भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, की माझी कथा श्रवण केली असता संसाराचे भय निघून जाते. त्याने अनन्यभावाने अत्यंत आदरपूर्वक माझे भजन करावे. माझा भक्त जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा तो जीवाच्या आकांताने माझा धावा करतो. माझा भक्त असा धावा करु लागला की, मला ते क्षणभरही सहन होत नाही. स्वभावताच जेव्हा त्याला असा पश्चाताप होतो, तेव्हा त्याच्यावर माझी कृपा होते. माझ्या कृपे वाचून माझी भक्ती कदापिही उत्पन्न होत नाही. प्राप्त विषय उपभोगांच्या वेळीही ज्याच्या अनन्य भजनात खंड पडत नाही, त्यालाच माझी पूर्ण कृपा म्हणतात. माझ्या कृपेचे हे मुख्य लक्षण समजावे. माझ्या भक्तीसाठी घर दार, स्त्री पुत्र, धन संपत्ती, व प्रसंगी स्वतःचा जीव प्राण वेचण्यास कचरत नाही. माझ्या भजना वरील अत्यंत प्रेमामुळे तो रात्रंदिवस माझे स्मरण करीत असतो व अनन्य भक्तीने स्वतःला मदर्पण करतात. वरचेवर तीच भक्ती करण्याचा त्याला कंटाळा येत नाही.
त्याला माझ्या भजनाचा उल्हास वाटतो. मला आपल्या हृदयात साठवून माझ्या भजनावर मनःपूर्वक प्रेम असले, म्हणजे सूर्यापुढे काजवा जसा निस्तेज होतो, त्याप्रमाणे भक्ताच्या सर्व इच्छा नाहीशा होतात. मी हृदयस्थ परमात्मा प्रकट होताच, सर्व विषय इच्छा दूर पळून जातात. मी प्रत्येकाचा अंतःकरणात स्थित असतो. परंतु भक्तांना भ्रांतीमुळे दिसत नाही. भक्तांनी माझी भक्ती करून तिचा नाश केला की, मी स्वयंभू श्रीपती हृदयात प्रकट होताच, भक्तांना अलभ्य लाभ होतो. मला नामस्मरणाने जागृत करून चैतन्य निर्माण करावे. म्हणजे संसाराचे संकट दूर होते. उद्धवा ! मी ज्याच्या हृदयात व्यक्त होतो, त्याच्या हृदयात मी मावत नाही. माझे स्वरूप काही लहान नाही. असा मी प्रकट झाल्यावर प्रपंच दृष्टीस पडत नाही. भेद त्रिपुटी गुणांसह मावळून जाते. व संसार रुपी पळून जाते. सूर्याची उष्णता लागताच तुपाचा कठीणपणा जसा नाहीसा होतो, तसा मी नारायण प्रकट होताच लिंग देहाचा न फोडता नाश होतो. माझ्या प्रकाशामुळे वासनांचे जाळे मुळासह उपटून पडते. व संशय जीवा भावासह नष्ट होतो. जेव्हा सूर्यापुढे जसा अंधकार नाहीसा होतो, तसाच कर्माचा क्षय होतो. व आपल्या कार्यासह गुणांचा नाश होतो. अज्ञानासह अविद्येचा लय होतो. शिवपणासह जीव नाहीसा होतो. व ज्ञान-विज्ञानाच्या ग्रंथीसह अहंकार नाश पावतो. तेव्हा सोऽहम् हंसाची बोळवण न करताच होते. जन्म मरण भयानेच पळून जाते. संसारावर पाणी पडते. अशा गहन भक्ती योगाने माझे भजन करून, भक्त आत्म भजनाने समाधान पावलेले आहेत. याप्रमाणे भक्ती ज्ञान आणि कर्म या तिन्ही योगातील हे भेद माझ्या प्राप्तीचे खरे वर्म आहे.
