top of page

इवलेसे रोप लावियेले द्वारी | एक चिंतन |

Updated: May 30, 2023


संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पशा आयुष्यात सर्व जगाला धार्मिक व आध्यात्मिक उद्देश करण्याकरता विपुल संतवाङ्मयाची काव्यरचना केली. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेवर केलेली मराठी टीका म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व जगाने मान्य केला. तसेच अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ यांचीही रचना केली. याच बरोबर इतर संतांप्रमाणे माऊलींनी 'अभंग गाथा' या ग्रंथाची निर्मिती करून भक्तीकाव्य, रूपके, बालक्रीडा, गौळणी आणि विपुल अभंगरचना केली. ती आपण रेडिओवर अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. सामान्य व्यक्तींना ज्ञानदेव अभंग गाथा याचा परिचय सुद्धा नसल्याचे समजते. त्यांच्या अनेक अभंगांमधून आपण 'इवलेसे रोप लावियेले द्वारी' या अभंगाचे अल्प विवरण करणार आहोत.


इवलेसे रोप लावियेले द्वारी |

त्याचा वेलू गेला गगनावरी ||

मोगरा फुलला मोगरा फुलला |

फुले वेचिता अतीभारु कळियांसी आला ||

मनाचिये गुंती गुंफियेला शेला |

बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ||


अर्थात अभंग जरी  इवलासा असला तरी तो मोगऱ्याच्या वेलीप्रमाणे गूढ अर्थाने फोफावला आहे. याचे उत्कृष्ट व मार्मिक विवेचन माउलींनी केले आहे.परब्रम्ह परमात्म्याने सृष्टी निर्माण करताना अंडज, जारज, स्वेदज, उद्भीज या चार खाणीतून पशू, पक्षी, कीटक, जलचर, वृक्ष  व मानव अशा चौर्‍यांशी लक्ष योनीची निर्मिती केली.


प्रत्येक जन्मात केलेल्या स्वकर्मानुसार त्या जीवाला पुढील योनीत जन्म घ्यावा लागतो. यापैकी मनुष्यजन्म हा शेवटचा जन्म मानला आहे. कारण इतर योनीत इच्छा असूनही परमेश्वराची प्राप्ती अथवा मुक्ती मिळवण्याचे साधन नाही. त्यामुळे एका एका योनीत कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो.


पण मनुष्य जन्मात इतर जीवापेक्षा परमेश्वराने जीवाच्या उद्धारासाठी सद्सद्विवेकबुद्धी व वाणीची देणगी विशेषत्वाने दिलेली आहे. थोडक्यात मनुष्यजन्म म्हणजे एक रेल्वे जंक्शन आहे. येथून सर्व दिशेला रेल्वे गाड्या सुटतात. त्या सत्व, रज, तम या त्रिगुण रूपात असतात. आपण कोणत्या गाडीत बसायचे ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. दुष्टकर्माने, वाममार्गाने आचरण केल्यास निकृष्ट योनीत जन्म मिळतो.  म्हणजे सर्प, विंचू, व्याघ्र, वटवाघुळ इत्यादी. परंतु आपण मनुष्य जन्मांत नराचा नारायण होऊ शकतो. याचा उपदेश करण्यासाठी देवांनीच संतांचे अवतार घेऊन उपदेश केला आहे. त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून माऊली याचे महत्त्व पटवून देतात.मनुष्यदेहरुपी द्वारात 'ईवलेसे रोप' म्हणजे भगवंताची भक्ती. अर्थात हरिनामरुपी रोप लावले, म्हणजे मनुष्य देहात 'रामकृष्णहरी' या बीज मंत्राचा भक्तिप्रेमाने अंगीकार केला. तर त्या छोट्याशा रोपाचा वेल आकाशापेक्षा व्यापक असणाऱ्या परमात्मरूप, ब्रह्मस्थितीरूप मोक्षापर्यंत म्हणजेच जीवनमुक्ती पर्यंत वाढत जातो. आणि उद्धार होतो.

