शिवलिंग, रुद्राक्ष, भस्म व ज्योतिर्लिंग माहात्म्य

Updated: Sep 2


परम पुरुषाची हिंदु पौराणिक कथेत पंचरूपाने उपासना करण्याची परंपरा आहे. याला 'पंचदेवोपासना' म्हणतात. शिव-विष्णु-शक्ती-गणेश आणि सूर्य या पाचांचे गोल प्रतिक करतात. या पंचदेवांची उपासना लिंग बनवून केली जाते. अनेक मंदिरामध्ये शंकर पार्वतीच्या साकार मूर्ती असतात. परंतु येथेही लिंगस्थापना केलेली आढळते. अर्थात शिवलिंग शंकराचे निराकार स्वरुप आहे. त्यामुळे लिंगपूजा करण्याचाच प्रघात आहे. शिवाच्या ज्या भिन्न देवता आहेत, त्या साक्षात ब्रह्म नाहीत. त्या कारणाने त्यांचे निराकार लिंग प्रमाणित होत नाही. लिंग साक्षात ब्रह्माचे प्रतिक आहे.शिवलिंग : वराह काल्पामध्ये लिंगोद्भावाची एक कथा सांगितली आहे. दारुक वनात अनेक मुनीगण एकत्र रहात होते ते सर्व वैदिक कर्मकांड सावधानतेने करीत होते त्या ऋषीमुनींवर अनुग्रह करणेसाठी व त्यांना निवृत्तीमार्गाचा उपदेश करुन प्रत्यक्ष स्वरूप दाखविणेसाठी भगवान शंकर तेथे गेले. त्यावेळी ते दिगंबर अवस्थेत होते. तीन नेत्र, दोन भुजा, सोडलेल्या जटा, अत्यंत सौंदर्ययुक्त सुकुमार शरीर, विशाल वक्षःस्थल, उन्मत्तपणे चालले होते. त्यावेळी ऋषी मुनी वनात फळे, फुले, समिधा आणणेसाठी गेले होते. ऋषीपत्नींनी तो सुंदर तरुण दिगंबर अवस्थेत पाहिला. त्यांच्या अंतःकरणात विकार निर्माण झाला. कामवासनेमुळे त्यांचे चित्त विचलित झाले. त्यासंयमी होत्या, तपस्वीनी होत्या. तरीपण देहभान विसरून त्या परम पुरुषाच्या मागे मागे जाऊ लागल्या. त्यांची वस्त्रे अस्ताव्यस्त झाली, कांही स्त्रिया अर्धनग्नावस्थेत नाचू लागल्या व एकमेकींना अलिंगन देऊ लागल्या. हावभाव करुन नेत्र कटाक्षाने रुद्राला त्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करु लागल्या. त्यांनी गोल मंडल करून रुद्राचा मार्ग अडविला आणि म्हणाल्या, हे भुवन सुंदर ! आमच्यावर प्रसन्न व्हा. आपण कोण आहात ? कशासाठी आलात ? याठिकाणी विराजमान व्हा. परंतु भगवान शिव आत्मलीन झाले होते. त्यांनी झाले कुणाकडेही पाहिले नाही. ते असे चालत होते कीं, त्यांना पुढे स्त्रिया आहेत की पशु आहेत हे समजत नव्हते. ऋषीगण वनातून आश्रमाकडे परतले. त्यांनी आपल्या पत्न्यांना कामपीडित अवस्थेत पाहिले. त्यांच्यामध्ये कृष्णवर्ण दिगंबर अवस्थेत पुरुष पाहिला. मुनींना वाटले हा पुरुष आपल्या पत्न्यांना भ्रष्ट करीत आहे. म्हणून त्यांनी कांहीही विचार न करता त्याला क्रोधाने शाप दिला. तू या स्त्रियांच्यामध्ये दिगंबर राहून त्यांच्या न मर्यादेचा भंग केला आहे, म्हणून तुझे उपस्थ तात्काळ गळून पडेल. आणि गळून पडल्याक्षणीच ते प्रज्वलीत झाले. आणि मार्गात जे काही पडले असेल त्याला भस्म करीत सुटले. चारी दिशांना ते फिरु लागले. ते पाहून सर्व ऋषी-मुनी भयग्रस्त झाले. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. आणि प्रार्थना करु लागले हे सृष्टीकर्ता ! कृपा करुन आपल्या सृष्टीला वाचवा. हे नीललोहिताचे गळून पडलेले लिंग एवढे गतिमान झाले आहे की, ते त्रिलोकाला भस्म करुन टाकेल. ब्रह्मदेव म्हणाले, हा रुद्र आहे. माध्यान्हकाळात परिगृहहीन दिगंबर, निर्दोष अच्युताचा आतिथ्यपूर्वक सन्मान करण्याऐवजी आपण अविचाराने त्यांना शाप दिला हा तुमचेकडून मोठा अपराध घडला. सर्व मुनींनी शरणागती पत्करली. त्यांनी त्या लिंगाचे बारा भाग केले. तरीही ते सर्व पृथ्वीवर हाहा:कार माजवू लागले. शेवटी सर्वांनी मिळून भवानी पार्वतीची आराधना केली. जगदंबा प्रगट झाली. तिला ऋषी-मुनींची व सृष्टीविनाशाची दया आली. तिने योनीरुपा होऊन ते लिंग धारण केले. मग सर्व ऋषी-मुनींनी त्या शांतलिंगाचे अर्चन केले. तेव्हांपासून ठिकठिकाणी पडलेली ही लिंगे बारा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाली. या कारणाने शिवलिंग शिश्नाकारी मानले जाते. वामाचार, योगाचार आणि शिवपूजक संप्रदायात शिश्नाकार लिंगाची अर्चना केली जाते. सर्व भक्तांवर कृपा करण्याच्या उद्देशाने भगवान शंकर नाना प्रकारे लिंग धारण करतात. जो सिद्धीची इच्छा करतो, त्याने शिवलिंग पूजन करावे. या भू-मंडलावर जितकी शिवलिंगे आहेत त्यांची गणना करणे अशक्य आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने मानवाचा उद्धार होतो. लिंगपूजा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे.


