top of page

35 प्रश्‍नांचा गूढ अर्थ (ब्रह्मज्ञान)

Updated: Oct 14, 2020


श्री एकनाथी भागवताच्या 19 व्या अध्यायात भगवंताचा अतिशय प्रिय भक्त उद्धवाने श्रीकृष्णाकडून धर्मादिक चार पदांचे गंभीर आख्यान ऐकून उद्धवाला चमत्कार वाटला व तो विस्मित झाला. तेव्हा आता यमादिकांचाही गूढ अर्थ विचारून परमार्थ समजून घेण्यासाठी उद्धवाने श्रीकृष्णाला गहन ज्ञान विषयी 35 प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे ऐकून जीव - शिवाला समाधान होईल. पहिल्या श्लोकात 6 प्रश्न, दुसऱ्या श्लोकात 9, तिसऱ्या व चौथ्या श्लोकात प्रत्येकी 8, व पाचव्या श्लोकात 4 प्रश्न आहेत.

अहंकार रुपी शत्रूचा नाश करणाऱ्या हे श्रीकृष्णा!

१. यम नियमांचे किती प्रकार आहेत?

२. शम ३.दम कशाला म्हणतात?

४.तितिक्षा५.धृती कशी असते?

६.तप कोणते व ७.दान कोणते?

८. शौर्य म्हणजे काय? व ९.सत्य कसे असते?

१०.ऋत कशाला म्हणतात?

११ त्याग कोणता? व १२. पुरुषाचे इष्ट धन कोणते?

१३. यज्ञ कशाला म्हणतात?

१४. दक्षिणा म्हणजे काय?

१५. पुरुषाचे बल कोणते?

१६.दया कशाला म्हणतात?

१७. लाभ कोणता? हे केशवा!

१८. विद्या कशाला म्हणतात? ते सांग.

१९. लज्जा कोठे राहते? व २०. श्रेष्ठ लक्ष्मी कोणती? ते ही सांग.

२१.सुख कोणते? व ते २२. कसे असते?

सुखा बरोबर असणारे जे २३. दुःख त्याचेही स्वरूप मला सांगावे. हे श्री मते!

२४.पंडिताचे लक्षण कसे असते?

२५. मूर्खाचे लक्षण कोणते?

२६. सुमार्ग कोणता व २७. दुमार्ग कोणता?

२८.स्वर्ग कशाला म्हणावे?

२९.नरक कसा ओळखावा?

३०.सख्खा भाऊ कोणाला म्हणावे? व ३१.माझे घर कोणते?

३२. आढ्य कोणाला म्हणावे?

३३. दरिद्री कसा ओळखावा?

३४. कृपण कोणाला म्हणावे?

३५. ईश्वराला कसे जाणावे?

या माझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दे व त्यांचा लौकिक अर्थ न सांगता पारमार्थिक अर्थ सांग. ज्ञानसंपन्न संतांचा ही तू स्वामी आहेस. म्हणून तुला सत्पति म्हणतात. व शास्त्रार्थातही तुला ज्ञानसंपन्न म्हटले आहे. हे श्रीकृष्णा! परमार्थ प्राप्ती साठी माझ्या या प्रश्नांचे यथार्थ उत्तर सांगावे. अशी उद्धव आणि देवाला विनंती केली. तेव्हा भक्ताची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नारायण कृपेने द्रवला. व त्याच्या प्रश्नांची पारमार्थिक उत्तरे सांगू लागला.