कलियुगी उद्धार हरीच्या नामे

हे मुक्तीचे मोठे शस्त्रच आहे. अगदी याच अर्थाचे एक उत्कृष्ट रूपक संत तुकाराम महाराज यांनी दिले आहे.


हरिनाम वेली पावली विस्तार |

फळी पुष्पी भार ओल्हावली ||

तेथे माझ्या मना होई पक्षीराज |

साधावया काज तृप्तीचे या ||

मुळीचिया बीजे दाखविली गोडी |

लाहो करी जोडी झाली याची ||

तुका म्हणे क्षणक्षणा खातो काळ |

गोडी ते रसाळ अंतरेल ||


भावार्थ: हरीनाम रुपी वेली लता बरीच विस्तारले असून ऐहिक सुख साक्षात्कारात्मक फुलांनी टवटवीत झाली. गजबजली आहे. अरे माझ्या मना ! तुझे निरंकुशा तृप्तीरुपी अपेक्षित कार्य साधण्यासाठी तू या वेलीवर पक्षीराज होऊन वास्तव्य कर. कायम बैस. या हरिनामवेलीचे बीजभूत असणारा मूळ हरी तो गोड म्हणजे सुखरूप असल्यामुळे, हरिनामामुळे लाभणार्‍या कृतकृत्यतारूपी फळातही त्या गोडीची अभिव्यक्ती होते. तीच गोडी व्यक्त होते. एवढ्याच साठी त्या फलप्राप्तीचे साधन जी हरिनाम भक्ती ती करण्याची तू त्वरा कर. श्री तुकोबाराय म्हणतात, क्षणाक्षणाला, हरघडीला तुझ्या आयुष्याचा काळ जात आहे. तू त्या हरिनामवेली वर बसण्याची दिरंगाई केलीस, अपेक्षा केलीस तर तुला त्याच्या रसाळ सुखमय मोक्षरूपी फळाची गोडी लाभणार नाही. त्या सुखाला तू अंतरशील.

नामस्मरण प्रेमपूर्वक नाम भक्तीचे अनुष्ठान केल्यास प्रथम त्याचे चित्त शुद्ध होते व चित्तशुद्धी नंतर हरी गुरुकृपेने चित्तात ज्ञानाचा प्रकाश पडून वर्तमान देहातच भ्रमनिरासपूर्वक ब्रह्मस्वरूपाने जीवन मुक्ती प्राप्त होते. नाम हे अधिकार नसेल तर त्यास ज्ञानाचा अधिकार प्राप्तीचे साधन आहे. त्यामुळे चित्तशुद्धी होते. तसेच ते पुण्यद्वारा श्रीगुरूंची प्राप्ती करून देऊन महावाक्य श्रवणरूपी अंतरंग साधनेपर्यंत सहाय्य करते किंबहूना! प्रेमपूर्वक नामानुष्ठान करणाऱ्यास स्वतः भगवंतच गुरुरूपाने अवतीर्ण होऊन ज्ञानाचा उपदेश करतो.


माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव |

आपणचि देव होय गुरु ||


माझ्या विठोबाचा आपल्या अनन्य भक्ती विषयी कसा प्रेम भाव आहे! भक्ताने कृतकृत्यतेच्या हेतूने अनन्य भक्ती केली तर तो स्वतः सगुण अवतार घेऊन अद्वैत तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी गुरूही होतो. मग हळूहळू मनन-चिंतन निदिध्यासनामुळे संशय विपर्यासाची निवृत्ती होऊन शेवटी 'मी ब्रह्मरूप आहे' अशा व्यापक असणाऱ्या ब्रम्हाचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होते. त्या वेलाचा विस्तार झाल्यावर त्या बोधने देह तादात्म्य भ्रांती नाहीशी होऊन 'जीवनमुक्तीचा' लाभ होतो. आता उर्वरित प्रारब्धानुसार आयुष्याची स्थिती

'मोगरा फुलला मोगरा फुलला |

फुले वेचिता अतिभारु कळियांसी आला |'

अशी होते.


