महर्षि व्यासांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार म्हणजे महाभारत होय. अजूनही ते अनेक गोष्टी सांगते, शिकविते. महाभारतातील युद्धकांड 'गीते' इतकेच प्रसिद्ध आहे. चाळीस लाखयोद्ध्यांचा समावेश असलेले हे युद्ध मानवी भाव-भावनांचे अनेक कंगोरे स्पष्ट करते. या युद्धाचा अभ्यास केला असता, त्यातून आजच्या व्यवस्थापनेचे अनेक नियम दिसतात. भारतीय युद्ध आणि व्यवस्थापन यांचा संबंध यातून स्पष्ट होतो.
पार्श्वभूमी :- महाभारतातील युद्धामध्ये मनुष्यबळ आणि योद्ध्यांचा विचार केला तर कौरवाचे पारडे जड दिसते. कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी तर पांडवांचे सात अक्षौहिणी होते. (एक अक्षौहिणी-२१,८७० रथ, २१,८७० हत्ती, ६५,६१० घोडे आणि १,०९,३५० पायदळ.) पांडव तसे जन्मापासून अरण्यात होते. तर कौरव राजवाड्यात वाढलेले. युद्धाच्या आधीही पांडव १२ वर्षे वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात होते. या संपूर्ण कालवधीत युद्धाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी कौरवांना भरपूर वेळ मिळाला, त्यामुळे पांडव हे मदतीच्या दृष्टीने पांचाळ, यादव, मगध आणि चेदी यांच्यावरच अवलंबून होते. कौरवांच्या मागे हस्तिनापूरची सारी ताकद होती. त्याशिवाय कर्णाने बहुतेक देशांना अंकित केले होते. तीपण जमेची बाजू .
युद्धाची तयारी-
कौरव आणि पांडवांनी युद्धाच्या तयारीसाठी केलेल्या गोष्टी-
कौरव - कर्णाने युद्धमोहीम आखली. अंकित केलेल्या देशांकडून भरपूर खंडणी वसुल केली, यामुळे खरेतर नुकसानच झाले. कारण युद्धात कौरवांची मनुष्य आणि धन अशी दुहेरी हानी झाली. त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येने नवीन शत्रुही निर्माण झाले,
पांडव - यांनी स्वतः मधील कमतरता दूर करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अर्जुनाने दिव्यास्त्रे मिळविली, भीमानेही शास्त्राभ्यास सुरु ठेवला. त्याची हनुमंताशी भेट झाली, त्यांचा आशिर्वाद मिळाला. युधिष्ठिराने अनेक महर्षिकडून विविध शास्त्रांचे अध्ययन केले. त्याशिवाय छत्रसेन नावाच्या गंधर्वाकडून द्यूतविद्यचे प्रशिक्षण घेतले. पुढील प्रसंग ओळखून घेतलेल्या निर्णयामुळे तो द्युतात अजिंक्य झाला असे म्हणतात.
मित्रराष्ट्र-
कौरव - कौरवांची सत्ता केंद्रीय होती. त्या काळची ती सर्वात प्रबळ सत्ता मानली जात होती. असे असले तरी त्यांची मित्रराष्ट्रे फारशी नव्हती. राजनैतिक संबंध असणारी राष्ट्रे थोडी आणि दूर अंतरावर होती. उदा. गांधार (शकुनी), सिंधू (जयद्रथ), कंबोडिया ( कंबोज-भगदत्त).
पांडव:- स्वत:कडे धन आणि सत्ता नसली, तरी प्रबळ राष्ट्रांशी जवळचे संबंध होते. नाते हितसंबंधानेही त्यांचे प्रबळ राष्ट्रांशी संबंध होते, द्रोपदीमुळे-पांचाळ अर्जुन-सुभद्रा विवाहामुळे द्वारका, सहदेव-विजया (मगध), नकुल-कृण्मयी (चेदी), भीम- बलेद्र मुळे (काशी), युधिष्ठिर देविकामुळे (कैकय), अभिमन्यु-उत्तरा (मत्स्य), भीम-हिडींबामुळे (राक्षस) आणि अर्जुन व उलुपी विवाहामुळे (नाग राष्ट्र),
नेतृत्त्व -
कौरव - कौरवांचे केंद्रिय नेतृत्व होते. एकावेळी एकच सेनापती ११ अक्षौहिणी सैन्याचे नेतृत्व करीत होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य आणि अश्वत्थमा असे एका पाठोपाठ एक सेनापती झाले. त्यांच्यात एकमत नव्हते व सहकार्याची भावना नव्हती, मीच युद्धनीतीत कुशल असल्याचा प्रत्येकाला दंभ होता, एकाचा वध झाल्यावरच दुसऱ्याची नियुक्ती होई. सैन्याला नेताच नाही, अशी परिस्थिती थोडा काळ का होईना पण होत होती.
