तुका म्हणे तुझी नलगे धसोडी | परि आहे आवडी दर्शनाची || पंच दर्शन ||

जगद्गुरू तुकोबारायांचे आराध्यदैवत, कुलदैवत व सारे जीवन श्री पांडुरंग होते. त्यांनी आपली वाणी श्री पांडुरंगाचे वर्णन करण्यासाठीच समर्पित केली होती  इतकेच काय पण त्यांनी आपली सर्वच इंद्रिये मनासहित विठ्ठल चरणी अर्पण केली.


घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे |

तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख | 

तुम्ही आईका रे कान माझ्या विठोबाचे गुण | 

मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी 

तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा ||


संत तुकाराम महाराजांनी श्री पांडुरंगाच्या दर्शनाचे पाच प्रकारे वर्णन केले आहे. 

१ प्रतिमा दर्शन :

पंढरीचा पांडुरंग हा बाळमूर्ती असून विटेवर समचरण आणि कटेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत उभा आहे. गळ्यात तुळशीच्या माळा, कमरेला पितांबर, कानात मकराकार कुंडले, कंठात कौस्तुभमणी आणि मस्तकावर किरीट धारण केलेला असा हा पांडुरंग आहे. हा मूळ निर्गुण निराकार असलेला भक्ता करिता सगुण साकार होऊन नावारूपाला आला. दोन्ही पाय सम विटेवर ठेवून उभा आहे. याची दृष्टी किंचित अर्धोन्मीलित असून भक्तावर केंद्रित झाली आहे  हे परब्रम्ह वैकुंठातून मथुरेत आले. तेथून ते गोकुळात नंतर द्वारकेत आणि द्वारकेहून भक्त पुंडलिकासाठी पंढरीत आले.

पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न होता तेव्हा त्याने एक वीट फेकून देवाला विटेवर उभा राहण्यास सांगितले नंतर देवाने त्याचा उद्धार केला. त्यावेळी पुंडलिक म्हणाला, देवा माझा तर तुम्ही उद्धार केलाच आहे. परंतु जे मूढ, पापी, ज्ञानहीन, विज्ञानहीन आहेत त्यांना तू आपल्या कासेला लावून भवसिंधुच्या पैलतीरावर ने. अशी प्रार्थना करताच त्या करुणाकर देवाने तथास्तु म्हणून वर दिला. व अद्यापही तो त्याचे पालन करीत आहे. पुंडलिकाच्या आज्ञेशिवाय त्याला कोठेही हलता येत नाही. 

हा विठ्ठलच तुकाराम महाराजांचे कुलदैवत होते. महाराज पंढरपूरी येत होते तेव्हा देवाचे हे प्रतिमा रूप पाहून त्यांचा देहभाव हरपून जाई. कन्या सासरी जाताना आईबापाचा वियोग असह्य होऊन तिचे डोळे पाणावतात, त्याप्रमाणे पंढरीतून परत जाताना महाराजांची स्थिती होत असे. इतके त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीविषयी प्रेम वाटत होते. आणि त्या मूर्तींचे ध्यान चित्तात स्थिरावल्यामुळे देहूला गेल्यावरही विठ्ठलाच्या सानिध्याचे सुख ते उपभोगत होते. भंडारा डोंगरावर बसल्यावर देखील 100 कोसावरची पंढरी त्यांना मूर्तिमंत दिसत होती. इंद्रायणी नदीमध्ये स्नान करताना चंद्रभागेचे नित्य स्नान घडत होते. कारण विठ्ठल, पंढरी, चंद्रभागा या वाचून त्यांच्या चित्तात दुसरा विषयच नव्हता. याप्रमाणे विठ्ठलाच्या प्रतिमा दर्शनाचा परिणाम ध्यानात येत असे.२ सगुण दर्शन :

विठ्ठलाच्या प्रतिमा दर्शना पेक्षाही विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ त्यांच्या अंतःकरणात अधिक होती. हेही त्यांच्या अनेक अभंगातून स्पष्ट होते. देवाने आपल्याला सगुण दर्शन द्यावे या करता ते देवाला नाना परीने आळवीत होते. दर्शन देण्यास थोडा विलंब लावला तर महाराज रागवत सुद्धा होते. अरे! अशी दगडाची खोळ पांघरून मैंदासारखा काय बसला आहेस? तुझ्या दर्शना वाचून माझे मन, बुद्धी, इंद्रिये व शरीर यांना समाधान वाटणार नाही. तू जर दर्शन दिले नाही तर ज्यांना तुझे दर्शन झाले आहे ते सर्व संत मला हसतील. व तुझे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही, तर माझ्या मनात तुझ्या अस्तित्वाविषयी संदेह निर्माण होईल. व यापुढे 'तुझे भजन करणे व्यर्थ आहे' असे मला वाटेल. मला तुझ्याकडून मायिक पदार्थ मागायचे नाहीत. केवळ तुझ्या दर्शनाची मला आवड आहे.

