माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते. नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ, अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले. यांचेपैकी धर्मानाथाची कथा अत्यंत रसाळ व अद्भुत आहे. तीच आपण विस्ताराने पाहू...
श्रीमद्भागतामध्ये ऋषभदेवाच्या शंभर पुत्रांपैकी नऊजण भगवद्भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरुन या नवनारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण झाला, त्यामध्ये
१) कवी नारायण-मच्छिंद्रनाथ,
२) हरिनारायण-गोरक्षनाथ,
३) करभंजन नारायण-गहिनीनाथ,
४) अंतरिक्ष नारायण- जालंदरनाथ,
५) प्रबुद्ध नारायण- कानिफनाथ,
६) अविहोंत्रनारायण - वट सिद्धनाथ (नागेश),
७) दुर्मिल नारायण भर्तरीनाथ,
८) चमसनारायण रेवणनाथ व
९) पिप्पलायन नारायण चर्पटनाथ
असे अवतार धारण केले.
एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरु श्रीदत्तात्रय प्रभूना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले. परस्परांनी एकमेकांच्या कांही घटनांची चर्चा केली. श्रीगुरुंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले. नंतर गोरक्षनाथ श्रीगुरुंना म्हणाले, आमचा जन्म जगत्कल्याण आणि परोपकारासाठी आहे. त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी; दत्तगुरुंनी जड अंत:करणांनी त्यांना निरोप दिला.
मच्छिंद्रनाथ वे गोरखनाथ काशीक्षेत्री निघाले; वाटेत प्रयागक्षेत्री येऊन पोहोचले. त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता. राणीचे नांव रेवती होते. त्यांना एकही अपत्य नव्हते. त्रिविक्रमराजा परम उदार, ज्ञानी, परोपकारी, प्रजाहितदक्ष होता. विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणें प्रेम करीत होता. त्यामुळे प्रजा सुखी-समाधानी होती. प्रजेचे राजा-राणीवर अत्यंत प्रेम होते.
मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रमराजा स्वर्गवासी झाला होता, राज्यात हाहा:कार उडाला होता. सारी प्रजा शोकाकुल झाली होती. राणी रेवतीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली, त्यांच्या मनात "राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल" असे आले. मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली. पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते. त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरुपात विलीन झाला होता. पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते.
मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गांवाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले. त्यासमोरच स्मशानभूमी होती. तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी आला. त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथाचे - हृदय भरुन आले. व त्यांनी आपल्या गुरुंना विनंती केली कीं, आपण राजाला जिवंत करुन प्रजेला आनंदी करावे. तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले. राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरुपात विलीन झाला आहे. त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे. तेव्हां गुरुंचा उपदेश गोरखनाथाला उमजला आणि तो शांत बसला.
मच्छिंद्रनाथांनी ओळखले की, गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वत: प्रायश्चित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की, तूं लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो. 'राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो. त्या देहात राहूनच मी राजाच्या नांवाने राज्याचा सर्व कारभार पाहीन, बारा वर्षांनंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन. परंतु तोपर्यंत तूं माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव.' हे ऐकून गोरखनाथ विस्मयाचकित झाला. त्याने मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योगसामर्थ्याने आपला देह निश्चल करुन (त्यागून) राजाच्या मृतदेहात प्रवेश केला. तेव्हां राजा त्वरीत उठून बसला.
राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जयजयकार करु लागला. सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी रांजाची सुवर्णाची प्रतिमा करुन त्यावर विधिपूर्वक प्रेतसंस्कार करुन अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषांत वाजत-गाजत नगरामध्ये नेले.
इकडे शिवमंदिरात गोरक्षापुढे यक्षप्रश्न उपस्थित झाला कीं, मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे ! तेवढ्यात तेथे एक स्त्री आली. तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य घटना सांगितली तो तिला म्हणाला,
'माझ्या गुरुंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. तेव्हां यासंबंधी कोठेही वाच्यता करु नकोस. श्रीगुरुंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव.' गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भूयार दाखविले. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करुन गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरुन कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भूयाराचे दार बंद केले. त्यानंतर ती स्त्री म्हणाली, 'साधुमहाराज हा देह बारा वर्षे चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल ?' तेव्हां गोरक्षनाथ म्हणाले, 'माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत. ते प्रलयकाळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात.' परंतु तूं हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल. स्त्री तसे वचन देऊन निघून गेली.
इकडे त्रिविक्रमराजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टीची माहिती करुन घेऊन यथायोग्य रितीने राज्यकारभार चालविला. रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेंच त्याचे बोलणे वागणे ठेवले. त्यामुळे राणीला संशय आला नाही. स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांबसदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्यनेम मच्छिंद्रनाथांनीहि चालु ठेवला. त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली. गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बर्बर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही.