यम : पहिल्या श्लोकात यमाची 12 लक्षणे आहेत. प्रश्नांच्या अनुक्रमाने श्रीकृष्ण त्याचे थोडक्यात उत्तर देत आहेत. काया, वाचा, मन यांनी दुसऱ्याला पीडा न देणे याला अहिंसा म्हणतात. आपल्याला जसे कळले असेल त्यात काहीही बदल न करता बोलणे हे सत्य होय. आपण स्वतःच्या हातांनी चोरी करायची नाहीच. परंतु दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा ही मनात ठेवायची नाही. हे अचौर्य होय. घरदारावर व स्वतःच्या देहावरही ज्याची आसक्ती नसते ज्याचे मन आतून निर्विकार असते. तो असंग होय. निंद्य कर्माचा ज्याला तिटकारा असतो व लौकिक निंद्य कार्यासही जो लाजतो, त्याला ह्री म्हणजे लज्जा म्हणतात. या लोकी जो संग्रह करीत नाही, अन्न वस्त्र केवळ प्रारब्धाधीन आहे असे मानतो, स्वर्गातील उपभोगासाठीही जो पुण्यसंचय करीत नाही, कारण तेथे पुण्य संपत्तीचा क्षय होतो. अशा कोणत्याही वस्तूंचा माझे भक्त संग्रह करीत नाहीत. याला असंचय म्हणतात. जो सर्वत्र माझे ब्रह्मस्वरूप पाहतो, त्याला माझा अभाव कोठेच दिसत नाही. याला आस्तिक्य म्हणतात. ब्रह्मचर्य म्हणजे आश्रमाला विहित असलेले जे शास्त्रोक्त नियम आहेत, त्याप्रमाणे कडक आचरण ठेवणे. मौन म्हणजे खोटे व अनुचित भाषण न करणे. नित्य वेदपठण, गायत्री जप व भगवंतांचे नामस्मरण आत्मस्वरूपात व स्वधर्मात स्थिरवृत्ती व संत समागमाची आवड याला स्थैर्य असे म्हणतात. आपल्या देहाला कोणी दंड करो किंवा वंदन करो, दोघांविषयी सारखीच क्षमा ठेवणे, प्रारब्धाप्रमाणे देहाला बरावाईट भोग प्राप्त होतो. असे जो समजतो तोच खरा क्षमावान होय. यालाच क्षमा म्हणतात. जेवढे म्हणून परके दिसते, तेवढे सर्व आपणच व्हावे, आत्मा एकच आहे. पंचमहाभूतेही सगळी एकच आहेत. अशी एकदा दृढ भावना झाली म्हणजे भयाचे महा दुःखच नाहीसे होते. यालाच अभय असे म्हणतात. दुजेपणाची पर्वाच नाहीशी झाल्यावर सगळ्या सृष्टीत भय औषधालाही मिळत नाही. अभयाच्या आनंदाची पुष्टी आत्मदृष्टीमध्ये ठसते. हेच 12 यम होत.

नियम : आता बारा नेम म्हणजेच नियम यांचे लक्षण पाहू. आता शुचिर्भूतपणाचा प्रकार ऐक. विवेकाने अंतःकरण शुद्ध करावे. आणि वेदाज्ञेप्रमाणे माती व जल यांची ब्रह्म शुद्धी म्हणजे देह शुद्ध करावा. आता जपाचा विचार ऐक. ज्याचा जसा अधिकार असेल, त्याने तशा मंत्राचा जप करावा. किंवा स्वतंत्रपणे गुरुनामाचे स्मरण करावे. ब्राह्मणांचा जप वेदघोष, संन्याशाचा जप प्रणव, क्षत्रिय व वैश्य द्विजांनी वेदशास्त्रांचा जप करावा. किंवा 'माझे नामस्मरण' हा मंत्र तर सर्वांसाठीच आहे. ज्यामुळे चित्तशुद्धी होते, व जो तपाचा मुख्य प्रकार, तो स्वधर्मातील आदर आहे. तप म्हणजे शरीराला कष्टविणे हा मूर्ख लोकांचा खटाटोप आहे. ह्रदयात मद्रूप श्रीहरीचे चिंतन करणे, हेच खरे तप होय. वैश्वानर म्हणजे अग्नी, हेच देवाचे मुख होय. म्हणून पंचमहायज्ञ व अग्निहोत्र होम करावे. उद्धवा! माझ्या नावाची अतिशय आवड व धर्माची अत्यंत गोडी यालाच खरी श्रद्धा म्हणतात. जवळ फारसे द्रव्य किंवा अन्न नसतानाही, जो आलेल्या अतिथीला वंदन करून गोडीने त्याचा सत्कार करतो, व आपल्या सामर्थ्याने नुसार त्याला द्रव्य देतो, त्याला अतिथी सत्कार असे म्हणतात. जो अंतःकरणातील कळवळ्याने व आदराने, मज भगवंताची यथासांग पूजा श्रद्धेने करतो, अशी षोडशोपचार पूजा केल्याने मी श्रीपती संतुष्ट होतो. कारण संतांची ही पूजा पवित्र आहे याचेच नाव मदर्चन. अंतकरण शुद्ध होण्यासाठी तीर्थयात्रा कराव्या. यावर श्रद्धा ठेवणे याला तीर्थाटन म्हणतात. पावलोपावली माझ्या नामाचा गजर करीत, व माझ्या चरित्राचे वर्णन करीत, निष्काम बुद्धीने यात्रा करणे, याला श्रेष्ठ तीर्थयात्रा म्हणतात. ज्याच्या सर्व क्रिया निरंतर दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी असतात, त्याला परार्थ म्हणतात. परोपकारी मनुष्य आपल्या आचरणाने लोकांना सुखी करतो. दैवाने जे काही प्राप्त होईल, त्यात समाधान मानून, ज्याच्या मनात सम-विषम हा भाव नसतो, त्याला सदृच्छालाभ संतुष्ट असे म्हणतात. जो काया वाचा मनाने, व धनाने गुरूला शरण जातो, त्याचे संसार रुपी धरणे नाहीसे होते. यालाच गुरुसेवा म्हणतात. अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या शुद्धीचे दोन गुण,जपादि दहा गुण मिळून हे बारा नियम श्रीकृष्णाने सांगितले. या यम नियमांचा जर निष्काम मनाने आचरण केले, तर साधकास माझे परमपद सहज प्राप्त होते.


