top of page

|| गोपीचंदनाचे महत्व ||

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गंध, तिलक, चंदन, कुंकूम याला विशेष महत्त्व आहे. भारतीय हिंदु स्त्रियांना जसे कुंकवाचे लेणे हे सौभाग्याचे अलंकार मानले जाते तद्वत् प्रत्येक हिंदु पुरुषाने कपाळाला गंध लावणे हे सात्त्विकतेचे द्योतक समजले जाते. आपल्या ऋषिमुनींनी जे धार्मिक संकेत घालून दिलेले आहेत त्यामागे बहुतांशी विज्ञानतत्त्वच दडलेले आहे. तेच तत्त्व संतांनी आचरणात आणले. स्त्रियांचा देह हा नाजुक स्नायूंचा बनलेला असतो. त्यांची इंद्रिये लवचिकही असतात. उन्हातान्हात हिंडतांना त्यांच्या मर्मस्थानी सूर्यकिरणांचा प्रभाव कमी व्हावा यासाठी लाल रंगाचे कुंकू लावल्याने पर्यावरणाचा परिणाम त्यांचेवर कमी होतो. दुसरे असे हे सौभाग्याचे लेणे समजून प्रत्येक स्त्री हळदी-कुंकवाचा समारंभ किंवा सण-वाराच्या दिवशी आवर्जून करतात. त्यामुळे आयुष्याची वृद्धि होते. पतिनिष्ठेचा एक सर्वोत्कृष्ठ अलंकार म्हणून त्याचा मान राखला जातो. त्याचप्रमाणे पुरुषानेहि कपाळावर गंध लावणे सहिष्णुतेचे लक्षण असून प्रत्येक पूजा-अर्चा करताना गंधाला अग्रस्थानी मानले जाते. गंध व आरती हे विजयाचे प्रतिक आहे. आजपर्यंत भारतवर्षामध्ये जितके राजे गादीवर अथवा सिंहासनावर बसले त्यांनी तिलक लावूनच राज्यभार स्विकारला आहे. यालाच राजतिलक असे संबोधले जाते. आज देखील लग्नकार्यात किंवा धार्मिक कार्यात पुरुषाच्या कपाळावर गंधव स्त्रीयांना हळदी-कुंकू लावण्याची प्रथा चालू आहे.


बहुत करुन वारकरी संप्रदायामध्ये गोपीचंदन लावण्याची प्रथा आहे. कारण संत निवृत्तिनाथांपासून ते संत निळोबारायापर्यंत सर्वांनी गोपीचंदनाचे महत्त्व आपल्या अभंगातून वर्णन केले आहे.

१) तुळशीमाळा शोभती कंठी । गोपीचंदनाची उटी।

सहस्र विघ्ने लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ॥ ज्ञा.म.

२) तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा ।

हृदयी कळवळा वैष्णवांचा ॥ ए. म.

३) गोपीचंदन मुद्रा धरणे । आम्हा लेणे वैष्णवा।।


४) गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा ।

हार मिरविती गळा रे ।।


संतांची अशी अनेक वचने आपणाला पहायला मिळतील. आपल्या शरीरातील अनेक ठिकाणी भगवंताचे वास्तव्य असते. त्या त्या मुख्यठिकाणी गोपीचंदन लावण्याची प्रथा आहे. यामध्ये प्रमुख बारा ठिकाणी बारा देवता शरीरामध्ये वास्तव्य करतात.

लल्लाटे केशवं विद्यान्नारायणमथोदरे ।

माधवं हृदयेन्यस्य गोविंदं कंठ कूपके ॥१॥

विष्णुश्च दक्षिणे कुक्षौ तद्भजे मधुसूदनम् ।

त्रिविक्रमं कर्णदशे वामे कुक्षौ तु वामनम् ॥२॥

श्रीधरं तु सदा न्यसेद् वाम बाहो नर सदा ।

पद्मनाभं पृष्टदेशे ककुद्दामोदरं स्मरेत् ॥३॥

वासुदेवं स्मरेन्मूर्ध्नि तिलकं कारयेत क्रमात ।। (वा. उ.)