यामध्ये विशेष करून माझी भक्तीच श्रेष्ठ आहे. तिला दुसऱ्या कशाचीही जोड नाही. ती तात्काळ माझी प्राप्ती करून देते. माझे भजन केल्यावाचून माझे ज्ञान केव्हाही प्राप्त होत नाही. व कर्म मदर्पण जरी केले, तरी ते कर्मच होते. यास्तव मुख्य असलेले जे आत्मज्ञान, त्याला माझ्या भजनाची अपेक्षा असते. त्याच्या पुढे बिचाऱ्या कर्माला कोण विचारतो? माझ्या भजना वाचून गत्यंतरच नाही. सारांश, परमार्थाची जेवढी ज्ञान कर्मे आहेत, तेवढी माझ्या भक्तीनेच सफल होतात. त्या भक्तीचे माहात्म्य तुला सांगतो. ज्याला धर्माचरण करायचे समजत नाही, व ज्याने वैराग्य - ज्ञान मिळविले नाही, त्याने माझ्या स्वरूपात मन स्थिर करून, भक्तीने माझे भजन केले असता, ज्ञान कर्मादिकच नव्हे, तर स्वतः वैराग्य ही माझ्या भक्तीच्या पायावर लोटांगण घालीत शरण येते. इतकेच नाही तर ते भक्तीच्या पोटी जन्म घेतात. व ती लाडकी लेकरे लडिवाळपणे तिला मिठी मारून स्वानंदाचे मधुर चुंबन मागतात. याप्रमाणे भक्ती आपल्या मांडीवर ज्ञान-विज्ञान वैराग्य आदींना खेळवते. आणि त्यांना पूर्ण परमानंद रस पाजून स्वतः त्यांचे पोषण करते. अशी माझी भक्ती साध्य झाली की, ज्ञानदिक त्या भक्ताचे बंदे दास बनतात. स्वधर्म कर्म आदराने आचरले असता जे प्राप्त होते, खडतर तपाचरणाने जे साध्य होते, सांख्यज्ञानाच्या विचाराने जे ज्ञान हाती येते, विषय त्यागाने जे प्राप्त होते, अष्टांग योगाने जे लाभते, वायु जल पर्ण यांच्या सेवनाने जे साध्य होते, दान प्रसंगाने जे पावते, वेदाध्ययनाने जे लाभते, सत्य भाषणाने जे मिळते आणि इतर अनेक प्रकारच्या साधनांनी जे प्राप्त होते, ते सर्व माझ्या एका भजनाने मिळते. इतक्या सगळ्या कष्टकर साधनांच्या मागे न लागता, पर्वताच्या गुहा न शोधता, माझी भक्ती जर साध्य केली, तर ही सगळी फळे माझ्या भक्ताच्या दारात येऊन पडतात. ती भक्ती कोणती? ते तू ऐक.
'सद्गुरु साक्षात परब्रम्ह आहे' अशा भावनेने गुरुची सेवा करणे, हेच त्या श्रेष्ठ भक्तीचे सामर्थ्य आहे. सद्गुरूंच्या भक्ती वाचून साधकाला माझी प्राप्ती होत नाही. मी स्वतः भगवंतही जर गुरुभक्ती करतो, तर तेथे इतरांचा काय पाड! मीसुद्धा ज्या सद्गुरूच्या कृपेने एवढ्या श्रेष्ठपदाला पोहोचलो, त्या सद्गुरूच्या महिम्याला कसली उपमा द्यावी! अभेद भावाने सद्गुरुला परब्रम्ह मानून त्यांची भक्ती करण्या करणाऱ्यांची, मी शुल्लक इच्छाही पूर्ण करतो. ते वैकुंठ, स्वर्ग, मोक्ष इत्यादि काही मागतील ते देतो. हे काहीच नाही, त्यांच्या भजनाला मी इतका भाळतो की, त्यांच्या मागे पुढे निरंतर तिष्ठत उभा असतो. परंतु माझे भक्त इतके निरिच्छ असतात, की ते काही मागतील असे घडतच नाही.
