top of page

हिंदी भाषेचे आद्यकवी - संत नामदेव

- संकलन : वै. ह. भ. प. सुधाकर शेंडगे


इ. स. १२७० ते १३५० असे ऐंशी वर्षांचे आयुष्य संत नामदेवांना लाभले होते. या कालावधित त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून काव्य निर्मिती केली. आणि महाराष्ट्र व उत्तरभारत या प्रदेशात भागवत धर्माच्या प्रचाराचे कार्य केले. मराठी भाषेत अनेक संतांनी नामदेव चरित्रपर आख्याने लिहिलेली आहेत. हिंदी भाषेत देखील स्वतंत्रपणे व कित्येकांनी भक्ताच्या मालिकेत नामदेव चरित्र कथन केलेले आहे. नामदेवांचा हिंदी भाषेतील प्राचीनतम चरित्रकार अनंतदास नामदेवकी परछाई हे चरित्र त्याने इ. स. १५८८ मध्ये लिहिले. मराठीतील नामाजीच्या भक्तमालेतही इ. स. १६०० साली त्या ग्रंथात नामदेव चरित्र येते. विशेष आश्चर्य म्हणजे अनेक चमत्कार, दंतकथा आणि आख्यायिका हिंदी आणि मराठी भाषातील चरित्रात समान आहेत.संत नामदेवांसंबंधी अलिकडेच संशोधन झाले. कलव्हर्ट या पंडीताने भारतात सर्वत्र भ्रमण करुन संत नामदेवांच्या हिंदी पदांची पुरातन हस्तलिखिते गोळा केली. या हस्तलिखितांच्या आधाराने त्याने हिंदी पदावली ऑफ नामदेव हा ग्रंथ इ. स. १९९० साली प्रसिद्ध केला. त्यामध्ये नामदेवांची २५८ हिंदी पदे दिली असून पंजाब, राजस्थान या भागातील भक्ति साहित्यातील भाषेच्या तुलनेने या पदांची भाषा पुरातन असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. त्याला उपलब्ध झालेल्या प्राचीनतम हस्तलिखिताचे लेखन इ. स. १६२५ मध्ये झालेले असून राजस्थानात १६५० पासून नामदेव साहित्य प्रचलित आहे. विशेष म्हणजे पंचबानी या दादूपंथाच्या प्रमाणग्रंथात सर्वच हस्तलिखितांचा प्रारंभ संत नामदेवांच्या पदांनी होतो.


उत्तर भारतातील विद्वान संत कबीर हेच हिंदी भाषेचे आद्यकवी असे आजपर्यंत मानत होते. परंतु संत नामदेवांचे पुरातन साहित्य उपलब्ध झालेने तसेच संत कबीर यांच्या साहित्यात संत नामदेवमहाराजांच्या साहित्याचा प्रभाव असलेने सर्व विद्वानांनी संत नामदेवमहाराज हेच हिंदी भाषेचे आद्यकवी असल्याचे मान्य केले आहे. तसेच संत कबीराचा काल हा नामदेवमहाराजांच्या उत्तर कालात सुरु झाल्याने उत्तर भारतातील संत मीराबाई, संत नरसी मेहता यांनी आपल्या अभंगवाणीत संत नामदेवांचे वर्णन केलेले आहे हेही ध्यानात येते. हिंदी साहित्याचा उद्भव महाराष्ट्रातूनच झाला असेही विद्वानांनी मान्य केले आहे. ज्ञानदेव हे नामदेवांचे श्रद्धास्थान, ज्ञानदेवांच्या व त्यांच्या भावंडांच्या समाधी प्रसंगी त्यांनी लिहिलेले अभंग हे मराठी साहित्याचे अमर लेणे ठरले आहे. ज्ञानेश्वरमहाराज आपली गुरुपरंपरा

आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा | मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ||

पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ अशी सांगतात. विसोबा खेचर हे संत नामदेवांचे गुरु व संत सोपानदेवांचे शिष्य, म्हणजे ज्ञानेश्वरांप्रमाणेच नामदेवांची गुरुपरंपरा नाथ संप्रदायाची ठरते.वैदिक संस्कृतीची आणि वेदोक्त धर्माची परंपरा बरीच पुरातन आहे. धर्म आणि अध्यात्म विषयक ज्ञान यांचा संग्रह संस्कृत भाषेतूनच झाला पाहिजे असा परंपरेचा आग्रह होता, आणि केवळ उच्च वर्णियांना अध्यात्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असे. त्यामुळे सामान्य लोक या ज्ञानापासून दूर राहिले. म्हणून संत ज्ञानेश्वरमहाराजांनी त्या प्रतिकूल परिस्थितीतही गीतेचे निमित्त करुन मराठी, भाषेतून अध्यात्मज्ञान दिले हेच तत्त्व ज्ञानेश्वरांच्या पूर्वी पाचशे वर्षे सिद्धांनी अमलात आणले. त्यामुळे सिद्ध आणि संत यांच्या साहित्य निर्मितीची व कार्याची प्रेरणा समान होती हे निदर्शनास येते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय विठ्ठलाची सगुणोपासना करणारा असला तरी नाथ संप्रदायातील राम संकल्पनेच्या विटेवर उभा होता.


आठव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत निरनिराळ्या संप्रदायाच्या सिद्धांनी साहित्य निर्माण केले अशी माहिती मिळते. सिद्ध भिन्न काळात होऊन गेले असल्यामुळे त्यांच्या भाषेवर काळाचे आणि प्रादेशिक बोलीचे संस्कार झालेले आहेत. नाथसंप्रदायाचे नाते हे महाराष्ट्राशी अधिक जिव्हाळ्याचे होते. कारण, नाथसंप्रदायाची गुरु शिष्य परंपरा महाराष्ट्रात अखंडितपणे दीर्घकाळ नांदत होती. गोरखनाथांनी या संप्रदायास अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख स्वरुप दिले. धर्म आणि दैवत यांच्या कल्पना व्यापक करुन विश्वात्मक देवाची धारणा प्रसृत करण्याचे कार्य या संप्रदायाने केले आहे. महाराष्ट्र ही दीर्घकाळ नाथसंप्रदायाची कर्मभूमी होती. सिद्धांच्याच वाणीतून काव्यरचना करण्याची परंपरा वारकरी संप्रदायाने सांभाळलेली आहे. संत नामदेवापासून ते संत तुकारामपर्यंत सर्व संतांनी हिंदी कवने रचलेली आहेत. मराठी भाषेत अभंग रचना करुन हिंदी भाषेतही अभंग रचना करण्याची परंपरा फक्त महाराष्ट्रातच आढळते. इतर प्रांतामधील संतांनी त्या त्या भाषेच्या व्यतिरिक्त अन्य भाषेत अभंग रचना केल्याचे आढळत नाही. त्याकाळी कुठल्याही प्रांताची हिंदी भाषा नव्हती. त्याचा जन्म हिंदी भाषी प्रदेशाच्या बाहेर झालेला असून त्याच्या साहित्य निर्मितीचा प्रारंभही हिंदी प्रदेशा बाहेर झाला आहे.


महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे थोर अध्वर्यु संत नामदेवमहाराज हे हिंदी साहित्याचे आद्यकवी आहेत हे आता सर्वमान्य झालेले आहे. खडीबोलीवर आधारलेली नागरी हिंदी महाराष्ट्रात जन्माला आली. तेराव्या शतकातच संत नामदेवांनी हिंदी भाषेतून काव्य रचना सुरु केली. सिद्धांच्या भाषेतून विकसित झालेली भाषा संत नामदेवांच्या हिंदीसदृश काव्यात सुरक्षित राहिलेली दिसून येते. हिंदी भाषेचे प्रादेशिक भेद असलेल्या व्रज, अवधी या भाषातून देखील नामदेवांच्या काळात साहित्य निर्मिती झालेली नव्हती. अमीर खुसरों आणि पृथ्वीराज रासो यांची भाषा देखील सोळाव्या-सतराव्या शतकानंतरची आहे. खडी बोलीवर आधारलेल्या भाषेत साहित्य रचना प्रथम नामदेवांनी केली असे विद्वानांचे मत आहे.आठव्या शतकापासून सिद्धांचा काल मानला जातो ते जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या समकालीन असल्याचे समजते. सर्व प्रमुख सिद्ध मिळून ८४ मानले जातात. या सिद्धांची परंपरा संत ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन मिळते म्हणजे सिद्धांचा एक उपपंथ म्हणून नाथ संप्रदाय प्रसिद्ध झाला हे नाथ पंथीय सर्व भारतभर भ्रमण करीत असत. त्यामुळे प्रत्येक भाषेचे ज्ञान त्यांना अवगत झाले होते. उत्तर, भारताची संक्रमणा करुन ते पुन सह्याद्री पर्वत ओलांडून महाराष्ट्रात स्थायिक होत असत. त्यांनी सर्व भाषेचा अभ्यास करुन या सर्वांना. जोडणारी संग्रमण कालीन भाषा निर्माण केली. कित्येक विद्वान या भाषेला सधुक्कडी भाषा किंवा संधा भाषा या नावाने संबोधतात. ज्ञानदेवादि भावंडांचे एकही हिंदी कवन संहितेत आढळत नाही. कारण ज्ञानदेवांच्या समाधीनंतर दहा वर्षांच्या कालावधीत उत्तरेकडून मुसलमानी लष्कराचे आक्रमण झाले. त्यांनी देवगिरीची राजवट नष्ट केली. त्याची झळ उभ्या महाराष्ट्राला पोचली. राजकीय असुरक्षितता आणि सामाजिक अस्थिरता. यामुळे इ. स. १३५० ते १५५० या दोन शतकातील मराठी साहित्य कालौघात बऱ्याच अंशी नष्ट झाले. ज्ञानदेवांच्यासमाधी नंतर संत नामदेवांचे वास्तव्य महाराष्ट्राबाहेर होते. राजस्थान, पंजाब, घुमान येथे त्यांना मोठा अनुयायी वर्ग लाभला होता. शिखांच्या ग्रंथसाहेबात संत नामदेवांची एकसष्ट पदे समाविष्ट झालेली होती. त्यामुळे तीन शतके त्या अनुयायांनी नामदेव साहित्य जपून ठेवले त्यामुळे ते पुढच्या पिढ्यांना उपलब्ध झाले.


ज्ञानाचा प्रसार आधुनिक युगाच्या पूर्वकाळात मौखिक परंपरेने होत असे. समाज प्रबोधनाचे कार्य यशस्वी होण्यासाठी लोकभाषेचे माध्यम सिद्धांनी स्विकारले. सहाजिकच लोकछंद आणि लोकगीतांची पद्धती सिद्ध साहित्यात रुढ झाली. दोहा, चौपाई, चर्यागीती या छंदाबरोबरच निरनिराळ्या रागातील पदेही सिद्धांच्या साहित्यात आढळतात. अरु, कामोद, गऊडा, गुंजरी, देशाख, धनासी इ. राग शास्त्रोक्त पद्धतीने उचलले. या संगीतावर आधारलेला पद हा रचनाबंध प्रथम मराठी भाषेतून संत साहित्यात योजलेला आढळतो. आपल्या संतांनी रागविस्तार केला. त्याचे गायन भजनाच्या निमित्ताने होत असे. उदारवृत्ती जागृत करणारे साधन या दृष्टीने संतांनी आपल्या साहित्यात गेय, छंद आणि रागदारीतील पदे यांना स्थान दिले. सरहपा आणि गोरखनाथ यांची कूट पदे संहिता विभागात दिलेली आहेत. नाथांची भारुडे आणि शाहीरांच्या भेदिक लावण्या याच परंपरेतून आलेल्या आहेत.


