
अधिकमासाचे वाङ्मयीन दीपदान
Updated: Oct 17, 2020

अधिकमासामध्ये दीपदानाचे विशेष महत्व सांगितले जाते. अन्नदानाबरोबर अनेकजण आपल्या जावयाला अपूपदान व दीपदान करतात. ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. बहुतेक महाराष्ट्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दीपदान म्हणजे आपल्या मुलीच्या आयुष्यात सुखासमाधानाचा प्रकाश पडावा हाच हेतू यामध्ये अंतर्भूत असतो. या दीपाचे आध्यात्मिक दृष्टीने जे महत्व आहे. ते संतसम्राट ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत पदोपदी पटवून दिले आहे. दीप हे ज्ञानाचे प्रतिक समजले जाते. व हे ज्ञानदान करणे म्हणजे सुखाचा मार्ग सापडणे होय. यासाठी मी श्रीपांडुरंगकृपेने ज्ञानेश्वरीतील 1 ते 18 अध्यायामध्ये दीपच्या प्रमाणाने जेवढ्या ओव्या माऊलींनी सांगितल्या आहेत, त्या एकत्र करुन त्या अर्थासहित वाङ्मयीन दीपदान समजून आपणापुढे सादर करीत आहे. या ओव्या वाचून आपले जीवन प्रकाशमान होवो हीच श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना!
येऱ्हवी तरी मी मुर्खु।
जरी जाहला अविवेकु।
तरी संतकृपा दीपकु। सोज्वळू असे ।
अर्थ:- सहज पाहिले असता जरी मी अज्ञानी व विवेकहीन असलो तरीही संतकृपारुपी दीप सोज्वळ सदा तेवता आहे. त्याच्या साह्याने मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो.
जैसा मार्गेची चालता।
अपावो न पवे सर्वथा ।
का दीपाधारे वर्तता। नाडळीजे।
अर्थः- ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालले असता कधीही अपाय पोहोचत नाही. किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळत नाही. त्याप्रमाणे स्वधर्माने सर्व इच्छा पूर्ण होतात.
जैसी दीपकळिका धाकुटी ।
परी बहु तेजाते प्रगटी ।
तैसी सद्बुद्धी हे थेकुटी। म्हणो नये।
अर्थ:- ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते तरीपण सर्वत्र प्रकाश पाडते त्याप्रमाणे ही सुबुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये.
जैसा निर्वातीचा दीपु ।
सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुध्दी स्वस्वरुपु । योगयुक्तु।
अर्थ:- ज्याप्रमाणे निवाऱ्यातील दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही, ज्याप्रमाणे योगमुक्त म्हणजे जो स्थिरबुध्दी आहे तो आत्मस्वरुप समाधीमध्ये निश्चलपणे रत असतो.
मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी।
ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर।
अर्थ:- विवेकदीपास आलेली अविवकेरुप काजळी झाडून तो विचाररुप दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना निरंतर (पुढती अस्तवेना असा अद्वैतरुप) आनंदमय दिवाळीचा दिवस उगवतो.
ऐसे सर्वज्ञानाचा बापु।
जो कृष्णु ज्ञानदीपु।
तो म्हणतसे सकृपु। ऐक राया ।
अर्थ:- संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र ऐक, ज्ञानीजनांचे जनक जे केवळ ज्ञानदीपच जे असे भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले.
जैसी पूर्वदिशेच्या राऊळी ।
उदया येताचि सूर्यदिवाळी।
की येरीहि दिशा तियेची काळी। काळिमा नाही।
अर्थ:- पूर्वदिशेच्या घरी सूर्य उगवताच प्रकाशाचा -दिवाळीचा सण सुरु होतो. त्यामुळे त्याच वेळेस इतर दिशांचाही अंधार नाहिसा होतो. त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणवृत्तीत जीवब्रम्हैक्य ज्ञानाचा उदय झाला पण त्याची परिणती मात्र सर्व जगत् ब्रम्हरुप आहे अशा अपार बोधसागरात होतेे.
