राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी धार्मिक, आर्थिक, सामाजिक गुलामगिरी पासून सामान्य माणसाला मुक्ती मिळालेली नाही. गेल्या साठ पासष्ठ वर्षांत इमारती खूप उंच वाढल्या आहेत पण माणसं ठेंगणी झाली. रस्ते रुंद झाले पण मनी अरुंद झाली. आज समाजात एकाची संपन्नता इतरांसाठी विपन्नता ठरली आहे. मोठ्या पदावर सर्वार्थानं लहान असणारी माणसं विराजमान झाली व सामान्य दरिद्री माणूस गुलामगिरीत जगताना दिसत आहेत. भारतीय संस्कृती ही भोगावर अवलंबून नसून त्यागावर अवलंबून आहे. अद्वैत, समन्वय व आस्तिक्य या सिद्धांतावर विश्वास ठेवते व हे सिद्धांत या संस्कृतीचा आत्मा आहेत. विज्ञानानं मानवाला जड यंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचेच निवारण भारतीय संस्कृतीला अभिप्रेत आहे. संस्कृतीचा खरा अर्थ सहयोग, सहजीवन, समानता आणि एकता, परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे होय.
विज्ञानाने भौतिक अंतर कमी केले. देशांना व माणसांना शेजारी बनवले. परंतु विज्ञानाने जिवलग मैत्री बनवली नाही. आज आधुनिक माणूस आत्मकेंद्रित होत आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, फेसबुक, आधुनिक उपकरणांमुळे खोलीच्या बाहेर न पडता सर्व व्यवहार करू शकतो. त्यामुळे शेजारी किंवा इतर माणसांची गरज वाटत नाही. आजचे जग व समाजरचना युवकांना समाधानाने जगवणारी नाही. कुटुंब व मित्र यांच्या भावनेचा अंत हा भारतीय संस्कृतीचा ऱ्हास आहे. हे बदलावेच लागेल. सामाजिक प्रश्नांबाबत युवकांवर फार मोठे उत्तरदायित्व आहे. आज भारत युवकांचा देश म्हणून पुढे येत आहे. हा लढा पुढच्या पिढीने लढावयाचा आहे. पण भारतातील सुशिक्षित युवक पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात व्यस्त आहे. तो भारतीय असूनही परदेशी व्हायची स्वप्ने पहात आहे. भारतातील बुद्धिमान युवकाला अमेरिका सारखे देश, आपल्या देशात नेत आहे. सध्या युरोप व अमेरिकन लोकांना विज्ञानाच्या अविष्काराची व चमत्काराची सवय जडते आहे. त्यांना आता अध्यात्मिक क्षेत्रातही चमत्कारातील गुप्तता शोधण्याची उत्सुकता लागली आहे. कारण विज्ञानाने जे साधले जाऊ शकते ते त्यांना प्राप्त झाले आहे. आता त्यांना योगसिद्धीची चटक लागली आहे. योगाने प्राप्त होणारी अतींद्रिय सिद्धी त्यांना भुरळ घालत आहे.
त्यांना ज्ञानदेव हवा आहे. ब्रह्मज्ञान हवे आहे. जड भिंत चालविणारी आत्मशक्ती हवी आहे. विज्ञानाच्या माध्यमातून जर टेपरेकॉर्डर व रेडिओ मधून वेद वदवले तर वेदांताने रेड्याच्या मुखातून रुद्राचा घोष करायला पाहिजे असे त्यांना वाटते. गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाबरोबरच विश्वरूप दर्शनाचा चमत्कार दाखविणारा कृष्ण पाहिजे असेही त्यांना वाटते. परंतु आपण हे विसरलो आहोत की विज्ञानाने जादूचा पराभव केला पण त्याचबरोबर त्यातील धर्माची प्रतिष्ठा कमी झाली. विज्ञानाने वस्तुवादाचा महिमा वाढविला. यंत्रे वाचाळ झालीत. डोंगरावरच नव्हे, तर मंगळ व चंद्रावर स्वार झालो. पण मानवाला आपल्या मनावर ताबा मिळवता आला नाही. त्याला मानसिक सुख प्राप्त झाले नाही. त्यामुळे विज्ञानवादी व बुद्धीवादी पाश्चात्त्यांना योगाचे, देवाचे व संतांचे महत्त्व वाटू लागले आहे. आज काळ कितीही बदलला असला तरी संतांच्या विचारांचे महत्त्व कमी होणार नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनशैली झपाट्याने बदलत असली, तरी संतांचे तत्त्वज्ञान अबाधित राहील. विज्ञानयुगाला अहिंसा आणि सत्य यांची जोड दिली तर नक्कीच सध्याच्या संक्रमणाच्या काळात आपण तग धरून राहू. प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या आजच्या युगाला संतांचेच विचार तारतील.
-
- वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
Comments