संत नामदेवांच्या चमत्कारातील विज्ञान

Updated: Oct 17, 2020

भक्तशिरोमणी संत नामदेव रायांच्या चरित्रात बालपणापासून त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक अद्भुत घटना वर वर पाहणाऱ्यांना व  नवविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना या भाकड कथा वाटतात. व श्रद्धावान त्या घटनांवर विश्वास ठेवून नामदेवरायांना वारंवार प्रणाम करतात. संत नामदेवरायांच्या चरित्रातील बऱ्याच  चमत्कारांचा योगशास्त्रीय दृष्टीने उलगडा करणे फारसे कठीण नाही.

चमत्कार म्हणजे काय ? :  ज्या घटनेमागचा शास्त्रीय कार्यकारणभाव उलगडला कि ती घटना चमत्कार होय. आफ्रिकेमधील  रानटी टोळ्यांनी जेंव्हा बंदुकीचा  पहिला प्रयोग पहिला, आणि एक लोखंडी नळी दूर अंतरावरून कोणत्याही प्राण्याचा वेध घेऊन त्याचा तात्काळ मृत्यू घडवून आणते. तेंव्हा त्यांना तो महान चमत्कार वाटला. पार्थिव वास्तूच्या ठिकाणी असलेल्या सुप्त व प्रगट सामर्थ्याचा शोध घेणारे शास्त्र म्हणजे आधुनिक विज्ञान होय. ते मानवाच्या सुखासाठी झपाट्याने वाढत आहे. वाफ, वीज, अणुशक्ती, टीव्ही, कॉम्पुटर, मोबाईलमुळे मानव सृष्टीवर ताबा मिळवू लागला.

अपार्थिव विश्वाचा शोध लावण्याचे प्रयत्न मानवाने केले आहेत. विश्वान्तर्गत गुढस्थ , सूक्ष्म शक्तीचा शोधही घेतला आहे. त्याचे एक सुव्यवस्थित शास्त्र मानवाने बनवले होते. मनुष्य हा केवळ स्थूल, पार्थिव, दृश्यमान, शरीरात वास्तव्य करीत नसून, अतिसूक्ष्म अशा वायुमय देहाने तो विश्वात वावरत असतो. हा वायुमय तेजस्वी अंगुष्ठ प्रमाण लिंग देह (सूक्ष्म) विश्वातल्या शक्तीशी तादात्म्य पाऊ शकतो. व विश्वातून अनेक प्रकारची इच्छाशक्ती तो खेचून घेऊ शकतो. त्यासाठी यम, नियम, निर्बंध, कार्यावली, कर्मशुद्धी, इ. आपल्या ऋषीमुनींनी ही धारणा तयार करून ठेवली. त्या शास्त्रातील प्रवीण असणारे स्वतःसाठीच त्या ज्ञानाचा उपयोग करीत होते. मंत्र शास्त्र तंत्र शास्त्र, सूर्यविज्ञान, योगशास्त्र, इ. द्वारा विश्वाच्या बुडाशी असलेल्या अनेक अज्ञेय शक्तींचा शोध घेत होते.

यूरोपातील विद्वान शास्त्रज्ञांचे लक्ष या घटनांकडे आजकाल वेधले आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या विद्यमाने अशा घटनांच्या पाठीमागील शास्त्रीय कारणे देणारे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकीच एक मादाम ब्लाव्हट्रंस्की यांचा ISIS UNVEILED हा ग्रंथ वाचनीय आहे. त्यामध्ये सृष्टीतील अतिसूक्ष्म गूढ शक्तीविषयी व त्या शक्तीच्या आविर्भावांविषयी संपूर्ण विज्ञान भरले आहे.संत नामदेव महाराज हे अशा शास्त्र कोविदांपैकि एक होते. त्यांचा सखा ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेल्या सर्व योगसिद्धि त्यांनी प्राप्त केल्या होत्या.