परि तो रसातिशयो मुकुळी ।
मग ग्रंथार्थ दीपु जवळी।
करी साधुहृदय राऊळी । मंगल उखा ।
अर्थ:- परंतु तो रसालंकारयुक्त विस्तार आटोपता घे, आणि गीताग्रंथाचा अर्थरुपी दीप प्रज्वलित कर व साधुजनांच्या हृदयरुपी मंदिरात मंगलदायक (अद्वैत दिवसाचा) उषःकाल कर.
ते बुध्दीही आकळिता साकडे ।
म्हणोनि बोली विपाये सापडे।
परि निवृत्तिकृपादीप उजियडे । देखैन मी।
अर्थ:- ते बोलणे बुध्दिलाही आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दामध्ये कदाचित ते व्यक्त होईल. परंतु श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपारुप दीपाच्या उजेडाने मी पाहीन व सांगेन.
दीपा आणि प्रकाशा ।
एकवंकीचा पाडु जैसा।
तो माझ्या ठायी तैसा। मी तयामाजी।
अर्थ:- ज्याप्रमाणे दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असते, त्याप्रमाणे तो माझ्याठिकाणी व मी त्याच्याठिकाणी ऐक्यतेने आहोत.
जो सर्वज्ञतेचा वोलावा।
जो यादव कुळीचा कुळदीवा।
तो कृष्णजी पांडवा । प्रती बोलिला।
अर्थ:- तो सर्वज्ञतेचा जिव्हाळा व यादवकुळाचा कुलदिपक असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला असे बोलला.
जैसा दीपु ठेविला परिवरी।
कवणाते नियमी ना निवारी।
आणि कवण कवणिये व्यापारी। राहाटे तेहि नेणे।
अर्थ:- ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा कोणास अमूक एक काम कर असा नियम घालून देत नाही किंवा कोणी काही करीत असल्यास ते करु नको असे म्हणत नाही. आणि कोण काय व्यापार करण्यास प्रवृत्त आहे हेहि जाणत नाही.
जैसा दीपे दीपु लाविजे।
तेथ आदील कोण हे नोळखिजे।
तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मीचि होऊनी ठाके।
अर्थ:- ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्वभावांनी मला भजतो तो मद्रूपच होऊन राहतो.
तया तत्वज्ञा चोखटा।
दिवी पोतासाची सुभटा।
मग मीचि होऊनी दिवटा। पुढा पुढा चाले।
अर्थ:- अर्जुना! त्या शुद्ध आत्मज्ञानी भक्ताकरिता ज्ञानरुपी कापराची ज्योत पाजळून मशालजी बनून त्याच्या पुढे पुढे मीच चालतो.
ती अक्षरे नव्हती देखा।
ब्रम्हसाम्राज्य दिपिका।
अर्जुनालागी चित्कळिका। उजळलिया कृष्णे।
अर्थ:- माऊली म्हणतात, तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रम्हसाम्राज्यास, ऐश्वर्यास आत्मतत्वाने दाखविण्याऱ्या ज्ञानरुपी ज्योतीच श्रीकृष्णाने अर्जुनासाठी लावल्या असे समज.
का घरीचिया उजीयेडू करावा।
पारखिया अंधारु पाडावा।
हे नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा।
अर्थ:- अर्जुना! आपल्या घरच्या लोकांना तेवढा उजेड पाडावा व परक्यांना मात्र अंधार पाडावा, हे ज्याप्रमाणे दिवा जाणतच नाही.
का स्नेहसूत्रवन्ही।
मेळू एकिचि स्थानी।
धरिजे तो जनी। दीपु होय।
अर्थ:- अथवा तेल, वात व अग्नि यांचा संयोग करुन एकत्र ठेवणे म्हणजे तोच दिवा होय. असे लोकांत म्हणतात.
नातरी केळी कापूर जाहला।
जेवी परिमळे जाणो आला।
कीं भिंगारी दीपु ठेविला। बाहेरि फाके ।
अर्थ:- अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासावरुन ओळखता येतो किंवा भिंगात तावदानात ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश ज्याप्रमाणे बाहेर सभोवार पसरतो.
काळ शुध्दी त्रिकाळी।
जीवदशाधूप जाळी।
ज्ञानदीपे वोवाळी । निरंतर।