फुले ही आनंदाची सुखाची द्योतक आहेत. जीवनमुक्त स्थितीत अक्षय्य तृप्ती झाली म्हणजे उर्वरित आयुष्य त्या मोगऱ्याची फुले म्हणजे जीवनमुक्ती'चे विलक्षण सुख, ते वेचित असता, म्हणजे सेवन करीत असता पूर्व संस्काराच्या बळाने होणारा परमानंद संपत नाही. अशा सुखात्मक कळ्यांना अतिभार येतो.

सात्विक श्रद्धेचे किंवा अध्यात्म विद्येचे इवलेसे रोप मानव देहरूपी द्वारात लावले अर्थात वेली मोगऱ्याचे रोप लावले. कारण बटमोगरा व वेली मोगरा असे मोगऱ्यात दोन प्रकार आहेत. बट मोगऱ्याची वेल हळूहळू व सीमित मर्यादेपर्यंतच वाढते. बट मोगऱ्याची फुले ही अनेक पाकळ्यांचे वर्तुळाकार एकमेकात गुंतलेली असतात. अशा निदान चार पाच वर्तुळाकारांचे बट मोगऱ्याचे फूल भरदार होत असते. परंतु वेली मोगरा जसजसा वाढीला आश्रय मिळेल तसा तो हव्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो. वेली मोगऱ्याची फुले वर्तुळाकार एकेरी वाटोळ्या कळ्यांची असतात. ही फुले भरदार दिसत नाहीत, पण कळ्यांचा, फुलांचा बहर मात्र भरपूर येतो. या दोन्ही मोगऱ्यांना सुरेख सुगंध असतो.


हा वेल पाहता-पाहता वाढत वाढत जाऊन आकाशाला भिडला. अध्यात्मविद्येच्या, आत्मविद्येच्या विस्तारामुळे व्यष्टी अंत:करण विशिष्ट चैतन्य, आत्मचैतन्य जीवनदशारूपी भ्रांतीचा त्याग करून अध्यात्मज्ञानाचा मोगर्‍याचा वेल वाढत जाऊन समष्टी चिदाकाशाशी भिडला. म्हणजे विश्वाधिष्ठान शिवाधिष्ठान ब्रह्मचैतन्याशी ऐक्य पावल्याची साक्षात्कारात्मक अनुभूती आली. अर्थात मी सर्वव्यापक ब्रह्म आहे. अशी दिव्य अनुभूती आली.

मोगऱ्याच्या या वेलीचे रूपक सर्वत्र गंध प्रतिमेची उधळण करीत जीवशिवैक्य आणि जगदीश्वरैक्य अभिव्यक्तीकरून सारे त्रिभुवन या अलौकिक गंधाने अद्भुत सौरभाने व नवल सुगंधाने भारावून टाकते. ज्या कळ्यांच्या पर्यायाने फुलांचा बहर इतका दाटून आला आहे की त्या कळ्या व फुले कितीही वेचली तरी वारंवार कळ्यांचा बहर त्या वेलींवर येतोच अर्थात आनंदाची नित्य निरतिशय समाधानाची उणीव बोधवानास येत नाही. तो मोगरा असा काही जोराने फुलला की, आत्मसुखाची फुले वेचिता म्हणजे निरपेक्ष आनंद लुटता येतो. मन हे स्वगत स्वजातीय विजातीय भेदरहित ब्रम्हात्मरुपी स्थिरावल्यामुळे वरचेवर नवनवीन रूपात आनंदरुपी कळ्यांना अतिभार आला आहे.