१) कपाळात केशव,

२) उदरात नारायण,

३) हृदयांत माधव,

४) कण्ठकूपात गोविंद,

५) उजव्या काखेत विष्णु,

६) डाव्या काखेत वामन,

७) उजव्या बाहूत मधुसुदन,

८) डाव्या बाहूत श्रीधर,

९) कानात त्रिविक्रम,

१०) पाठीमध्ये पद्मनाभ,

११) मानेच्या मागे दामोदर,

१२) मस्तकावर वासुदेव.

अशाप्रकारे भगवन्नामाचा न्यास करुन गोपीचंदन मुद्रा लावावी.



गोपीचंदनाचे महत्त्व-

(गर्गसंहितेत आलेला उल्लेख)

गोप्यंगराग संभूतं गोपीचंदनमुत्तमम् ।

गोपीचंदन लिप्तांगो गंगा स्नानं फलं लभेत् ।।१।।

महानदीनां स्नानस्य पुण्यं तस्य दिने दिने ।

गोपीचंदन मुद्राभिर्मुद्रितो य: सदा भवेत् ।।२।।

अश्वमेध सहस्राणि राजसूय शतानि च ।

सर्वाणि तीर्थ दानानि व्रतानि च तथैव च ।।३।।

गंगा मृद्विगुणं पुण्यं चित्रकूटरजः स्मृतम् ।।

तस्माद्दशगुणं पुण्यं रज पंचवटी भवम् ।।४।।

तस्माद् शतगुणं पुण्यं गोपीचंदन क: रजः ।

गोपीचंदनकं विद्धि वृंदावन रज समम् ॥५॥

गोपीचंदन लिप्ताङ्ग यदि पाप शतैर्युतम् ।

तं नेतुं नयमः शक्तो यमदूतः कृतः पुनः ॥६॥

नित्यं करोति यः पापी गोपीचंदन धारणम् ।

संप्रयति हरेमि गोलोकं प्रकृतैः परम् ॥७॥

अन्वयार्थ - जेथे गोपीने वास्तव्य केले ती भूमि गोपभूमि या नावाने प्रसिद्ध झाली. त्याठिकाणी गोपीच्या अंगस्पर्शाच्या सान्निध्याने पवित्र झालेले असे उत्तम गोपीचंदन उपलब्ध होते. जो भक्त आपल्या अंगाला नियमितपणे गोपीचंदन लावतो, त्याला गंगास्नानाचे फल प्राप्त होते. जो गोपीचंदनाची मुद्रा लावून मुद्रित होतो. त्याला रोज समुद्रस्नान केल्याचे फल मिळते. एक हजार अश्वमेध यज्ञ व शंभर राजसूय यज्ञ केल्याचे तसेच सर्वतीर्थांचे सेवन, दान, व्रत व अनुष्ठानाचे फल गोपीचंदन लावणाराला प्राप्त होते. गंगेच्या मातीपेक्षा चित्रकूटच्या मातीला दुप्पट महत्त्व. त्यापेक्षा दसपट महत्त्व पंचवटीच्या मातीला आणि त्यापेक्षा शंभरपट महत्त्व गोपीचंदनाला आहे. वृंदावनाच्या रजःकणाएवढेच महत्त्व गोपीचंदनाला आहे. जो नित्य गोपीचंदन लावतो त्याने शंभर पापे जरी केली तरी त्याला प्रत्यक्ष यमसुद्धा नेऊ शकत नाही मग यमदूतांची काय कथा ! पापी असून सुद्धा जो भक्त प्रतिदिनी गोपीचंदन धारण करतो, तो श्रीहरीच्या गोलोक धामाला जातो. त्याठिकाणी प्राकृत गुणाला प्रवेश नसतो. याचा अर्थ गोपीचंदन धारण करुन पाप केले तर चालते असा घेऊ नये. हा पापाला पर्याय समजावा.