संत नामदेव हे भाषा प्रणालीच्या दृष्टीने सिद्धांच्या वाणींच्या संगमावर उभे आहेत. तसेच ते नागरी हिंदी आणि दखनी या भाषेच्या गंगोत्रीच्यास्थानावर देखील उभे आहेत. सिद्धांची विचार प्रणालीच नव्हेतर भाषापद्धती देखील मराठी संतांच्या साहित्यात संक्रमित झालेली आहे. आदिनाथ सिद्धापासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत व पुढे नामदेव-कबीर आणि गुरुनानक अशी परंपरा आहे.संत नामदेवमहाराज हे महाराष्ट्रातील सगुण भक्तीचे प्रणेते असलेने त्यांनी लहानपणापासूनच सगुण भक्तीने देवाला आपलेसे केले होते. सतत ते देवाशी संवाद करीत असत. ज्ञानेश्वरमहाराजांनी भगवद्गीतेवर मराठीतून टीका केली. ती त्यांनी आपल्या जीवनातील एक महान कार्य व ध्येय पुढे ठेऊन ठरवून केली. त्याचबरोबर अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानप्रचूर आहे. त्यांची भाषा व संत नामदेवांची भाषा त्यांच कालात असून सुदधा भिन्न वाटते कारण संत नामदेवांच्या सगुणोपासनेमुळे त्यांच्या अभंगाचे बोल त्यांच्या हृदयातून प्रकट झाले तसे त्यांनी लिहून काढले ते आपोआप निर्माण झालेले भक्तिप्रधान शब्द होते तसेच शब्द ज्ञानेश्वरांनी हरिपाठातून व्यक्त केलेले आहेत ती भाषा साधी सोपी आणि त्याच काळातली आहे हे सर्वांना श्रुत आहेच. सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुण भक्तीकडे जाता येत नाही. संत नामदेवांना संत विसोबा खेचर यांनी गुरुपदेश केल्यानंतर नामदेवमहाराज निर्गुण भक्तीकडे वळले. व उत्तर हिंदुस्थानात त्यांनी निर्गुण भक्तीचाच प्रसार केला. उत्तर भारतात सर्व संतांनी निर्गुण भक्तीची कास धरली होती. व त्यांच्या उपासनेत विश्वात्मक परमेश्वर म्हणजे राम हा होता संत नामदेवांनीही उत्तर भारतात १९ वर्षे वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी विठ्ठलाबरोबर रामनामावर जास्त भर दिला आणि राम व विठ्ठल एकच आहेत हे पटवून दिले. कांही संतांनी कृष्ण भक्ती केली परंतु या दोन्हीत सगुण व निर्गुण भक्तिच अभिप्रेत होती. हेच विचार उत्तर भारतात संत नामदेवांनी आपल्या हिंदी अभंग रचनेतून साकार केल्यामुळे त्यांचेच अनुकरण उत्तर भारतीय संतांनी हिंदी अभंगातून केल्याचे आढळते. त्यांच्या अभंगात संत नामदेवांचे वर्णन आवर्जून करणेत आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता संत नामदेवमहाराज हेच हिंदी भाषेचे आद्यकवी आहेत हे ध्यानात येते.खालील ग्रंथांच्या आधारे हा लेख संकलन केला आहे.

(संदर्भ - साहित्यसेतू - लेखक श्रीधर रंगनाथ कुलकर्णी. प्रकाशक राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.

(२) भक्तिकोश – भारतीय संत - लेखक डॉ. शंकर वासुदेव अभ्यंकर, प्रकाशक आदित्य प्रकाशन, पुणे.)


- संकलन : ह. भ. प. सुधाकर शेंडगे


373 views0 comments

Comments


bottom of page