पांडव- सैन्याचे नेतृत्त्व विभागून दिले होते. एका अक्षौहिणीवर एक असे सेनापती नियोजन होते. दृष्टद्युम्न हा सरसेनापती म्हणून नेतृत्व करीत होता, त्याच्याही वर अर्जुन होता आणि अर्जुनाचा सल्लागार श्रीकृष्ण होता. विराट (मत्स्य), द्रुपद (पांचाल), सहदेव (मगध), द्रशकेतु (चदी), सात्यकी (द्वारका) आणि शिखंडी (पांचाल) अशा जबाबदाऱ्या प्रत्येकावर सोपविल्या होत्या,
साघिंक भावना-
कौरव - कौरवात साघिंक भावना नव्हती. युद्ध करण्याचे प्रत्येकाचे वैयकिक कारण वेगळे होते. भीष्माचार्य हस्तिनापुरचे रक्षण करेन या प्रतिज्ञेसाठी लढले. द्रोणाचार्य व कृपाचार्य राजनिष्ठेचा चुकीचा अर्थ लावून लढले. कर्ण अर्जुनाबरोबरचे वैर आणि दुर्योधनाची मैत्री निभावण्यासाठी लढला. या सर्वांचे मनोमीलन झाले नाही, एक ध्येय राखता आले नाही. कारण त्यांच्यात एकवाक्यता नव्हती.
पांडव:- एक संघ, एक ध्येय, सैन्यातील प्रत्येकाच्या मनात युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांचेबद्दल प्रचंड आदर होता. योद्धे म्हणून भीम आणि अर्जुनाचा दरारा होता. मुळात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक रथी, महारथी, अतिरथी है एकमेकांचे नातेवाईक होते. ते सारे निर्णय प्रक्रियेचा एक भाग होते. त्यामुळे हे युद्ध साऱ्यांचेच आहे अशी भावना होती.
वैयक्तीक चालना -
कौरव - खरे तर कौरवांकडे प्रत्येकालाच चालना देण्याची आवश्यकता होती. एक दुर्योधन सोडल्यास युद्धाला फारसे कोणी अनुकूल नव्हते. त्यांचे चार प्रमुख योद्धे तर पांडवांच्याच बाजूचे होते, भीष्माचार्यानी मी रोज हजार सैनिक मारीन, पांडवांना मारणार नाही असे स्पष्ट सांगितले होते, कारण त्यांनी द्रोपदीला अखंड सौभाग्यवती भव असा वर दिला होता. द्रोणाचार्यांनीही मी पाडयांना पकडेन पण मारणार नाही असेच म्हटले होते, शल्याची तर फसवणूकच झाली होती, तो पांडवांचाच होता. त्यामुळे त्याने कर्णाची सतत अवहेलना करुन पांडवांना मदतच केली, कर्णाचा राग फक्त अर्जुनावर होता, तो त्याचे वैयक्तीक युद्ध लढत होता. त्याने इतर पांडवांना न मारण्याचे कुंतीमातेला वचन दिले होते.
पांडव - पांडवांमध्येही वेगवेगळ्या योद्ध्यांची वैयक्तीक कारणे होती, ती कारण त्यांचे सांधिक ध्येय गाठण्यासाठी पूरकच होती. उदाहरणार्थ प्रद्युम्न-द्रोण, शिखंडी-भीष्माचार्य, सात्यकी-भूरिश्रवा, अर्जुन-कर्ण, भीम- दुर्योधन आणि त्याचे सर्व भाऊ, नकुल- कर्णाची मुले, सहदेव-शकुनी आणि त्याची मुले,
निष्ठा-
कौरव - कौरवातील मुख्य चार योद्ध्यांची निष्ठा पांडवांकडेच होती, भीष्माचार्यांनी तर स्वतःचा वध करण्याचा मार्ग स्वतःच पांडवांना सांगितला. हाती शस्त्र आहे तोवर मी अजिंक्य आहे, आणि जोपर्यंत अश्वत्थामा जिवंत आहे तोपर्यंत मी शस्त्र खाली ठेवणार नाही असे सांगून स्वतच्या वधाचा मार्ग द्रोणाचार्यांनीही दाखवून दिला. कर्णाने तर इतरांना हात न लावण्याचे वचन दिले होते. त्यामुळे शक्य असूनही त्याने युधिष्ठिर आणि भीमाचा वध केला नाही. धृतराष्ट्राची निष्ठा हस्तीनापूरच्या राज्यापेक्षा आपल्या मुलावर त्यातही दुर्योधनावर जास्त होती. तो चर्मचक्षुंनी आंधळा होताच परंतु अंतर्चक्षूंनी व पुत्रमोहाने जास्त आंधळा झाला होता. पांडवांबद्दल त्यांनी उघड उघड विरोध दाखविला. स्वतःची कुलवधू द्रोपदी हिच्या, अब्रुची लक्तरे उतरवित असतांना केवळ पुत्रस्नेहापोटी त्याने मौन पाळले व अनितीला साथ दिली. तो एक पृथ्वीपती होता. त्याच्याबरोबरच त्याची न्यायदेवताही आंधळीच झाली होती, त्याने आपल्याच घरात वैर निर्माण करुन संघर्षाला खतपाणी घातले व आपल्याच हाताने स्वकुलाचा सर्वनाश करवून घेतला.
