|| संत नामदेवांची भक्तिचिकित्सा ||

Updated: Sep 5


संत नामदेवांचे जीवन हा सातशे वर्षापूर्वी आपल्या गंभीर घोषांचे निनाद दशदिशात घुमवीत असलेला उत्कट भक्तिचा एक प्रचंड प्रपात ( धबधबा ) होता.  त्या प्रपाताच्या जलौघाला भावनेचा तिव्र आवेग लाभलेला होता . आत्मोन्नतीच्या उत्तुंग शिखरावरून समर्पणाच्या बेभानतेने अवघे जीवन ईश्वरचरणी झोकून देण्याची किमया त्यांना लाभलेली होती.त्यातून नितांत रमणीय काव्य संपदेचे भाऊ तुषार उधळले जात होते. ज्ञानसूर्याच्या किरणांनी त्या तुषारातून नवविधा भक्तीच्या नवरंगाची इंद्रधनुष्ये चमकत होती. आवेग भव्यता व सौंदर्य यांनी घडवलेले हे जीवन होते.

उत्कट भक्तीचे परिसीमा हा संत नामदेवांच्या जीवनाचा गाभा होता. नि:शेष आत्मसमर्पण हीच त्यांची वृत्ती होती. 'ज्ञानदीप लावूं जगीं' ही त्यांची ध्येयपूर्ती होती. उच्चवर्णीय परीसा भागवतापासून संत चोखामेळापर्यंत आणि महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा प्रभाव पडला होता. पंढरपूर निवासी विटेवरच्या सगुण-सावळे रूप असणाऱ्या पांडुरंगाशी सुखसंवाद करण्यापासून तो निर्गुणाच्या विश्वात्मक अलौकिक अनुभव त्यांनी घेतलेले होते. आपल्या सगळ्यात दिव्य अनुभवांना त्यांनी अभंगातून शब्दांकित केले होते. विशेषतः शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा करून अभंग भांडार निर्माण करणे इतकी त्यांच्याजवळ सामर्थ्यशाली प्रतिभा होती. लोकसंग्रह चे विलक्षण जादू त्यांच्या कीर्तनात होती. आणि या सगळ्याला निरपेक्ष लोकोद्धाराच्या समाजोन्मुख तळमळीचे अधिष्ठान होते.संत नामदेवांच्या भक्तीत उत्कटता उदात्तता आहे; पावित्र्य आणि मांगल्यही आहे. आर्त आणि ज्ञानी ही भक्तीची दोन्ही रूपे त्यांच्यामध्ये एकत्र दिसून येतात. त्यांची भक्ति ज्ञानाने डोळस झाली असून त्यांचे ज्ञान भक्तीने ओलावले आहे.

'श्रीहरि श्रीहरि ऐसे वाचे म्हणेन |

वाचा धरीसी तरी श्रवणी ऐकेन ||'

श्रावणी दाटशी तरी मी नयनी पाहीन |

ध्यानी मी ध्यायीन जेथे तेथे ||'

भक्ती अनिर्वाच्य खरी, तरीही तिला वाग्गोचर केलेली आहे. तीर्थयात्रेत असताना 'भक्तिमार्गाचे मर्म मला समजावून सांग' अशी ज्ञानदेवांनी नामदेवरायांना विनंती केली. त्यावेळी संत नामदेवांनी आपल्या अध्यात्मिक अनुभवाच्या बळावर चे भक्तीतत्व निरूपण केले ते अतिशय महत्त्वाचे आणि मूलगामी स्वरूपाचे आहे. त्यात एकूण नऊ मुद्दे आहेत.

१) भजनविधी,

२) सत्वशील नमनबुद्धी,

३) निर्विकार ध्यान,

४) श्रवण,

५) मनन,

६) निदिध्यासन,

७) भक्ती,

८) धृति व

९) विश्रांती.

या मुद्द्यांचे जे स्पष्टीकरण नामदेवरायांनी दिलेले आहे ते असे.
१) मी-तूं पणाचा भाव मावळून सर्व भूतमात्रांविषयी दया उत्पन्न होणे हेच खरे भजन. बाकी भजनाच्या नांवाखाली केलेला अन्य उद्योग म्हणजे निरर्थकता.


२) गुणदोष न पाहता सरसकट सर्वांशीच भेटेल त्याच्याशी नम्रतेने वागणे आणि त्यावेळी अंतरंग आनंदी राहणे हेच खरे नमन. बाकी सगळा दंभ.


३) विश्वात सर्वत्र ईश्वराची प्रचिती येणे आणि हृदयात ईश्वरी सत्तेचे अखंड स्मरण जागृत ठेवणे हेच निर्विकार ध्यान होय.


४) तल्लीन मनाने हरिकथा ऐकणे आणि मन-चित्त त्या ऐकण्यात दृढपणे ठेवणे म्हणजेच खर्‍या अर्थाने श्रवण होते.


५) आपल्या खऱ्या हिताचा विचार अखंड करीत राहणे हेच सत्वशील भजन होय.


६) जीवनातील सर्व प्रकारचे व्यवहार करीत असताना खंडात महत्त्वाचा आणि ईश्वराचा ध्यास लागलेला असणे हेच निदिध्यासन होय.


७) सर्वभावे ईश्वराचे ध्यान करणे, सर्व भूतमात्रांत परमेश्वराचे स्वरूप पाहणे, रज-तम मुक्त होऊन प्रेमाचा उपभोग घेणे हीच खरी भक्ती.


८) सदैव सत्त्वनिष्ठ असणे, असंग-एकटे राहणे म्हणजे सुखासाठी कोणत्याही बाह्य साधनावर वा परिस्थितीवर मुळीच अवलंबून न राहणे; प्रखरपणे विरक्त होणे, देहसुखाविषयी सर्वस्वी उदास होऊन जे प्रारब्धात असेल ते निमूटपणे भोगणे हीच धृति होय.


९)  मन हे निर्वासन, निर्विकल्प अवस्थेत ठेवणे आत्मलाभाची पूर्णप्राप्ती होणे अशा स्थितीत अनुरागपूर्वक एकचित्ताने ध्यान करणे हीच खरी विश्रांती.


संत नामदेवरायांनी सांगितलेले हे भक्तीचे विवेचन म्हणजे त्यातून त्यांनी ईश्वराच्या सर्वात्मकतेची जाणीव यावर आधारलेली जी खरी 'समता' तिचा पुरस्कार केलेला आहे. संत नामदेवराय हे केवळ भक्त नव्हते तर भक्तीचे यथार्थ रहस्य ते पूर्णपणे जाणणारे होते. संत ज्ञानदेवांनी त्यांच्या भगवत भक्तीच्या अभंगाचा गौरव केलेला आहे.

'सिंधुहुनी सखोल सुरस तुझे बोल |

आनंदाची ओल नित्य नवी ||'

नाम जरी स्वत: सिद्ध असले तरी सद्गुरुशिवाय ते हाती येणार नाही. 'नाम हे ईश्वराचे बीज आहे'. त्याला सतत स्मरणाचे पाणी घालून सदाचाराने देह-मन-रुपी क्षेत्र निर्मळ ठेवले म्हणजे ईश्वर कृपेचे पीक येते व साक्षात्काराने अनिर्वचनीय सुख प्राप्त होते.