शम : आता शमदमाविषयी पाहू. ज्याच्या योगाने ब्रह्मज्ञान हस्तगत होते, त्याने गुह्य निरूपण उद्धवाला सांगून, श्रीकृष्ण ब्रह्मरसच देत आहे. उद्धवाने 34 प्रश्न केले. त्यापैकी यमनियम हे दोन सांगितले. आता 32 प्रश्न उरले. यामध्ये दयेचे उत्तर श्रीकृष्णाने दिलेले नाही. पण त्याचाही गूढार्थ षडगुणऐश्वर्यसंपन्न ईश्वराने ध्वनित केला आहे. दयेमध्ये संपूर्ण भाग्य साठविलेले असते. तेव्हा त्याचे निरुपण करण्याचे कारण नाही. त्यात श्रीकृष्ण शौच आणखी एक अधिक सांगेल. कारण ते कार्यकारण संबंधानेच प्राप्त होणारे आहे. विवेकयुक्तबुद्धी असार टाकून, केवळ साराचेच ग्रहण करते. तिच्यामुळे मनाच्या निरनिराळ्या वृत्ती, विवेकात येऊन मिळतात. मीठ जसे समुद्राशी एकरूप होते, तशीच ही बुद्धी सगळ्या वृत्तींसह आपण होऊन परमात्म्याशी तादात्म्य पावते. व आत्मनिश्चयाच्या योगाने बुद्धीही स्वतःच ज्ञानमय होऊन जाते. अशा प्रकारे बुद्धीचे शांत स्वरूप म्हणजेच शम होय.


दम : पण त्याच्या आधी दम आवश्यक आहे. शत्रूचे दमन करणे हा येथे दम शब्दाचा अर्थ नव्हे. इंद्रियांचे दमन करणे हा अर्थ येथे विवक्षित आहे. त्याचे लक्षण असे की, शमाला साहाय्य होईल अशा युक्तीने इंद्रियांना स्वाधीन ठेवणे, त्यांना विषयांकडे जाऊ न देणे, रात्रंदिवस वैराग्याने त्यांना आवरून धरणे, अशा प्रकारचा जो इंद्रियनिग्रह, तो दम होय.

तितिक्षा : तितिक्षा म्हणजे सहनशीलता. महासुख प्राप्त झाले असता, पुरुष ते जितक्या उत्साहाने भोगतो, तसेच त्याने दुःखही सहन करावे. सुख व दुःख निर्विकार मनाने सोसावे. गोफणीतून मारलेला सोन्याचा दगड लागला, की प्रथम दुःख होते. पण लगेच तो सोन्याचा गोळा आहे, हे कळताच दुःख नाहीसे होऊन जसे सुख होते, त्याप्रमाणे द्वंद्वाचे स्वरूप जाणल्याने, ते चिद्रूप होतात. हे तितीक्षेचे मुख्य लक्षण आहे. देहाभिमान सोडून सुखदुःखाच्याही पलीकडे आत्मस्वरूप आहे. असे पाहणे, यालाच तितिक्षा म्हणतात.