गोपीपासून उत्पत्ति-

भगवान श्रीकृष्णाने कौंडण्यपूराहून रुक्मिणीला देवीच्या देवळातून हिरावून आणले. द्वारकेला आल्यानंतर भगवंतानी उद्धवाला गोकुळात पाठविले व सांगितले की, "उद्धवा ! माझ्या लग्नासाठी माझे आई-बाप (नंद-यशोदा) व गौळणी गोपाळांना घेऊन ये." त्याप्रमाणे उद्धव गेले. पण नंदादि गोपगोपींनी येण्यास नकार दिला. उद्धव विन्मुख परतला. भगवंताला हे कळल्यावर ते स्वतः गोकुळाला गेले व म्हणाले, "बाबा, आपण जर माझ्या लग्नाला आला नाहीत, तर तुमचा कन्हैय्या अविवाहितच राहील." तेव्हां सर्व मंडळी श्रीकृष्णाबरोबर द्वारकेला आली. तेथील लग्नसोहळा आटोपल्यानंतर गौळणींनी भगवान श्रीकृष्णाचे व रुक्मिणीमातेचे स्मरण करुन त्या भगवंतामध्ये लुप्त झाल्या, विलीन झाल्या. ज्या ठिकाणी गौळणींनी देहोत्सर्ग केला, त्याचठिकाणी त्यांच्या अंगस्पर्शाने तेथील माती एवढी पवित्र झाली कि तेच गोपीचंदन होय. कोणी तिला द्वारावती म्हणतात. गौळणी प्रत्यक्ष श्रुतीच होत्या.


गोपीचंदनाचा प्रभाव (गर्ग संहितेमधील कथा) -

सिंधुदेशाचा राजा दीर्घबाहू हा अन्यायी, दुष्ट, हिंसकवृत्तीचा, ब्रह्महत्यारा व वेश्यागामी होता. त्याने अनेक गर्भवती स्त्रियांची हत्त्या केली होती. शिकारीला गेल्यावर त्याने कपिला गाईचा वध केला होता. एकदा तो घोड्यावर बसून शिकारीला गेला असता त्याच्याच मंत्र्याने तलवारीने वनात त्याचा खून केला. लगेच यमदूतांनी त्याला यमलोकात

यमासमोर उभे केले. चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा जमाखर्च पाहिला. तेव्हा त्याला चौऱ्यांशी लक्ष योनीतून नरकयातना भोगू द्या. कारण याने पवित्र अशा भारत देशात जन्म घेऊन एक क्षणसुद्धा पुण्यकर्म केले नाही. त्याप्रमाणे त्याला कुंभपाक नरकात तापलेल्या तेलाच्या कढईत टाकले. परंतु त्यात तो पडताच त्यातील तेल व तापलेली कढई एकदम थंड झाली. ही वार्ता यमाला व चंद्रगुप्ताला समजल्यावर ते चकीत झाले. त्यावेळी तेथे महर्षि व्यास आले व म्हणाले, याचे कारण जेथे गोपीचंदनाची माती होती, तेथे हा मरुन पडला होता त्या मातीचा स्पर्श झाल्यावर त्या प्रभावाने हा निष्पाप झाला. व तो मुक्तही झाला. त्यावेळी यमलोकातहि गोपीचंदनाचा प्रभाव समजला. याकरिता प्रत्येकाने नित्यनेमाने गोपीचंदन लावून मोक्षाचा मार्ग स्विकारावा.



शास्त्रीय उपयोग -

शतं चक्राच हृदयस्थ नाङ्यस्तासां मूर्धनिमभिनी सृतैका ।

तयोर्ध्व मायन् न मृतुत्वमेति विष्वङ्न्या उत्क्रमणे भवन्ति ।।

हृदयामध्ये १०१ नाड्या आहेत. त्यामधील सुषुम्ना नांवाची नाडी मस्तक प्रदेशाच्या समोरुन निघते. याचद्वारे उच्च अवस्थेमध्ये प्रस्थान करणारास मृत्युसमयी मोक्ष प्राप्त होतो. बाकी सर्वांचा प्राणोत्सर्गाच्या वेळी प्राण चारी बाजूने बाहेर पडतो.

स्नानं दानं तपो होमो देवता पितृ कर्म च ।

तत्सर्व निष्फलं याति ललाटे तिलकं विना ।

ब्राह्मणस्तिलकं कृत्वा कुर्यात्संध्याञ्च तर्पणम् ।

स्नान, होम, देव आणि पितृकर्म हे तिलक न लावता केले तर निष्फळ होतात. म्हणून गंध लावूनच सर्व विधि करावा.


