आपल्या हिंदुधर्मात प्राचीन कालापासून हिंदूंची काही बाह्यलक्षणे किंवा संकेत सांगितले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कपाळी गंध, जानवे (यज्ञोपवित), तुळशीमाळा, कानाला भोक असणे आणि डोक्यावर शेंडी असणे यावरुन तो कट्टर हिंदु आहे असे मानतात. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधनेने निसर्गाचा म्हणा अथवा संपूर्ण ब्रह्मांडाचा परिपूर्ण अभ्यास करुन मानवाच्या जीवनाशी निगडीत असणारे काही निसर्गनेम आखून दिले. जेणेकरुन मनुष्याचे आयुरारोग्य दीर्घकाल व आनंदमय होऊ शकेल. हिंदुधर्मातील वर्षभरात येणारे सणवार हे त्याच कल्पनेने साकारले आहेत. प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे मानवांनी त्या त्या निसर्गमय वातावरणाशी एकरुप होऊन आपला आहार, विहार व विचार यांचे संतुलन ठेवल्यास शरीर संपत्ति सुदृढ व निरोगी राहते. समष्टीतील पंचमहाभूताचे व आपल्या शरीरातील सूक्ष्म पंचमहाभूतांचे व्यष्टीतील अतूट नाते लक्षात घेता निसर्गातील अनेक उपचार आपल्या शरीराचे पोषणच करतात असे दिसून येते. शेंडी म्हटले की, आपल्याला पुराणातील नारदमुनींची आठवण येते. नारदमुनी म्हणजे त्रिभूवनात भ्रमण करणारे सर्वांचे मित्र. एवढेच काय पण देवांच्या शत्रूचेही मित्र होते. त्यांना कुठेही मज्जाव नसे. कारण तिन्ही लोकांच्या बातम्या त्यांना सर्वांच्या आधी मिळत होत्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची शेंडीच होय. सध्या कलियुगात टेलिव्हिजन सुरु करण्यासाठी जशी डिश अँटीनाची जरुरी असते त्यामुळेच वातावरणातील सर्व लहरी एकत्र खेचून त्याद्वारे टी. व्ही.चे दर्शन आपणाला होते. तसेच रेडिओला सुद्धा जरुरी असते त्यामुळे ध्वनिक्षेपण ग्रहण करण्याची क्षमता त्यात असते. सध्या मोबाईलला पण शेंडीची आवश्यकता असते. मोबाईल कंपनीने अनेक गावात जे टॉवर (मनोरे) उभे केले आहेत तो पण एक शेंडीचाच भाग आहे.
तद्वतच या शेंडीच्या द्वारे नारदमुनींना सर्व ब्रह्मांडातील समाचार इत्यंभूत अवगत होत असे. त्यांचे आकाश मार्गाने भ्रमण असे. आणि आकाशाचा गुण शद असल्यामुळे त्या वातावरणातील लहरी यांच्या शेंडीद्वारा त्यांना सर्वांच्या आधी कळत आणिं तशा बातम्या ते सर्व देवांना पोहोचवित असत. त्यांच्या कळ लावण्याच्या स्वभावामुळे विनाश टळून उद्धारच झाला. हे महत्त्वाचे कार्य लक्षात असू द्यावे. शेंडी आपल्या ज्ञानशक्तीमध्ये चैतन्य निर्माण करुन त्याची नेहमी अभिवृद्धि करते. आणि हे तत्त्व आता विज्ञानाच्या दृष्टिने सुद्धा मान्य केले आहे. कुठलीही काळी वस्तु सूर्याच्या किरणातील ताप आणि शक्ती त्वरित आकर्षित करते. या तत्त्वाला सिद्ध करण्यासाठी एक पांढरे व एक काळे वस्त्र भिजवून उन्हात ठेवले असता काळा कपडा अगोदर वाळतो म्हणून उन्हाळ्यात काळे कपडे परिधान केल्यास सूर्याची उष्णता शरीराला तापदायक होते. व पांढरे कपडे घातले असता सूर्याचे किरण परावर्तित होतात. त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण सम राहते. दुसरे असे की, जगातील कुठलाही अल्पांश हा आपल्या महान अंशी मिसळून पूर्ण होतो. उदा. सर्व नद्या अतुल जलराशी समुद्रात मिळून शांत होतात. किंवा जीव आपल्या कर्माने परमेश्वरात लीन होतो कारण तो त्याचाच अंश असतो. दिवा लावला असंता तो तेजाच्या शक्तीचा अंश असल्यामुळे नेहमी दिव्याची शिखा (ज्योत) उर्ध्वगामी असते. त्याचप्रमाणे आपली बुद्धी शास्त्रानुसार सूर्याचा अंश मानली आहे.