धृती : रसना व कामासक्ती यावर जय मिळवणे, यालाच धृति म्हणतात. विद्याधारण ही खरी धृति नव्हे. ज्याला द्रव्य व स्त्री यांची आसक्ती नसते, त्याच्या घरी धृती निरंतर दासी होऊन राहते. कोणत्याही प्राण्याला दुःख देऊ नये. सर्वांना सुख देणे हेच महादान. आहे याची तुलना पृथ्वीच्या दाना बरोबर ही होणार नाही. जन्ममरणाचे दुःख नाहीसे करून आत्मसुखाचा लाभ करून देणे, यालाच श्रेष्ठ व अलौकिक दान म्हणतात.


तप : आता तपाचे सविस्तर लक्ष ऐक. सर्व कामनांचा त्याग करून उत्तम रीतीने तप करावे. मनात कामासक्ती धरून तप केल्यास ते तपच त्याला बाधक होते. वासना निःशेष टाकून विषयाविषयी उदासीन होणे, हेच खरे तपाचे साधन होय. माझे स्मरण करणे यालाच शुद्ध तप म्हणतात. पश्चातापपूर्वक मत्स्वरूपाचे ध्यान, हेच शुद्ध तप होय. हृदयात माझ्या ज्ञानस्वरूपाचे चिंतन, हेच सर्वात श्रेष्ठ तप आहे.

शौर्य : आता शौर्याचा विचार ऐक. जो रणांगणात बलाढ्य शत्रूला सेनेसह जिंकतो, त्याला लौकिकात शूर असे म्हणतात. परंतु येथे तो अर्थ विहित नाही. जो अनिवार जीव-भाव प्रवाह रूपाने, आपल्या मागे लागलेला असतो, त्याला जिंकणारा, खरा महावीर शूर होय. मी नेहमी सदाचरणाने चालतो. मीच तेवढा ज्ञानी, असे जे अहंकाराचे विकार, तोच जीवभाव होय. देहाच्या मस्तकावर वर्णाश्रम व आश्रमाच्या माथी कर्म येते. त्यावर अभिमान ठेवणार्‍या देहाविषयी भ्रम निर्माण होतो. यास्तव जिवाचा स्वभाव जिंकून चीदानंदाच्या राज्यावर बसून, आपल्या खऱ्या आत्मस्वरूपी स्वराज्याचे वैभव भोगणे, यालाच खरे शौर्य म्हणतात.


सत्य : आता सत्याचे लक्षण ऐक. निरंतर सर्वत्र समब्रह्म पाहणे, यालाच परमसत्य म्हणतात. ब्रम्ह सर्वव्यापक असून अत्यंत दुर्गम आहे. असे पाहणे हेच सत्य. केवळ सत्य भाषण करणे म्हणजे सत्य नव्हे. याविषयी श्रीकृष्ण स्वतः निरूपण करून सांगत आहेत. कित्येक विद्वान ऋत म्हणजेच सत्य म्हणतात. ते प्रवृत्तीच्या दृष्टीने खरे आहे. पण निवृत्तीत ब्रह्माला सम मानणे हेच सत्य होय. येथे ऋत म्हणजे ऐकणाराचे हित करणारी, व दुःख संबंधरहीत अशी सत्यवाणी, तिलाच खरोखर ऋत म्हणतात. जगत् जरी भिन्न भिन्न प्रकारचे भासत असले तरी, आत्मैक्य दृष्टीने त्याचे अधिष्ठान ब्रह्म सर्वत्र समच आहे. यालाच सत्य असे म्हणतात.




शौच : आता शौचाचेही निरूपण ऐक. अंतःकरण शुद्ध झाल्यावाचून त्याग किंवा संन्यास घडत नाही. चित्ताला जे कर्मरूपी मलाचे बंधन असते, ते स्वधर्माने धुऊन टाकावे. कर्मानेच कर्माचा नाश करून, आपण निष्कर्ष व्हावे. कलासक्ती टाकून, स्वधर्म स्वधर्माचरण केल्याने चित्तावरील मल धुवून जातो. व अंतकरण शुद्ध होते. यालाच शौच म्हणतात. अशा प्रकारची अंत:शुद्धी संन्यास ग्रहणाचा पायाचे ठरते.

त्याग : सर्व संकल्पांचा त्याग हाच उत्तम संन्यास. यालाच श्रेष्ठ त्याग म्हणतात. देहच आत्मा, अशी मनात दृढ कल्पना ठेवून, आतून नित्य नवी तळमळ लागत असते. व बाहेरून मात्र दंड कमंडलू, भगवी वस्त्रे यांचा पूर्ण डौल आणणे, ही लौकिक संन्यास संन्यास दीक्षा होय.