१) पृथ्वीच्या मातीपासून जे गंध निघते ते उत्तम. कारण पृथ्वीमध्ये गंध हा मुख्य गुण आहे. शुद्ध मृत्तिकेपासून केलेला गंध लावल्याने सक्रामक किटाणू नष्ट करण्याची शक्ती त्यामध्ये आहे. उदा. काचेच्या पेल्यात किंवा चीनीमातीच्या कप-बशीत आपण ओठलावून चहा, कॉफी, दूध पीत असतांना मनुष्याचा तोंडातील हजारो सूक्ष्म कीटाणू त्या पात्रावर जमा होतात व ते पात्र पाण्याने किंवा साबणाने धुतले तरी स्वच्छ होत नाही. तर ते मातीने किंवा राखेने घासले तरच त्यांचा समूळ नाश होतो.


२) मस्तकावर गोपीचंदन लावले असता आपल्या मनामध्ये जे अनेक संकल्प निर्माण होतात ते प्रथम आपल्या मस्तकातील नाडीतूनच प्रकम्पन (प्रक्षोभ) उत्पन्न होतात. नंतर ते इंद्रियांच्या सहाय्याने बऱ्या वाईट क्रियेमध्ये त्याची परिणती होते. म्हणून आपले मस्तक जितके विकाररहित राहील तितके आपले विचार व क्रिया चांगल्या घडतात. म्हणून मस्तकावर गोपीचंदन तिलक लावावे.


३) आपल्या ज्ञानतंतूचे विचारकेंद्र भृकुटी आणि लल्लाटाचा मध्यभाग आहे. जास्त विचाराचा किंवा कामाचा ताण पडल्यावर डोके दुखते. तेव्हां डोक्याला गोपीचंदनाचा लेप दिला असता डोके शांत होते.


४) शुक्र (वीर्य) नावाचा धातू सर्व शरीरात व्याप्त आहे. त्याचा छाती आणि मस्तकाशी विशेष संबंध आहे. आपले मस्तक म्हणूनच तारुण्य प्राप्त होणाऱ्या मुलांच्या स्तनामध्ये लहान गाठी व मुखमंडलावर पुरळ येतात. हे टाळण्यासाठी मस्तकावर गोपीचंदन धारण करावे.


५) पृथ्वी म्हणजे भारतमाता. त्याचा एक पवित्र अंश आपल्या डोक्यावर धारण करणे म्हणजे भारतमातेचा गौरवच होय.



गोपीचंदन उभेच कां लावावे -

१) उर्ध्वपुण्ड्र - ही उच्च निवासाचा बोध करतो.

२) आमचा अच्युत प्रभु उच्चस्थानी आहे. त्याच्यापेक्षा उच्च कोणी नाही.

३) आमचा मार्ग उच्च असून उच्च ठिकाणी जाण्याचा आहे.

४) उर्ध्वपुण्ड्र आपल्याला उभे खडखडीत जागृत राहण्यास शिकवितो. बसलेला, निजलेला, बेसावध, आळशी, निष्काळजी अशा श्रद्धाविरहित व्यक्तीस या मार्गाने जाता येणार नाही.

५) उभे गंध हा आपला मार्ग सरळ, सारख्या आणि दोन्ही बाजूंनी मर्यादाबद्ध असून समांतर व सुरक्षित असल्याचे सूचवितो.

उर्ध्वपुण्ड्र भाळ कंठी शोभे माळ ।

कापिजे कळीकाळ तया भेणे ।। तु.म.


गोपीचंदन लावण्याची पद्धत -

प्रथम गोपीचंदनाला नमस्कार करुन हातात घ्यावे व पुढील श्लोक म्हणावा.

गोपीचंदन पापघ्न विष्णुदेह समुद्भव ।

चक्रांकित नमस्तुभ्यं धारणान्मुक्ति दो भव ॥


एवढे महत्त्वाचे सद्गुण गोपीचंदनाच्या अंगी असल्यामुळेच आपल्या भारतीय संतांनी त्याचा अलंकार करुन शरीरावर धारण केले. त्यामुळे गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे पाहिल्यावर पाहणाराची वृत्ति सात्त्विक होते. सर्व वारकऱ्यांनी मधल्या बोटाने कपाळावर गंध लावावे. तेथे ब्रह्मरंध्र असून दशमद्वार आहे. त्याचा संयोग हृदयाच्या रक्तभिसरणाशी होतो. म्हणून गंध काडीने अथवा तारखिळ्याने लावू नये. फक्त विठ्ठलमुद्रा लावावी.

मुद्रा लाविती कोरोनी । मान व्हावयासी जनी ॥ तु.म.




792 views0 comments

Comments


bottom of page