वसंत ऋतूतील पांढऱ्याशुभ्र फुलांनी व्यक्त होणारी घ्राण संवेदना, गंध संवेदना या अनुक्रमे त्या संवेदना ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीद्वारा व्यक्त होणाऱ्या आनंदरुपी सुगंधाच्या सूचक बनल्या आहेत. पांढरा रंग हा विशुद्धतेचा, स्वच्छतेचा, पवित्रतेचा आणि सुगंध हा प्रेमलक्षणात्मक भक्तीचा, प्रेमानुभूतिचा सूचक आहे. ज्ञानोत्तर जो जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद असतो तो भोगनिरपेक्ष अविद्यादि मलरहीत असल्यामुळे आयुष्यभर तृप्ती देणारा आहे.


मनाचिये गुंती गुंफियेला शेला |

बाप रखुमादेवीवरु विठ्ठली अर्पिला ||


आता पवित्र, सुगंधी, सुरेख असा सुमनांचा शेला हळुवार मल विक्षेप आवरण रहित मनोवृत्तीच्या तंतूंनी मनाचिये गुंती-संज्ञानात्मक धाग्यांनी गुंफून ती फुले युक्ती युक्तीने गुंफून तयार केला तो भक्तीची परिसीमा असलेल्या बाप रखुमाई देवीवरास आपले वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत श्री विठ्ठलास अर्पण केला. म्हणजे औपाधिक व्यक्तित्व, संकोचित व्यक्तित्व, व्यापक चैतन्य सागरात अंतिम श्वासापर्यंत विलीन केले. त्यामुळे मुक्तपणाने ब्रह्म होऊनच ब्रह्मानंद रूप होऊन राहणे निरंतरीचे झाले. मी सदाचा ब्रह्मस्थितीत समर्पित होऊन राहिलो आहे. विशुद्ध ब्रह्म स्वरूपात ज्ञान, आनंदोपभोग काहीच संभवत नाही. जीवचैतन्य हे बोधद्वारा मोगऱ्यासारखे विकसित होऊन विश्‍वाचे अधिष्ठान, विद्याव्यापक चैतन्यात कायमस्वरूपी कसे विलीन होते हे सांगून नित्यनिरतिशय आनंदरूप, स्वसंवेद्य ब्रह्मच उर्वरित राहते हे माऊली सांगतात-


ऐक्याचे एकपण सरे |

जेथ आनंद कणुही विरे |

काहीची नुरोनी उरे |

जे काही गा || ज्ञानेश्वरी 18-1005 ||

अर्थात भेदसापेक्ष असलेला एकपणा जेथे संपतो, विषयापासून प्राप्त होणारा आनंदकणही किंवा भोगनिरपेक्ष आनंद अभिव्यक्तीचा कणही ज्या ब्रह्मानंदात सदाचा विरघळून जातो, किंबहुना ! कोणतेही द्वैत न उरता जे काही अनिर्वचनीय, अवाच्य, अज्ञेय, अविषय स्वयंप्रकाश तत्व उरते आणि शेवटी सुरेख सुगंधी फुलांचा शेला प्रेम भक्तीयुक्त मनोवृत्तीच्या धाग्यांनी गुंफून विठ्ठली समर्पिला अर्थात भगवत समर्पणाची उत्तुंग भावनिक अवस्था यात व्यक्त केली आहे.
सालाबाद प्रमाणे साप्ताहिक पंढरी संदेशद्वारा आळंदी यात्रेचा खास अंक प्रसिद्ध होत असतो. या भक्तीसागरात आपणही एक शब्दरूपी 'इवलेसे रोप' लावण्याचा प्रयत्न करावा अशी माऊलींचीच प्रेरणा झाली. यामध्ये मी एक लाकडी बासरीची भूमिका घेतली आहे. त्यात शब्द ज्ञानाचे वारे फुंकणारे संतच आहेत. म्हणून त्या बासरीचा अनाहत नाद माझे परमगुरु वैकुंठवासी नामदास अण्णा यांच्या कृपेने आपल्या ह्रदयी विलसत राहील हीच श्री माऊली चरणी वंदना.

'सेवितो हा रस वाटीतो आणिका'

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||Comments


bottom of page