धन : धन, धान्य, पशु, रत्ने ही काही मनुष्याची खरी हितकर संपत्ती नव्हे. मोक्ष मार्गात स्वधर्मच समर्थ असून, तोच खरे वैभव भोगवितो. घरात पुरून ठेवलेले धन बरोबर येत नाही. धर्म मात्र आपल्या बरोबर चालत येणारे द्रव्य असून, त्याचे ओझे वाहावे लागत नाही. व ते आपल्याला बद्धही करीत नाही. धार्मिक माणसाने सगळे द्रव्य धर्मार्थ खर्च करून, मज नारायणाला आपला खजिनदार करून ठेवले आहे. त्यामुळे ज्यांना जे जे लागते, ते ते मी त्यास आपण होऊनच पुरवतो. म्हणून धर्म हाच खरा द्रव्याचा ठेवा आहे. हेच सत्य होय.


यज्ञ : आता यज्ञाचे यथार्थ लक्षण ऐक. अग्नि हेच माझे मुख आहे. यज्ञभोक्ता मी नारायण आहे. माझी यज्ञदीक्षा घेतलेले, ते दीक्षित, भक्तिभावाने माझा यज्ञ करून पूर्ण सुखाला प्राप्त होतात. मी श्रीकृष्णच यज्ञ आहे. यज्ञातील ब्राह्मण हेच माझे स्वरूप होय. पण त्यांनी जर का अधर्माने द्रव्य संपादन करून, अविधीपूर्वक व दंभाने यज्ञ केला तर, तोही माझ्याच मुखात पडतो खरा; पण त्याचे फळ मात्र काहीच मिळत नाही. जे माझी भक्ती हीच यज्ञ दीक्षा घेतात, व सगळे विश्व हेच माझे मुख समजून, त्याचे यजन करतात, त्याचा मी नारायणच यज्ञ आहे.


दक्षिणा : आता दक्षिणा कोणती ते ऐक. यज्ञाला केव्हाही किंमत नसते. त्यात ज्ञानोपदेश रुपी अमूल्य दक्षिणा हाती येताच, याज्ञिक आत्मसुखाला प्राप्त होतात. व संपन्न होतात. ते धन कल्पांतीही संपत नाही.


बल : जीव शिव दोघांनाही समाधान होते. सर्वात प्राण फार बलाढ्य आहे. प्राणाच्या स्फूर्तीनेच मन चंचल व चपळ झाले आहे. मन सतत प्राणाच्या अधीन असते. अशा प्राणाला जिंकणे यालाच प्राणायामाचे बल म्हणतात. प्राणाच्या अधीन जीव व मन असते. त्या प्राणाचे दमन करून, त्याच्या स्वाधीन ठेवणे, यालाच अति बल असे म्हणतात. त्याला स्वतः देवच भेटायला येतो.


दया : आता दयेचे लक्षण ऐक. भाग्यावाचून दया फोल आहे. औदार्य हे भाग्याचे लक्षण आहे. ज्ञान, वैराग्य, संपत्ती, औदार्य, ऐश्वर्य आणि यश या सहा गुणांनी युक्त असणे, असे भाग्य ज्याला लाभते, तोच यथायोग्य परिपूर्ण दयेचा धर्म पाळतो. कारण तो सन्मानाने दान देतो. व दारिद्र्य नाहीसे करतो. माझ्या भाग्यासारखे त्याचे भाग्य सृष्टीत दुसऱ्या कोठेही सापडणार नाही. ज्याच्या पोटात भूतदया असते, तो सर्व जगात भाग्यवान होय.


भाग्य : आता लाभाचे लक्षण ऐक. माझी उत्तमोत्तम भक्ती यालाच लाभ म्हणतात. भक्तीमुळे चारी मुक्ती भक्ताच्या पाया पडतात. श्रेष्ठ व देव लोटांगण घालतात. म्हणून माझी भक्ती हाच परम लाभ आहे. या भक्तीने मी श्रीपती प्राप्त होतो.