पांडव - केवळ सोळा वर्षांच्या अभिमन्यूने चक्रव्यूहाचा भेद करून कौरवांच्या शेकडो वीरांना कंठस्नान घातले, घटोत्कचानेही मरता मरता स्वतचे शरीर भव्य करुन हजारो सैनिकांना चिरडून टाकले. त्यामुळे अर्जुनासाठी ठेवलेली शक्ती घटोत्याचावर सोडावी लागली. ही युद्धनीति श्रीकृष्णाची होती, कधीही असत्य न बोलणाऱ्या युधिष्ठिराने आपल्या संघाच्या निष्ठेसाठी नरो वा कुंजरो वा असे अर्धसत्य द्रोणाचार्यांना सांगितले.
व्यवस्थापन -
श्रीकृष्ण हा सर्वोकृष्ट व्यवस्थापक होता. अडचणीच्या वेळी योग्य मार्गाचा अवलंब करून आपल्या योग सामर्थ्यांने पांडवांना वाचविले. युधिष्ठीराने छोट्या छोट्या गोष्टीतून आपले ध्येय साध्य केले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी तो एक सात्त्विक डाव खेळला, युद्ध सुरु होण्याआधी कौरवांच्या पक्षात जाऊन सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. युद्ध जिंकण्यासाठी ती बाब आवश्यक होती. तेथून परतल्यावर त्याने दोन्ही सैन्याला उद्देशून कोणाला पक्ष बदलायचा असल्यास आताच बदला असे आवाहन केले, त्याचा परिणाम होऊन दुर्योधनाचा भाऊ युयुत्सु पांडव पक्षात आला. याचा कौरव सैन्यावर विपरीत परिणाम झाला.
स्त्री शक्ती-
कौरव - कौरवामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीची उतरंड होती, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग अजिबातच नव्हता. गांधारी सात्विक व पातिव्रता होती. परंतु तिला मखरातच ठेवले होते. तिच्या मतांना किमत नव्हती. तिने आपल्या माहेरचे दुखणे जवळ आणून ठेवले होते. स्वतःचा भाऊ शकुनी याने धृतराष्ट्राच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन दुर्योधनाला अनीतीचे व पांडवांच्या नाशाचेच धडे शिकविले. तीच मूळ कीड हस्तिनापूरच्या राज्याला नामशेष करण्याला कारणीभूत ठरली. रामायणात देखील दशरथ पत्नी कैकयीन माहेरहून आणलेल्या मंथरा दासीच्या अयोग्य सल्ल्याने रामाला वनवास घडला परंतु भरताला राजा पाहण्याचे तिचे स्वप्न भंग पावले व रामायण घडले.
पांडव - स्त्री प्रधान संस्कृतीचा आदर, पांडवामध्ये सर्वोच्च स्थानी कुंती होती. ती सांगेल तो धर्म मानला जात होता. द्रोपदीही पांचही जणांची अर्धांगी होती. निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ती पांडवांची स्फूर्ति होती. पुढील पिढीतील घटोत्कच, अभिमन्यु आणि इरावण यांचे पालन- पोषण यांच्याच आईने केले होते. त्यामुळे महिलांच्या मतांचा मोठा प्रभाव पांडवांवर पडला होता. पांडवांचे जीवन लहानपणापासूनच कष्टात गेले. वनामध्ये त्यांना अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले. अनेक प्रकारचे चांगले संस्कार झाले. कुटिल कारस्थानापासून दूर राहिले व सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण मिळाली.
या युद्धातून मिळणारी जीवनावश्यक सूत्रे -
कमतरता भरुन काढा.
शत्रुना मित्र बनवा.
जबाबदाऱ्या वाटून घ्या.
वैयक्तिक हित व प्रयत्नापेक्षा सांघिक हित सरस ठरते.
योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड.
गुणाबरोबर कार्यावर निष्ठा हवी.
शत्रूचे सतत निरीक्षण व परीक्षण करा. व त्याबाबत सतर्क रहा.
जो संघाला प्रेरणा देतो, प्रसंगी स्वत कामाला उतरतो. कठीण समयी खचून न जाता योग्य मार्ग शोधतो. तोच खरा व्यवस्थापक,
सर्वात खालच्या थरात काय चालले आहे ते जाणून घ्या.
विविध मते, संस्कृती याची माहिती घ्या. त्याचा आदर करा.
आपण सुखी व्हायचे असेल तर शेजारी पाजारी यांना सुखी करा.
स्त्रीयांचा आदर करा व त्यांचे संरक्षण करा.
धर्माच्या रक्षणासाठी हाती शस्त्र धरा.
सर्वांचा तोल सांभाळण्यासाठी समानतेची दृष्टि ठेवणे आवश्यक असते.
सद्यस्थितीला याची नितांत गरज आहे. यामुळेच देश समृद्ध होईल.
दहशतवाद निपटून काढा.
Comments