काही घ्यायचे नाही असे ज्ञान ज्याच्या मनावर ठसते, जो असा निरपेक्ष व शुद्ध चित्ताचा असतो तोच खरा साधू मला मान्य आहे. जो निरपेक्ष धैर्यवान असतो, त्याच्या चरणांना मी शिरसा वंदन करतो. कोट्यावधी जन्मानंतरच हे ज्ञान प्राप्त होते. व मग निरपेक्षता अंगी बाणते. अपेक्षेपेक्षा अधिक श्रेष्ठ दुसरे कोणतेही साधन नाही. अशी निरपेक्षता प्राप्त झाली, म्हणजे माझ्या भजनाची अत्यंत आवड निर्माण होते. वेदामध्ये जिला एकांती भक्ती म्हटले आहे, तीच ही माझी चौथी भक्ती होय. देव आणि भक्त यांचा जेव्हा एकांत होतो, तेव्हा भक्त देवा मध्ये प्रवेश करतो. व देव भक्ताला अंतर्बाह्य व्यापतो. असे अभेदपणाने माझे भजन करतात, त्याला एकांत भक्ती म्हणतात. तो भक्त सगळ्या जगामध्ये माझ्यावाचून दुसरे काहीही पहात नाही. मी श्रीपती स्वतः त्या चारही पुरुषार्थासह मुक्ती देत असता, तो तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. असे माझे भक्त आपल्या तोंडाने काही मागतील हे कल्पांती ही घडत नाही. ते माझी भक्ती सोडून कैवल्य म्हणजे मोक्षही स्वीकारत नाहीत. निरपेक्ष आणि निर्विकार असलेला श्रेष्ठ पुरुष मला पूज्य असतो. ज्याच्या दृष्टीला मोक्ष केवळ भुसकटा सारखा दिसतो. त्याचा निरिच्छपणा त्रिभुवनात धन्य होय. निरपेक्ष पुरुषाला चारही पुरुषार्थ तुच्छ वाटतात. तो वैकुंठ कैलासादिक श्रेष्ठ लोकही आपली पायवाट समजतो. श्रेष्ठ देव त्याच्या पायाशी चालत येतात मग तेथे रिद्धी सिद्धीची काय कथा! कळिकाळ तर त्याचे अंगण झाडतात. भगवान शंकर स्वतः त्याच्यावरून लिंबलोण ओवाळून टाकतो. आणि मी स्वतः लक्ष्मीसहित त्याचा अंकित होऊन राहतो.
माझा निरपेक्ष भक्त माझ्यासारखाच समर्थ होतो. हे बोलणेही औपचारिक आहे. वास्तविक तो मद्रूपच झालेला असतो. मी परमात्मा परमानंद आहे. त्यामुळे माझा भक्त माझ्या भजनाने शुद्ध स्वानंद रूप बनतो. जेव्हा आम्ही दोघेही अभेद पणाने स्वानंदकंद, सच्चिदानंद, आत्म रूपच होतो. माझ्या भक्तीने असे संपन्न झालेले माझे भक्त इतरांचे गुणदोष कधीच पाहत नाहीत. जो विषयात भेद पाहत नाही, ज्याला समत्वाचे आत्मज्ञान असते. माझ्या भजनाने परमानंद होतो. त्यालाच शुद्ध साधू म्हणतात. सर्व भूतांमध्ये मी एक परमात्माच भरून आहे. व ज्याला कोठेही द्वैताची प्रतीती येत नाही, ही अशी जी भक्ती असते, तिलाच 'एकांत भक्ती' असे म्हणतात. जे एकाग्र मनाने माझ्या भजनात तत्पर असतात, ते प्रकृतीच्या परतीराला पोहोचून मंद्रूप होतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा.
- वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे .
हरी भक्त परायण म्हणजे कोण व कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह.भ.प. सुधाकर शंकर शेंडगे म्हणजे माझे मामा (अत्याचे मालक ). माझ्या आयुष्यात अध्यात्माची खरी ओळख घालणार्यामध्ये मामा यांचे स्थान वरच होते. त्यांना कधीही व कसलाही अध्यात्मिक प्रश्न विचारला असता त्यांनी तत्परतेने व आनंदाने त्याचे निरसन केले. संत वाङ्मय या विषयावर सखोल अभ्यास व श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांच्या हातून अनेक जड मूढ उधरून गेले. त्यांचे अगदी तामिळनाडू पर्यंत ख्याती गेली होती, व त्यांना गुरू मानणारा भक्त देखील तेथे निर्माण जाहले. त्यांचा जन्म म्हणजे "जगाच्या कल्याणा । संतांच्या विभूती ।।" या प्रमाणे होता ...
पद्मनाभ धोंडीराम पिसे, अधिवक्ता, उच्च न्यायालय, मुंबई.