विद्या : आता विद्येचे यथार्थ लक्षण ऐक. जी वासनेचा संबंध जोडून निर्विकार आत्म्याला जीव पदाला आणते, अभेदात भेद उत्पन्न करते, ती अविद्येची बाधा होय. देहाच्या मस्तकावर वर्णाश्रम आहेत. आश्रमाच्या माथी कर्म. त्या कर्माचा जो अभिमान, त्यामुळेच जिवाला देहबुद्धी उत्पन्न होते. जीवाची बाधा नष्ट करून, जी त्याला चिदानंदात मिळविते, तीच खरी आत्मविद्या होय. जी अविद्येचे निरसन करते, तीच शुद्ध विद्या होय. शास्त्रादि इतर ज्या चौदा विद्या, त्या केवळ अविद्येचा विस्तार होय. जी जीवाची बाधा घालविते, तिलाच आत्मविद्या म्हणतात.

लज्जा : आता ह्री म्हणजे लज्जा. तिचे लक्षण ऐक. निंद्यकर्माविषयी तिरस्कार वाटणे, यालाच लज्जा म्हणतात. केवळ शरीराचे अवयव झाकणे याला लज्जा कोणी म्हणावे! प्राण गेला तरी निंद्य कर्म न करणे, हीच खरी लज्जा होय. स्वतः साक्षात लक्ष्मी जरी घरी चालून आली, तरी जो तिच्याकडे ढुंकूनही पाहात नाही, इतका जो निरपेक्ष असतो, त्याची तीच खरी श्री म्हणजे संपत्ती होय. हिच्या विषयी जो निरपेक्ष असतो, त्याला मी श्रीकृष्ण शिरसावंदन करतो.


सुख : सुख व महादुःख यांना ग्रासून टाकून, ज्याच्या मनात स्वाभाविक आनंद प्रकट होतो, त्याला सुख असे म्हणतात. सुखदुःखा विषयी उदासीनता, हेच खरे सुख. जेथे दुसऱ्याची गरज नाही, इंद्रियांचे दैन्य नाही, असा जो हृदयातील विषयरहित आनंद, तेच निजसुख होय.


दुःख : आत्मसुखाला विसरून विषयाची इच्छा करणे, यालाच परम दुःख म्हणतात. नित्य विषयाची प्राप्त होऊनही, ज्याची कामना तृप्त होत नाही, ती कामासक्तीच खरे दुःख होय.


पंडित : जो, हा बंध आणि हा मोक्ष, असे अनुभूतीने जाणतो, त्याला पंडित म्हणतात. परंतु यथार्थ ज्ञान नसता, आम्ही वेदशास्त्रसंपन्न विद्वान आहोत, असे म्हणणारा पंडित नव्हे. ज्याला शांती, समाधान व बंध मोक्षाचे यथार्थ ज्ञान आहे तोच महापंडित होय.




मूर्ख : केवळ क्षणभंगुर देहाला मी समजून जो आनंदित होतो, व नरक यातना भोगतो, तोच खरा मूर्ख होय. देह स्त्रीच्या अशुद्ध रक्तापासून उत्पन्न होतो, व तो विटाळ मरेपर्यंत वस्तीला असतो. अस्थी, चर्म, विष्ठा, मूत्र हेच देहाचे स्वरूप आहे. अशा देहावरील अहंता तिला परम मूर्ख म्हणतात.


सन्मार्ग : माझ्या वेदमार्गाने जाणे, हाच खरा सन्मार्ग होय. ज्याच्या चित्ताला भ्रम झाला असेल, तोच गुरुची निंदा करतो. व वेदशास्त्रार्थ मानत नाही. तो वाईट मार्गात पडतो. जो आप्तवर्ग माता-पित्याचा धिक्कार करतो, त्याच्या वृत्तीलाच चित्तविक्षेप बुद्धिभ्रंश म्हणतात. आपण स्वतःच परब्रम्ह आहोत, हे जाणणे हाच उत्तम सन्मार्ग होय. आणि हे न जाणता कामनासक्त होणे, हा आड मार्ग होय.


स्वर्ग : आता स्वर्ग शब्दाचा अर्थ ऐक. सत्व गुणाच्या वृद्धीने आत्मसुखाला प्राप्त होणे, हाच खरा स्वर्ग होय. इंद्रलोककी गमन म्हणजे स्वर्ग नव्हे. जे शुद्ध सत्वाची वृद्धि करून, आत्मसुखाला प्राप्त झाले, तो सत्वगुण म्हणजे स्वर्ग होय.


