अधिक महिना का धरतात ?
सर्वसामान्य व धर्मपरायण मंडळी अधिकमासाकडे शुभ-अशुभ, पाप-पुण्य, ग्राह्य-निषिध्द अशा कल्पनेतून पाहतात. परंतु अधिकमास हि कालगणनेशी संबंधित संकल्पना आहे. हिंदू पंचांग हे सौर व चांद्र कालगणनेवर आधारित आहे. या दोन कालगणना पद्धतीमध्ये मेळ घालण्यासाठी केलेली योजना म्हणजे ‘अधिकमास’ होय.
सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, आणि वर्ष ही कालगणनेची परिमाणे आहेत. पृथ्वी स्वतः भोवती फिरते तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे, तिचे १२ समान भाग केल्यास, प्रत्येक भागास राशी असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हां सूर्य राश्यांतर करीत असल्यासारखे भासते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास लागणारा कालावधी म्हणजे एक सौर वर्ष होय. हा कालावधी ३६५ दिवस ५ तास ४६ मिनिटे ४७.५१ सेकंद म्हणजे सुमारे ३६५ १/४ दिवसांचा असतो. चंद्रास पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा कालावधी म्हणजे चांद्रमास होय. चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यातील फरक (वजाबाकी) ११ दिवसांचा पडतो. सुमारे ३ वर्षात सौरवर्ष व चांद्रवर्ष यातील फरक ३३ दिवसांचा (साधारण एक महिना) होतो. चांद्रवर्ष सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी कमी आहे. या कालगणनेत मेळ राखण्यासाठीच अधिकमासाची योजना पंचांगकर्त्यांनी केलेली आहे. चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांपैकी एका विशिष्ठ महिन्यांच्या नावापूर्वी अधिक लावून तो अधिकमास घेतात. शुध्द प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत असणारा महिना म्हणजे चांद्रमास समजला जातो. ज्या चांद्रमासात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत राश्यांतर होत नाही. त्याला अधिकमास म्हणतात. अशी स्थिती तीन वर्षांनी येते. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, आषाढ १८ वर्षांनी, अश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिकमास ठरतो. भाद्रपद पर्यंतच्याच मासांना अधिकमास म्हणतात. अश्विन व कार्तिक अधिक झाले तर ते अधिकमास ठरत नाहीत. ज्यावर्षी अश्विन अधिक येतो त्याच वर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहरापर्यंत मार्गशीर्ष व दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासांची धर्मकृत्ये एकाच महिन्यात करतात. या जोड मासाला संसर्प असे म्हणतात. कार्तिक पुढील ४ महिने मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन अधिक मास होत नाहीत. व अश्विनच्या पूर्वी क्षय मास होत नाही.
अधिक मासाला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिकमासात सूर्याचे राश्यांतर (सुर्यासंक्रांत) होत नाही. वातावरणात विशिष्ठ प्रकारचा बदल होतो. वातावरण गढूळ, मलीन बनते. म्हणून या मासाला मलमास म्हणतात.
अधिक मासाचा पौराणिक उल्लेख :
ऋग्वेदात अधिक मासाचा उल्लेख आहे. ‘वेदाय उपजायते’ या मंत्र अंशाचा अर्थ संदर्भावरून अधिकमास असाच आहे. वागसनेयी संहितेत अधिकमासासाठी अहंसस्पती व मलीम्लुच अशी दोन नावे आलेली आहेत. यातील मलीम्लुच या शब्दावरून मलमास हा शब्द आला आहे. वेदाच्या ज्या भागात अधिकमासाचा उल्लेख आहे तो इ. स. पूर्व १५०० वर्षांच्या सुमारास झाला असावा असे काही युरोपीय पंडितांचे मत आहे. तर शं. व्या. दीक्षित यांच्यामते अधिकमास धरण्याची पद्धत इ. स. पूर्व ५००० वर्षांपासून प्रचलित असावी. कौरव पांडव द्यूत खेळत असता पांडव त्यात हरले. व त्यांन १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. त्याप्रमाणे अज्ञातवास संपल्यावर पांडव परत हस्तिनापुरी आले. त्यावेळी चान्द्रवर्षाप्रमाणे कालगणना धरली होती. परंतु कौरवांना हि मान्य नव्हती. तेंव्हा भीष्माचार्यांनी अधिकमासाची योजना असल्याचे सांगून कौरवांची समजूत काढली होती. असे ऐकिवात आहे.