आपण रोज ॐ भूर्भुव: स्व: आदि गायत्री मंत्राने आपल्या बुद्धीला जागृत करण्याकरिता भगवान सूर्याची उपासना करतो. आणि भगवान सूर्य आपणाला बुद्धि (ज्ञान) दान करा म्हणतो. याचदृष्टीने बुद्धीचे केंद्र आपल्या मस्तकाचा जो शिरोभाग आहे त्याठिकाणी गाईच्या खुरा एवढा केसांचा एक गुच्छ ठेवला जातो त्याला शेंडी (शिखा) असें म्हणतात. शिखा स्थानाच्या खाली मज्जातंतुद्वारा निर्मित एक बुद्धिचक्र आहे. त्या समीप ब्रह्मरंध्र आहे. आणि त्या दोन्हीच्या वर सहस्रदल कमलामध्ये अमृतरुपी ब्रह्माचे अधिष्ठान आहे. येथूनच जीव योगमार्गाने परब्रह्माशी एकरुप होतो. शास्त्रविधीनुसार जेव्हा मनुष्य त्या परमात्म्याचे ध्यान किंवा शास्त्राध्यायन करतो तेव्हां त्या अधिष्ठानाशी संबंध असणारे अमृततत्त्व जिला सतरावी कला म्हणतात ते वायुवेगाने या सहस्रदल कर्णिकेमध्ये प्रविष्ट होते. तेव्हां ते अमृततत्त्व तेथेच न थांबता आपले केंद्रस्वरुप भगवान सूर्यामध्ये लीन होण्याकरिता शिरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते परंतु शेंडीची गाठ मारल्यामुळे त्या ग्रंथीला थटून तो विद्युतप्रवाह स्वरुप अमृततत्त्वाचा स्रोत परत येऊन सहस्रदल कर्णिकमध्येच स्थित होतो. म्हणजे ते तत्त्व अंतरिक्षातच विलीन होते. याच दृष्टीने मन्वादि धर्मशास्त्रकारांनी स्नान, संध्या, जप, होम, स्वाध्याय, दान आदि कर्मविद्याच्या समयी शेंडीला ग्रंथी (गाठ) मारुनच विधि करावा असे म्हटले आहे.
स्नाने दाने जपे होमे संध्यायां देवतार्चने
शिखाग्रंथि सदा कुर्यादित्येतन्मनुरब्रुवीत ।।
पुढील प्रसंगी शेंडीची गाठ सोडून कर्म करावे.
शौचे च मुखमासीन प्राङ्मुखो वाप्यु दङ्मुखः।
शिरः प्रावृत्त्य कर्णौच मुक्त कच्छ शिखोऽपिवा ॥
मलत्याग प्रसंगी शिर (डोके) आणि कानाला वस्त्र गुंडाळून शेंडी तसेच वस्त्रांची ग्रंथी शेंडीची गाठ व वस्त्राचा कासोटा सोडून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करुन समतोल भूमीवर शौचास बसावे. शारिरीक विज्ञानानुसार ज्यास्थानी शिखा (शेंडी) आहे त्याच्याखाली एक विशेष प्रकारचा रस तयार होतो. आणि तो स्नायुद्वारा संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त होऊन शरीराला बलशाली बनवून त्याची वृद्धि करतो. आणि यादृष्टीने शिखाग्रंथीद्वारा आपल्या कर्माचरणामध्ये सहाय्यता प्राप्त होते. आणि ते चिरकालपर्यंत आपले कार्य करते. त्यामुळे मानव दीर्घकालापर्यंत शांत व स्वस्थ असे आपले जीवन जगतो. त्या पुरुषाची ज्ञानशक्ती कधीच क्षीण होत नाही. कांही भारतीय विद्वानांच्या मते संपूर्ण मानव शरिरामध्ये एक मुख्य नाडी आहे. तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. ती शेवटी आपल्या मस्तकात म्हणजे ब्रह्मरंध्रात जाऊन समाप्त होते. आणि त्या नाडीचा मुख्य रंध्रभाग शिखास्थलाच्या खाली प्रफुल्लित होतो. तो भाग म्हणजेच ब्रह्मरंध्र होय. आणि तेच बुद्धीतत्त्वाचे मुख्य केंद्र आहे. साधारण अवस्थेमध्ये जेव्हा आपल्या शरीरावरील केस (रोम) घामाच्याद्वारा शरीरातील उष्णता बाहेर फेकतात तेव्हां त्याचा मुख्य भाग शेंडीमध्ये असतो. त्यांची ग्रंथी (गाठ) बांधली असता तेतेज शरीरातच राहून मन, शरीर, मस्तक यांना अधिक उन्नत बनविते. म्हणून सुषुम्नेतील केंद्राची रक्षा करण्याकरिताच शिखा (शेंडी) धारण करावी. मानव शरीराला प्रकृतीने एवढे सबल बनविले आहे की, साधारण केवढाही आघात किंवा मार लागला तरी मनुष्य जिवंत राहू शकतो. परंतु शरीरातील असे कांही स्थान आहे की, तेथे मार लागला असता मनुष्याचा प्राण जातोच अशा स्थानाला मर्मस्थान म्हणतात. अशा ठिकाणी शेंडीचा भाग अगदी कोमल असून ते वर्मस्थान आहे.