देखे साधकु निघोनी जावे।

मागा पाउलांची ओल राहे।

जेथे ठायी होवे।  अणिमादिक।।  ज्ञा. ६ / २९७

योग साध्य करणारा साधक चालून गेल्यानंतर त्याची पाऊले पाठीमागे उमटतात.  प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अणिमादि सिद्धी हात जोडून उभ्या राहतात अशी स्थिती संत नामदेवरायांची झाली होती. या विश्वाचे आदिकारण असलेल्या चैतन्याच्या सत्स्वरूपाचे त्यांना  यथार्थ ज्ञान झाले होते.आणि त्यामुळेच त्या चैतन्याच्या आविष्कारात बदल घडवून आणणाऱ्या सिद्धांतच्या अभ्यासाने त्यांना जड़ स्वरुपात नित्य वावरणाऱ्या जगाला अति अद्भुत चमत्कार वाटण्यासारख्या घटना घडवण्याची शक्ति त्यांना प्राप्त झाली होती. सृष्टीतील दृश्य व अदृश्य वस्तुंवर ताबा मिळवण्याचे हे सामर्थ्य केवल योग्यांनाच प्राप्त होते असे नाही. तर परमेश्वरावर अनन्यभावाने श्रद्धा ठेवणाऱ्या वैष्णव भक्ताला अशी शक्ति सहज प्राप्त होते. चित्तशुद्धिचा निरोध करूँ साधकाने आपले अणुमय मन विश्वांतर्गत विभुवय मनाशी एकरूप केले की त्या विभुवय (सर्वव्यापी)  मनाच्या शक्ति साधकाला सहज साध्य करता येतात. ध्यान समाधी, नामस्मरण. मंत्रजप या किंवा आशा साधनांनी सर्वात्मक मनाशी साधक एकरूप होऊ शकतो.

गूढ़ मानसशास्त्राचे संशोधन :

निरनिराळ्या व्यक्तींच्या ठिकाणी असणाऱ्या या सिद्धी योगसिद्धी असतातच असे  नाही. अनेक प्रकारच्या शुद्ध शक्ति सुद्धा प्राप्त करण्याची साधने आणि त्यांची वर्णने एकनाथी भागवतात देखील आढळतात. प्रेतसिद्धी, पिशाचसिद्धी, वेताळसिद्धी, (जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण इ.) आहेत. या सिद्धी काहीकाळ त्या साधकाला साध्य असतात. शेवटी त्या सिद्धी आणि साधक या दोघांचा नाश होतो.

पाश्चिमात्य शास्त्रज्ञांची दृष्टी नुकतीच या सिद्धी कड़े वळली असून त्यांनी अशा सिद्धी प्राप्त करणाऱ्या अलौकिक शक्तीला CESP निरीन्द्रिय, प्रत्यक्ष अशी नावे दिली आहेत. या पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञांपैकी डॉ वुईल्यम मैक्डूगल यांचे शिष्य डॉ. जोसेफ वैक्सऱ्हाहीन हे एक असून, अमेरिकेतील उत्तर कैरोलिनातील ड्यूक विद्यापीठात डॉ. गार्डनर मर्फी यांनी इतर काही सहकाऱ्यांबरोबर ते या निरीन्द्रिय प्रत्यक्षांचे संशोधन करीत असतात. या प्रयोगाला किंवा गूढ़ मानसशास्त्राचे किंवा अतिमानसशास्त्राचे संशोधन असे नाव दिल असून अलौकिक (निरीन्द्रिय) श्रवण अशा प्रकारच्या अतिन्द्रिय  सामर्थ्याचा अभ्यास विद्यापीठात चालतो. योग, उपासना किंवा तदनुषंगिक अध्यात्मसाधना करीत असताना ज्ञानेंद्रियांच्या सूक्ष्म शक्ति विकसित  होऊन चित्तशक्तिच्या वाढीला त्यांचे सहाय्य होते. आणि विश्वांतर्गत शक्ति खेचण्याचे सामर्थ्य चित्त व इन्द्रिये यांच्या ठिकाणी येते. इतकेच नव्हेतर शरीर मन व इंद्रिये ह्या विश्वांतर्गत महान सामर्थ्याशी एकरूप होतात. त्याबरोबरच काही सिद्धी कठोर साधनेशिवाय अन्य कारणानेही मिळू  शकतात. योगसूत्रात भगवान पतंजलि म्हणतात, जैंमौषधिमंत्रतपः समाधिजाः सिद्धय: (योगसूत्रे ४-१) कित्येकास जन्मतः सिद्धीची प्राप्ती असते. तर कित्येकास औषधी, मंत्र तंत्र, आणि समाधी यामुळे सिद्धी प्राप्त होतात.