बृहन्नारदीय आणि पद्मपुराणात अधिक मासाचे महत्व सांगितले आहे. अधिक मासात करावयाची व्रते, दान, उद्यापन, याचा विधी सांगितला असून फालश्रुतीही सांगितली आहे. अधिक मासला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. हि अधिकमासाची देवता मानतात. भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्यामध्ये झालेल्या संवादात विष्णूने लक्ष्मीला अधिक मासाचे महत्व व उद्यापन याबद्दल माहिती सांगितली. निमिशारन्यात निमिषारण्यात धर्मावर चर्चा करणाऱ्या ऋषींना सूत नावाच्या विद्वान पुराणिकांनी अधिक मास माहात्म्य सांगितले.
अधिक मासातील कार्य :
विवाह, उपनयन, नवीन घराच्या बांधकामाचा आरंभ, बालकांचा अन्नप्राशन विधी (उष्टावन), राज्याभिषेक, गृहप्रवेश, देशांतर यात्रा हि कामे अधिक मासात वर्ज्य मानली आहेत. अधिक मासात मृत झालेल्यांचे श्राद्ध त्याच निजमासात त्याच तिथीस करतात. अधिक मासात जन्मलेल्या बालकांचा जन्ममास त्या नावाचा शुद्धमास धरतात.
धार्मिक कार्यासाठी पर्वणीचा असतो. या मासात ईश्वराला समर्पित करून व्रत, उपवास, पूजा, स्नान, दान, धर्म, पुराण वाचन, श्रवण केले तर त्याचे अक्षय फळ मिळते. या महिन्यात दररोज एकभुक्त किंवा उपवास करतात. सूर्याची पूजा करतात. या महिन्यात अधिकाधिक दान करावे. ३३ अनारसे पुरणाचे धोंडे, दिवे, बत्तासे, खारीक, बदाम, पादत्राणे, छत्री, सुवर्णदान करतात. महाराष्ट्रात अधिकमासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. कन्या व जावई यांना लक्ष्मी नारायण स्वरूप मानले आहे. अधिक मासामध्ये ३३ जोडप्यांना (मेहूण) जेवण घालण्याची पद्धातही आहे. या मासात कुठलाही सणवार नसल्यामुळे महिनाभर नामचिंतन, तीर्थस्नान, प्रदक्षिणा, देवदर्शन, ग्रंथ श्रवण, वाचन करून पुरुषोत्तमाची जोड करावी. सर्वाभूती परमेश्वर पहावा.
दानफलं मंत्रणानेन योदद्यातत्रयस्त्रींशदपूपकान |
प्राप्नोति विपुलां लक्ष्मीं पुत्र पौत्रादि संपदः ||
या श्लोकरूप मंत्रांनी जो तेहतीस अपूपदान देईल, त्याला पुत्र पौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल.
अधिक मासात करावयाची कामे करावीत :
नित्य व नैमित्तिक कर्मे करावी. जे केल्यावाचून गती नाही. अशी कर्मे करावी. ज्वरशांती, पर्जन्येष्टी इ. नेहमीची काम्यकर्मे करावी. देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते. ग्रहण श्राद्ध, जात कर्म, नाम कर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावे. मन्वादी व युगादी संबंधी श्राद्धादी कृत्ये करावी. तीर्थ श्राद्ध, दर्श श्राद्ध, नित्य श्राद्ध ही करावी.
अधिक मासात कोणती कामे करू नयेत. :
काम्यकर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, व वास्तुशांती संन्यासग्रहण, नुतन व्रत, ग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नये.
**********************************************************************
Comentarios