अशाप्रकारे त्यानंतर राजा - दररोज मंदिरात जाऊन स्वत:च्या - देहाविषयी खात्री करुन घेऊ लागला. गोरक्ष तीन महिने तेथे राहिला. ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाला, "आपण आपली योगसाधना करुन हित साधावे. मला आता तीर्थयात्रा करणेस परवानगी द्यावी." मग गुरुंच्या आज्ञेवरुन तीर्थयात्रेस गेले. पुढे सहा महिन्याचा कालावधी लोटला. आणि राणी रेवती गर्भवती राहिली. यथावकाश तिला पुत्ररत्न झाले. त्याचे बारसे थाटात केले. त्याचे 'धर्मनाथ' असे नांव ठेवले.
धर्मनाथ पाच वर्षांचा झाला. राजा राणीने एकेदिवशी भगवान शंकराची षोडशोपचारे पूजा केली. पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले. तेव्हां राणी शिवाची प्रार्थना करू लागली. 'हे गिरिजापते! तुझ्या कृपेने मी तृप्त, समाधानी, आनंदी आहे. परंतु मला एकच मागणे आहे. मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे.'
राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली. राणीला तिचे हसणे खटकले. राणीने तिला हसण्याचे कारण विचारले. ती स्त्री गप्प बसली. राणीने तिला वारंवार विचारुन बेजार केले. नाईलाजाने ती म्हणाली की, "मी गरीब आहे. संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्युदंड द्याल. त्यावर राणीने तिला अभय वचन दिले. मग पुजारीणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली. राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला. तुम्ही विधवा असतांनाही सवाष्ण मरण (अहेव) मागितले म्हणून मला हसू आले. यापुढे बारा वर्षे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात रहाणार त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करुन स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हां तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे." नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर - दाखविले. ते पाहून राणी खूप उदास झाली. राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला. यानिमित्ताने आपल्याला मातृत्त्व व राज्याला वारस मिळाला सात वर्षांनी आपल्याला वैधव्य प्रात होणार. धर्मनाथला कसे मोठे करणार, राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार ? यावर तिने उपाय निवडला - मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर नाहीसे करुन टाकले तर सर्व प्रश्न सुटतील.
तिने मच्छिंद्राचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करुन अरण्यात फेकून दिले. भूयाराचे तोंड पूर्ववत बंद करुन निश्चिंत राहिली. ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली. तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले, शंकरांना खूप हळहळ वाटली. त्यांनी पार्वतीला सांगितले की, तूं यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करुन कैलासावर आणून ठेवण्यास सांग. पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली.
त्याप्रमाणें चामुंडा व यक्षिणीने मच्छिंद्राच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले. आणि सांगितले की, हा भग्नदेह आपला शत्रु मच्छिंद्रनाथाचा आहे यांने आम्हाला नग्न करुन फजिती केली होती. अष्टभैरवांना सळोकी पळो केले होते. तेव्हां त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहे. सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला. त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्या भोवती चौऱ्यांशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण, कोट्यावधी यक्षिणी, चामुंडा, शंखिणी, डाखिणी सशत्र ठेवल्या. त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भूयाराकडे जात असे. व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे. पण आपण दिव्यदृष्टीने एकदा पहावे असा विचारही त्याच्या मनात आला नाही,
अशाप्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता बारा वर्षांची मुदतही संपत आली होती. तिकडे बारा वर्षे पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयागक्षेत्री गुरुभेटीसाठी शिवमंदिरात आले. त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले तेव्हां तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला. गोरक्षांना खूप वाईट वाटले. तेव्हां ती स्त्री म्हणाली, मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला विचारुन येते. असे सांगून ती राणीकडे गेली. तेव्हां रेवतीने सांगितले की, त्याचदिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करुन अरण्यात टाकले ते किटकांनी खाल्ले सुद्धां असतील. हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला. तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली. त्याला संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून शांत राहिला.
मच्छिद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही. कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील, त्यांचा शोध घेतला पाहिजे... त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की, गुरुंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्मरुप घेऊन जातो. परंतु माझा देह इथेच ठेवून जातो. मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर, नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करील असे सांगून तो सूक्ष्मरुपाने बाहेर पडला. त्याने दाही दिशा, सप्तद्वीप, सप्तपाताळे, गुप्तगुहा व सर्व ब्रह्मांड, वैकुंठभुवन शोधले. शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला वीरभद्र, शिवगण, चामुंडाच्या पहाऱ्यात गुरुंच्या अस्थि, त्वचा, मांस यांचे अवशेष दिसले. तो पुन्हा शिवमंदिरात आला. स्वत:च्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली. सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करुन, त्याला मध्यस्थी करुन, देह ताब्यात द्यावा असे सांगितले. सूर्य विरभद्राकडे गेला व मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला. विरभद्राने अष्टभैरव, बहात्तरकोटी चौऱ्यांशी लक्षगणाना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहणेस सांगितले. गोरक्ष व चौरंगीने हे पाहून दोघामध्ये घनघोर युद्ध झाले. एकमेकांवर अस्त्रे सोडली. यामुळे सर्व देव भयभित झाले. भगवान विष्णु व शंकर पृथ्वीवर आले. त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारुन टाकले. त्यावेळी शंकराला दुःख झाले. गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हां महादेव म्हणाले, वीरभद्र - जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत - शिवमंत्र जपत असे. तेव्हां त्याच्या - अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी, अशा रितीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले. व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली.