शिवलिंग फल : भिन्न पदार्थाने बनविलेल्या लिंगापासून विभिन्न फल शास्त्राने प्रतिपादन केले आहे. कस्तुरी आणि चंदनाने बनवलेले शिवलिंग शिवसायुज्य प्राप्त करुन देते. जवस, गहू आणि तांदुळ या तिन्हीचा आटा समान घेऊन जे शिवलिंग बनवले जाते त्याच्या पूजनाने स्वास्थ, संपत्ती आणि संतान मिळते. साखरेच्या शिवलिंगाची पूजा रोगापासून सुटका करते. सुंठ, मीरची, पिंपळाचे चूर्ण व मीठ एकत्र मिसळून केलेल्या शिवलिंग उपासनेने वशीकरण, व्यभिचार कर्मासाठी केला जातो. भिगेतीळाचा पिस करुन बनवलेले शिवलिंग अभिलाषापूर्ति करते. यज्ञकुंडातल्या भस्मापासून तयार केलेल्या शिवलिंगाच्या पूजेने अभिष्ट फल प्राप्त होते. कोणाचेही प्रेम संपादन करणेसाठी गुळापासून शिवलिंग करून पूजन करावे. सुख-शांती प्राप्तीसाठी चीनी मातीचे शिवलिंग पूजावे. लक्ष्मी आणि सुख प्राप्ती लोण्याच्या शिवलिंग पूजनाने होते. आवळ्याच्या पीठाचे शिवलिंग पूजेने मुक्ती मिळते. वृक्षाच्या पानापासून केलेल्या शिवलिंग पूजनाने स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते. दुर्वांकुर शिवलिंगाकार गुंफून पूजा केलेने मृत्युचे भय नष्ट होते. कापूरापासून बनवलेले शिवलिंग पूजेने भक्ती व मुक्ती मिळते. लोहापासून केलेल्या शिवलिंगाच्या पूजनाने सिद्धी मिळते. मोत्याच्या शिवलिंगाचे पूजन स्त्रीचे भाग्यवृद्धि करते. सुवर्णाच्या शिवलिंग पूजेने समृद्धी प्राप्त होते. चांदीचे शिवलिंग धनधान्य प्राप्त करून देते. पितळेचे शिवलिंग दारिद्र्य नष्ट करते.
शिवलिंग पुष्प पूजा : शिवलिंगाची विविध फुलांनी केलेली पूजा विभिन्न फल देते. दुर्वा पूजनाने आयुष्य वृद्धि, धोत्र्याच्या पूजनाने पुत्रप्राप्ती, तुळशीदलाच्या पूजेने भोग व मोक्षप्राप्ती, बेलाच्या पूजनाने सुलक्षणी पत्नी, जाईच्या पूजनाने अन्नपूर्णा प्रसन्न होते. कण्हेरीच्या पूजनाने वस्त्रप्राप्ती होते. सर्वात जास्त बेलाच्या फुलाच्या वाहण्याने भगवान शंकर तृप्त होतात. फक्त चाफा आणि केवड्याची फुले सोडून बाकी सर्व फुले पूजेसाठी ग्राह्य ठरतात. त्याचप्रमाणे जलधारेचेही महत्व शास्त्रात सांगितले आहे. जलधारा भक्तीभावाने समर्पित करणाया मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात. ज्याची बुद्धि क्षीण झाली असेल त्या अवस्थेत उपासकाने साखर मिश्रित दूधाची धारा समर्पित करावी. बिल्ववृक्ष भगवान शंकराचे रूप आहे. तिन्ही लोकांत जितकी तीर्थे प्रसिद्ध आहेत, ती सर्व तीर्थे बिल्व वृक्षाच्या मुळाशी निवास करतात. तेथे अविनाशी लिंगस्वरूप महादेवाची गंध, पुष्प, फळांनी पूजा करून जो नित्य दीप लावतो. तसेच अन्नदान करतो व बिल्व वृक्षाचे झाड लावतो त्याच्या सर्व कुळांचा उ