मस्तकाभ्यन्तो परिष्ठात् शिरातन्धि सन्निपातो ।
रोमावर्तोऽधिपति स्तयपि सद्यो मरणं ।। -सुश्रुत ६७१
अर्थ - मस्तकाच्या वर जेथे केसांचा आवर्त आहे तेथे संपूर्ण नाडी आणि संधीचा मेळ आहे. तेथे मार लागला असता माणसाचा तत्काळ मृत्यु होतो. शेंडीची जागा अत्यंत कोमल तसेच सद्योमारक मर्मस्थानाचे कवच आहे म्हणून शिखा अवश्य धारण करावी. शेंडी आर्य (हिंदु) जातीचे एक पवित्र सामाजिक चिन्ह आहे. शिखा असणाराच हिंदु असतो.
शेंडीचे अध्यात्म -
मन झोपेची करुनी शेंडी । लाठीच्याही ठोकूनी तोंडी।
काळ मोडून टाकील मुंडी। कितीही आल्या झुंडीच्या झुंडी ।
सोडविना कोणी सद्गुरु वाचोनी । पहा तपासूनी संतु म्हणे ॥१॥
शेंडीच्या नादाने किती ते फसले । फसले अवघे जन त्रैलोकीचे ।
तुका वाणीयाने शेंडीशी बांधले । कधी नाही भ्याले रात्रंदिन ।
संतु म्हणे ऐसी शेंडी ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ॥२॥
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची । नारद मुनीची असेच की।
जेव्हां कोठे कांही कळही मिळेना । तेव्हा ती कडाडे आपोआप
संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे । शरण त्यानी जावे सद्गुरुशी ॥३॥
आणिक शेंडीने फसविले कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।
कुंभकर्णाशी होती झोप फार । तेणे तो आहार फार करी ।
संतु म्हणे शेंडी नसावी बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ॥४॥
झोपेत असताना दिले दान । राजा हरिश्चंद्राने साडे तीन भार ।
भार सुवर्ण होईना ते पुरे । पुरे सर्व देऊन घेतले स्वतच विकून ।
. संतु तेली म्हणे हो म्हणे ही झोप । हिचा सर्वाही करा करा कोप ॥५॥
मनो सुविचाराची करुनी कातर । शेंडीस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।
लाठीचा आधार तिला फार हो लाठी। फिरे गरगरा जोराने हो फिरे गरगरा ।
मन पवन चाले तोयाने हो मन पवन चाले। संतु वा म्हणे हो म्हणे ही कातर हो ।
धरावी ध्यानी ध्यानी सर्वांनी ॥६॥
हल्ली पाश्चात्य संस्काराने आजची तरुण पिढी ग्रासून गेली आहे. आपण सिंह आहोत हे विसरुन ते शेळी बनले आहेत. आपल्या हिंदुधर्माचे तत्त्वज्ञान प्रगल्भ आहे हे जाणून पाश्चात्य विद्वानांनी त्याचा परिपूर्ण अभ्यास करुन त्यांनी सुखाचा मार्ग स्विकारला, अनुभवला. कालाच्या ओघात भारतीय संस्कृति व तिचे महत्त्व नष्ट होत चालले आहे. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. नखशिखान्त असा शब्दप्रयोग आपण नेहमी करतो. याचा अर्थ पायाच्या आंगठ्याच्या नखापासून ते डोक्यावरच्या शेंडीच्या टोकापर्यंत असा आहे.
Comentarios