संत नामदेवांनी बालपणीच श्रीपांडुरंगाला दूध प्यावयास लावले. मूर्तीतून परमात्मतत्वाचे हे प्रकटीकरण वरील सूत्राप्रमाणे पाहिले तर त्यांना प्राप्त झालेली ही सिद्धी जन्मसिद्दी होती. म्हणजे पूर्वजन्मात केलेल्या पुण्यकर्माचा परिपाक संत नामदेवरायांना लहानपणीच अनुभवायला मिळाला. संत नामदेवांच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडल्या. आपण त्यातील काही घटनांचा विचार करू. श्रीविठ्ठलाची मूर्ती नैवेद्य खाते:

सगुणोपासना कनिष्ठ दर्जाची उपासना आहे ऐसे स्वतःला ज्ञानी समजणारे  मानतात. पण  तो अहंकारातून उत्पन्न झालेला भ्रम आहे. गीतेत सांगितलेल्या चतुर्विध भक्तात ज्ञानी  भक्तांचाही समावेश होतो. मूर्तिपूजा, सगुणोपासना म्हणजे अतिउच्च ब्रह्मसाक्षात्काराकडे जाण्याची महत्वाची सुलभ पायरी आहे. संतामधून अनंताचे द्वार उघडण्याचे ते एक श्रेष्ठ साधन आहे. जड  मूर्तीच्या ठिकाणी सर्वत्र परमात्म्याचे स्वरूप पाहता आले कि त्यातून परमात्मतत्वाचे ज्ञान होते. भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी दगडी मूर्तीत सर्वसाक्षी सर्वव्यापी पांडुरंगाची मनोमन स्थापना केली. अज्ञानाने भाबड्या भावनेने वा भक्तीने परब्रह्म मूर्तीत आले. चैतन्याचा आविष्कार झाला. दगडी मूर्तीतील परमाणूंनी जडत्वाची बुंथी टाकून चैतन्याचे स्वरूप प्रकट केले. नामदेवरायांचे ते पूर्वसुकृत म्हणून  श्रीपांडुरंगाने दूध प्रश्न करून बालहट्ट पुरविला.

असे चमत्कार अनेक संतांच्या जीवनात घडलेले आपणास ज्ञात आहे. जडामध्ये सुप्त स्थितीत असणारे चैतन्य संताना प्रकट करता येते. जड पदार्थांमधील अणु चैतन्यमय अवस्थेत आणून त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेता येते. मात्र संत याच अनुभूतीवर थांबत नाहीत. तिथे थांबले तर सगुणातच मन गुरफटून बसते. आणि परब्रह्माच्या निरंजन, अनादि अनंत आविष्काराचे यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणूनच श्री विसोबा खेचरांनी औंढ्या नागनाथाच्या ज्योतिर्लिंगावर ठेवलेले पाय जिथे शिवलिंग नाही, तिथे माझे पाय ठेव, असे नामदेवांना अचंबित होताना पाहिल्यावर सांगितले. नंतर नामदेवांनी त्यांचे पाय जिथे ठेवले, तिथे शिवलिंग उत्पन्न होऊ लागले. त्यावेळी नामदेवांच्या भोवती सगळे देऊळ जणू गरगर फिरू लागले आणि त्याच क्षणी ते उन्मनी अवस्थेत गेले.

आत्मस्वरूप व ब्रह्मस्वरूप एकाच आहे. 'अहं ब्रह्मास्मि' याचा साक्षात अनुभव त्यांना आला. अणुमय जीवात्मा त्या महान, निरंजन, अनादी, अनंत, निर्गुण, चैतन्यमय सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपात विलीन झाला. व संत नामदेवराय सगुणाकडून निर्गुणाकडे, ज्ञातातून अज्ञाताकडे, सांतातून अनंताकडे ते खेचले गेले. त्यांच्या बुद्धीची व आत्म्याची शुद्धी झाली. हाच मोक्ष होय. 'सत्वपुरुषो शुद्धीसाम्ये कैवल्यम् | (योगसूत्र 3-54) सत्व आणि पुरुष यांची शुद्धी समान  झाली म्हणजे कैवल्यप्राप्ती होते. वारकरी संप्रदायात सद्गुरूंची कृपा झाल्यावर जीव शिवाचे ब्रह्मैक्य होते. व त्याला कुठलेही कर्म उरत नाही.

साक्षात पांडुरंग बोलू लागला व त्याने दूध प्राशन केले. सद्गुरू विसोबा खेचरांनी नामदेवांना ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान करून दिले. मग ते चैतन्य त्यांच्या घरी आले. त्याने कुत्र्याचे व मलंगाचे रूप स्वीकारले. आणि सगुण झाल्यावर मानवाचे सर्व व्यवहार विठ्ठलाचे हातून झाले. मेलेली गाय जिवंत केली, वाळूचे परीस केले, दगडाचे सोने केले. मृत बालक जिवंत केले. कोरड्या विहिरीतून पाणी वर आणले.