श्रीगुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात - आले. ते सर्व सोडून भूयारात त्याचे रक्षण करीत असतांना एकेदिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणें शिवमंदिरात आले. त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली. तेव्हां गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांची मुदत संपत आल्याची कल्पनाहि दिली. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाले की, मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे. त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करुन परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले.
राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रिगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करुन एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला. सर्व प्रजाजनांना सुवर्णदान, मिष्टान्न भोजन, करसवलत इत्यादि जनहिताची कामे करुन धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करुन एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला. गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला. गोरक्ष व चौरंगीना आनंद झाला व त्यांनी गुरुंना वंदन केले. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा
दिवस जास्त वर आला, तरी महाराज कां उठले नाहीत ? म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली. तिने राजाला उठविण्याचा प्रयत्न केला, तेव्हां तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघुन गेला आहे. तिने दुःखाने हंबरडा फोडला. राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ, प्रधान, मंत्रिगण धांवत आले. राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली. त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ, गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते. मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले. पित्याच्या मृत्युमुळे धर्मनाथ दुःखी झाला. त्याने अन्नपाणी वर्ज्य केले. राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले. नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तिनही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणले. एक वर्षभर ते तेथे राहिले. आता तूं मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे. बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे तीर्थयात्रेला निघून गेले.
धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथाची आज्ञा पाळली होती. त्याच्या कारकीर्दीत प्रजा सुखात होती. आपल्या मातेलाही त्याने सुखा-समाधानाने ठेवले होते. तिची तो मनोभावे सेवा करीत होता. त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती. त्यांना एक पुत्रहि झाला होता. त्याचे त्रिविक्रम नांव ठेवले होते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले. धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले. कांही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला.
धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता. माघ द्वितीयेला ज्याला 'धर्मबीज' असे म्हणतात, त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदीक्षा दिली. या समारंभास स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते. याप्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करणेसाठी तेथे आले. सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले. त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली. तेव्हां गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येकवर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली. तेव्हांपासून ती द्वितीया 'धर्मनाथ बीज' म्हणून विख्यात झाली. दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला.
दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करुन लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य, दुःख, रोग, संकटे, भवभय, दोष, पीडा यांचा समूळ नाश होईल. तेथे लक्ष्मी वास करील, मनोकामना पूर्ण होतील, संसारात सुख-समाधान प्राप्त होईल. आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या 'किमयागिरी' ह्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे.
प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगीश्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकविल्या. ते बद्रिकाश्रमात आले. तेथे भगवान शंकराचे दर्शन घडविले. त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपःश्वर्येला बसविले. बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले. बारा वर्षानंतर तीर्थयात्रेहून आलेनंतर मोठे उद्यापन केले. या सोहळ्यात सर्व देव-देवतांना निमंत्रित केले. त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले. सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले. त्यानंतर मच्छिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले.
मनोगत :
सा. पंढरी संदेशने मला 'धर्मनाथ बीज' याची कथा लिहिण्याची जबाबदारी दिली. खरेतर सर्व सिद्धीचे जनक असणाऱ्या नाथांची कथा लिहिण्याचे सामर्थ्य सामान्य व सांसारिक मानवाची पात्रता नाही. परंतु माझे परमगुरु नामदास आण्णा यांच्या कृपेने प्रत्यक्ष गोरक्षनाथांनीच माझ्यामध्ये कायाप्रवेश करुन ही कथा लिहिली. त्यामुळे माझा देह पवित्र झाला हेच मी माझे भाग्य समजतो. जाता जाता नाथसंप्रदायातील दोन महान उद्घोषाचा अर्थ पाहू-
जय अलख निरंजन :- जय म्हणजे विजय, अलख म्हणजे अलक्ष अर्थात् जे पाहता येत नाही ते ब्रह्म. निरंजन म्हणजे अंजन नसलेले. अंजन म्हणजे काजळ, काळेपणा, डाग, मलिनता किंवा अंधार, अज्ञान. अंजन नसलेले म्हणजे ज्यामध्ये अजिबात डाग नाही म्हणजेच जे पूर्ण तेजोमय आहे, ते ब्रह्मस्वरुप जाणणे म्हणजे 'अलख निरंजन'.
आदेश :- आदेश हा परमपद स्थितीदर्शक शब्द आहे. आदेश शब्दोच्चार ब्रह्मस्वरुपतेचा निदर्शक आहे. आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा हे भिन्न नसून एकच असल्याचा प्रतिपादक शब्द म्हणजे 'आदेश' होय.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
コメント