इतके आळविल्यानंतर तो भक्तवत्सल विठ्ठल कसा शांत राहील? तो त्यांना प्रत्यक्ष सगुण दर्शन देत असे. अर्थात या सगुण दर्शनापासून जो आनंद व्हायचा, तो महाराजांकडून देखील वर्णन करणे अशक्यच.

दृष्टांत : एकदा तुकोबाराय आषाढी यात्रेला हाती वीणा चिपळ्या घेऊन पायी पंढरीला निघाले होते. बरोबर दशम्या, तहान भूक लाडू नित्यनियमाप्रमाणे घेतले होते. पंढरी जवळ यायच्या आधी तीन-चार दिवस श्री विठ्ठलांनी ब्राह्मणाचे रूप घेतले. व ते महाराजां पुढे आले. त्यांनी आपल्या मायेच्या प्रभावाने तेथेच पंढरी, पुंडलिक, वाळवंट, चंद्रभागा निर्माण केली. आणि तुकोबांना म्हणाले, "अहो महाराज तुम्ही पुढे कुठे चालला आहात? हे काय पंढरी आली सुद्धा" तेव्हा महाराजांनी पाहिले व त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या पडशीतून लाडूचा डबा काढला आणि लाडू मोजले. तर अजून चार दिवसाचे लाडू शिल्लक होते. त्यांनी देवाला ओळखले. परंतु महाराज म्हणाले, "अहो ब्राह्मण बुवा! हे पंढरीचे दर्शन पाहिले. परंतु या वाळवंटात टाळ-मृदुंगाचा गजर नाही, कीर्तनाचा, संतांचा मेळा दिसत नाही. संत भार पंढरीत | कीर्तनाचा गजर होत | तसे इथे काहीच दिसेना. ही माझी पंढरी नाही." असे म्हणून महाराज गळ्यात वीणा व हातात चिपळ्या घेऊन भजन करीत पुढे निघाले. संध्याकाळच्या वेळी महाराज चालले असताना पाऊस सुरू झाला. तरी पण वीणा वाजवत चिपळ्यावर भजन सुरु होते. मध्येच विण्याची तार तुटली. त्यामुळे नुसत्या चिपळ्या वाजवून भजन सुरू ठेवले. त्या वेळी तोच ब्राह्मण पुन्हा त्यांच्या जवळ आला. आणि म्हणाला "महाराज! आपल्या विण्याची तार तुटली आहे. माझ्याजवळ तार आहे.  तुम्हाला देतो. म्हणजे वीणा वाजवता येईल." त्यावेळी तुकोबाराय जरा थांबले आणि देवाला खडसावून म्हणाले...


काय तुझे वेचे मज भेटी देता | वचन बोलता एक दोन |

 काय तुझे रूप घेतो मी चोरुनी| त्या भेणे लपोनी राहीलासी |

 काय तुझे आम्हा करावे वैकुंठ| भिवो नको भेटल आता मज| 

तुका म्हणे तुझी नलगे धसोडी| परी आहे आवडीच दर्शनाची ||


असे म्हणून महाराजांनी आपल्या घोंगडीचा एक मोठा धागा काढून तो विण्याला ताणून बांधला. आणि मोठ्या आनंदाने वीणा वाजवत भजन म्हणत निघाले. आपल्याकडून कसलीच मदत तुकोबाराय घेत नाहीत. त्यांना फक्त माझ्या सगुण दर्शनाची आवड आहे. हे जाणून त्यांनी आपल्या मूळ चतुर्भुज रूपात महाराजांना दर्शन दिले. तेव्हा तुकोबांनी त्यांचे चरणी मस्तक ठेवले.

सारांश, महाराजांची विठ्ठलाच्या ठिकाणी निरपेक्ष निष्ठा होती. विठ्ठला वाचून दुसरे ब्रह्म नाही हे ते जाणून होते. इतर शेंदरी हेंदरी दैवते आपल्या पोटासाठी रडतात व भक्ता कडूनच काहीतरी मागतात अशी त्यांची एकविध भक्ती होती.