नरक : काम, क्रोध, लोभ वाढल्याने महामोह खवळतो. तो ज्ञानासह विवेकाला बुडवून, तमोगुण पसरवतो. आपल्या चित्तरूपी वृत्तीवर अज्ञानरूपी दाट अंध:कार पसरला म्हणजे, कर्तव्य अकर्तव्य काही कळेनासे होते. अशी जी तमाची उसळी, तिलाच महा नरक असे म्हणतात. यमलोकीच्या यातना याला नरक म्हणू नये. आता या तमोवृत्तीत बुडणाऱ्या जीवाचा उद्धार तरी कोण करणार? हा उद्धवाच्या मनातील आशय जाणून, श्रीकृष्ण म्हणाला, आपला सखा सद्गुरूच बुडणाऱ्यांचा उद्धार करतो. असा गुरु म्हणजे मि नित्य ज्याचे पाय धरतो, तो चीत्स्वरूप पूर्णपरब्रह्मच गुरु होय. अज, अव्यय, अनंत अछेद्य, अपरिमित इत्यादी विशेषणांनी सद्गुरुनेच ब्रह्माचा महिमा विस्ताराला. सद्गुरूच शिष्याचा आप्त, सुह्रुद, सखा, बंधू आहे. तोच नरकाचे निवारण करतो.


घर : आता घराचे लक्षण सांगतो. मजले, बंगले हे काही वास्तविक घर नव्हे. मनुष्यदेह हाच खरा गृहस्थाश्रम आहे. त्या घरातच मी पुरुषोत्तम नित्य राहतो. त्यात स्वधर्मकर्म केल्याने मी आत्माराम प्रसन्न होतो. या नरदेहरुपी घरातच मोक्षाची प्राप्ती होते.


संपन्नता : आता आढ्यतेचा म्हणजे संपन्नतेचा प्रकार ऐक. जो मनुष्य ज्ञानाने संपन्न आहे, त्याचे ते ज्ञानरुपी धन, कल्पांतीही संपत नाही. तोच अत्यंत धनवान होय. जो ज्ञानरूपी धनाने संपन्न असतो, त्याच्या हाती तात्काळ परब्रम्ह येते.


दारिद्र : आता दरिद्राचे लक्षण ऐक. कोट्यावधी द्रव्याच्या राशी जवळ असल्या तरी, ज्याचे मन संतुष्ट नसते, त्याला पक्का दरिद्री म्हणतात. परंतु पदरी फुटकी कवडीही नसून, जो नित्य संतुष्ट असतो, तोच सगळ्या जगात संपन्न होय. गाठीला अगणित द्रव्य असून पोटाला न खाणे व मन सदा लोभी असणे, हेच दरिद्र्याचे लक्षण होय. आता कृपणाचे लक्षण सांगतो. आत्मस्वरूपाचा विचार केला असता, मनुष्य स्वतःच इंद्रियांचा राजा आहे. परंतु ते विसरून, तो दीनपणाने इंद्रियांना वर्ष होतो, इंद्रिये मनाचे दास आहेत. पण त्यापेक्षा आज्ञ होऊन, तो पराधीन होतो. इंद्रिये व मनाला ताब्यात न ठेवल्यामुळे तो कृपण बनतो.


ईश्वर लक्षण : आता ईश्वराचे सुलक्षण ऐक. ज्याला कनक आणि कांता मनापासून आवडत नाहीत, तोच त्रिभुवनात खरा ईश्वर होय. तू जेवढ्या गुणांविषयी प्रश्न केलेस ते सर्व गुण अंगी असूनही, जो त्यापासून अलिप्त राहतो, त्यालाच परिपूर्ण ईश्वर समजावा.




तुझ्या शमादि प्रश्नांचे मी जे उत्तर सांगितले, त्याच्या विपरीत जे अशमादि गुण, तेच अनिश्वरत्व आहे. भगवंत श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा! मी तुझ्या सगळ्या प्रश्नांचे निरूपण उत्तम प्रकारे केले आहे. ज्यायोगे तू ब्रह्म संपन्न होशील. या संसारातील गुणदोषांची उदाहरणे इतकी अगणित आहेत, की ती कधीही संपणार नाहीत. याचे विवेचन करणे फार कठीण आहे. म्हणून मौन पाळावे. हा मार्ग उत्तम होय.


कोणाचे गुणदोष कानांनी ऐकू नयेत. डोळ्यांनी पाहू नयेत. तोंडांनी उच्चारू नयेत. किंवा आपल्या मनातही ठेवू नयेत. संसारी लोकांना हाच खरा मुक्तीचा सुलभ मार्ग आहे.


श्रीकृष्णार्पणमस्तु!

 

Kommentare


bottom of page