्मिक विभागात घ्या. हा त्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या खोलीतील दृश्य मजेशीर होते. तो तरुण ताटातले अन्न स्वतः खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला याला अर्थव्यवहार विभागाकडे खजिनदारपदी घ्या. हा स्वतः ही पैसा खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही. तिसऱ्या खोलीत वेगळेच दृष्य होते. तिथला तरुण थोडीशी पोळी कुत्र्याकडे टाकत होता, आणि कुत्रे खाण्यात दंग असताना तो स्वतः खाऊन घेत होता. राजा म्हणाला याला आपल्या पाकखान्यात घ्या. हा स्वतःही खाईल आणि इतरांनाही चांगले खाऊ घालेल. चौथ्या खोलीत विलक्षण दृष्य दिसले. तो तरुण अक्षरश: कुत्र्याच्या मानगुटीवर बसून जेवण करत होता. राजा म्हणाला, याला आपल्या संरक्षण विभागाचा प्रमुख करा. हा त्यासाठी योग्य आहे. राजाची कल जाणून घेण्याची पद्धत अजब जरी असली, तरी त्याने योग्य तेच निर्णय घेतले. 



अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते. मुलांना नेहमी सांगितले जाते, तू आमक्या सारखा हो. पण तुझ्या कर्तृत्वाने, रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी भरलेले तुझे व्यक्तिमत्व आम्हाला अपेक्षित आहे. असा आग्रह पालकांनी धरायला हवा. या संदर्भातले लोकमान्य टिळकांचे उदाहरण महत्त्वाचे वाटते. तुरुंगातून आपल्या चिरंजीवांना पाठवलेल्या पत्रात लोकमान्य लिहितात, 'आयुष्यात आपण कोण व्हायचे, काय व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुम्हालाच आहे. अगदी चप्पल बांधणाऱ्या चर्मकाराचा जरी व्यवसाय करावासा वाटला, तरी मला दुःख वाटणार नाही. पण तो तुम्ही इतक्या उत्तम रीतीने करा, की लोकांनी म्हणावे, चपला घ्यावा तर टिळकांकडूनच.  संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दाखला देतात.  स्वधर्म जो बापा | तो नित्य त्यजू जाण पां |  म्हणौनि वर्तता तेथे पापा | संचारु काही ||  आपल्या स्वभावानुसार, आवडी नुसार आचरण करणे हाच खरा यज्ञ आहे. स्वभावधर्मानुसार आपण आचरण केले तर ते कधीही पाप ठरत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या  तुका म्हणे झरा | मूळचाची आहे खरा |  या वचनावर श्रद्धा ठेवून वाटचाल केली तर प्रत्येकाचे व्यक्तिमत्व बहरून जाईल. करिअर निवडीबाबतचे इतके सुंदर मार्गदर्शन संतां शिवाय कोणीही केलेले नाही.  एका सनई वादकाने आपल्या मुलाला सनई शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. हेतू हा की, आपल्यानंतर यानी आपली पारंपारिक कला जोपासली पाहिजे. परंतु मुलगा काही केल्या ऐकेना. एके दिवशी बापाने मुलाला जबरदस्तीने आडवे पाडले व त्याच्या तोंडात सनई घातली. आणि रागाने शिकण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा मुलगा म्हणाला, "शेवटी फुंकायचे माझ्याच हातात आहे ना!"  अयोग्य ठिकाणी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरतात. बगळा पांढरा आहे म्हणून त्याला पोपटा प्रमाणे बोलायला शिकविणे व्यर्थ आहे.

म्हणून गुणवत्तापूर्ण कामगिरी, मानसिक समाधान आर्थिक स्थैर्य म्हणजे करिअर.






 

Commentaires


प्रतिक्रिया

महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे एक तळमळीचे कार्यकर्ते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, पंढरपूरचे सुधाकरजी शेंडगे... 'संतमुद्रा' नावाचा त्यांचा छानसा प्रिंटिंग प्रेस. परिषदेच्या कार्यात, सभेत सुरेशभाई शहा, गजानन बिडकर, रमेशभाई कोठारी यांच्या बरोबर त्यांची कायम उपस्थिती असायची. ममुपच्या पंढरपूरच्या अधिवेशनात त्यांचा भरलेला उत्साह तरुणांना लाज वाटावी असा असायचा. 'मुद्रा' अंकातील त्यांचे लेखन उद् बोधक असायचे. सुधाकरजी शेंडगेंचे आध्यात्मिक आणि सामाजिक विषयावरील विपुल लेखन अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. लोभस स्वभावाच्या व संत परंपरेतील आपल्या मुद्रक बांधवाची लेखमाला आता वेबसाईट वरुन अमर होत आहे, याचा आनंद सर्वांनाच आहे...

- सांगली जिल्हा मुद्रण परिषदेचे श्री. प्रकाश आपटे

अधिक माहितीसाठी सदस्य व्हा. 
SUBSCRIBE FOR NEW INFORMATION

धन्यवाद

  • White Instagram Icon
  • White YouTube Icon

© सर्व हक्क संतमुद्रा अधीन.

bottom of page