top of page

|| पितृश्राद्ध ||

Updated: Sep 12, 2022

- वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे.वारकरी संप्रदायात संत ज्ञानदेवांचा पासून ते संत तुकोबाराय पर्यंत सर्वांनी "श्राद्ध करणे जरुरीचे नाही" असे आपल्या अभंगाद्वारे स्पष्ट केले आहे. 'श्रीमद्भागवत' यामध्ये, श्रीएकनाथी भागवतातही नाथांनी याचा विस्ताराने विचार मांडला आहे. यावर आपण जाणून घेऊ. कर्दम मुनींना भगवान विष्णूंनी 'मी तुझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या आईला सांख्य शास्त्राचा उपदेश करण्याचे कार्यासाठी अवतार घेत असल्याचे' सांगितले होते. त्याचे स्मरण करून ते आपली पत्नी देवहूती हिला म्हणाले "तू अनेक प्रकारच्या व्रताचे पालन केले आहेस. म्हणून श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवील. आणि तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथीचे छेदन करतील" अशा रीतीने काही कालावधीनंतर, भगवान मधुसूदन, कर्दमाच्या वीर्याचा आश्रय घेऊन, देवहूतीच्या पोटी अग्नीप्रमाणे दिव्य रूप घेऊन प्रकट झाले. आणि देवहुतीने केलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. त्या वेळी मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन करताना, भगवान कपिलदेव श्रीमद्भागवताच्या तृतीय स्कंधातील अध्याय 32 मध्ये पितरांबद्दल देवहुतीस उपदेश करतात.

अथयो गृहमेदियान्धर्मावावसन् गृहे | काममर्थंच धर्मान् स्वान् दोग्धी भूय: पिपर्तितान ||1 स चापि भगवत्धर्मात्काममूढ: पराङ्मुखा: | यजते क्रतुभिर्देवान् पितृश्च श्रद्धयान्वित: ||2

हे माते! जो पुरुष घरातच राहून सकाम भावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहतो, तो निरनिराळ्या कारणांनी मोहित झाल्याकारणाने भगवतद्धर्मापासून विन्मुख होतो. आणि श्रद्धेने यज्ञादिनी देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहतो.तच्छ्रद्धयाक्रांतमति: पितृदेवव्रत: पुमान् | गत्वा चांद्रभासं लोकं सोमपा: पुनरेश्यति ||3

त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडित राहते. देव आणि पितर हेच त्यांचे उपास्य समजतात. म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो. आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर या लोकात परत येतो.

ये त्विहासक्तमनस: कर्मसु श्रद्धयान्विता: | कुर्वन्त्यप्रतिषिद्धानि नित्यान्यपि च कृत्स्नश: ||16 राजसा कुंठमनसः कामात्मानोऽ जितेंद्रियाः | पितृन् यजन्त्यनुदिनं गृहेश्वभिरताशयाः ||17

जे ह्या लोकात कर्मामध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्माचे सांगोसांग अनुष्ठान करतात, रजोगुणामुळे ज्यांची बुद्धी (विवेकाविषयी) कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिये यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात.

त्रैवर्गिकास्ते पुरुषा विमुखा हरिमेधसः | कथायां कथनियोरु विक्रमस्य मधुद्विषः || 18 नूनं दैवेन विहिता ये चाच्युतकथासुधाम् | हित्वा श्रृण्वान्त्यसद्गाथाः पुरुषमिव विङ्भुज ||19 दक्षिणेन पथार्यम्णः पितृलोकं व्रजन्ति ते | प्रजामनु प्रजायन्ते श्मशानान्तक्रियाकृतः || 20

हे लोक धर्म अर्थ आणि काम या मध्येच आसक्त असतात, म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत, त्या भवभयहारी श्री मधुसूदन भगवंताच्या कथां विषयी विन्मुखच असतात. विष्ठा खाणारी कुत्री डुकरे इत्यादी जशी विष्ठेची अपेक्षा करतात, त्याप्रमाणे जो मनुष्य भगवत कथामृत सोडून निंदनीय विषयवार्ताच ऐकतात ते निश्चितच दुर्दैवी होत. गर्भधारणा पासून अंत्येष्टी पर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक, दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम्र मार्गाने पितरांचे ईश्वर असणार्या आर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये जन्म घेतात.

ततस्ते क्षीणासुकृता पुनर्लोकमिमं सति | पतन्ति विवशा देवैः सद्यो विभ्रंशितोदयाः ||21

हे माते! पितृ लोकातीलआतील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते, तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्या पासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते.तस्मात्वं सर्वभावेन भजस्व परमेष्ठितम् | तद्गुणाश्रयया भक्त्या भजनीयपदाम्बुजम् ||22 वासुदेवे भगवति भक्तियोगः प्रयोजितः | जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं यद् ब्रह्मदर्शनम् ||23

म्हणून हे माते ! ज्याचे चरणकमल नेहमी भजन-पूजन करण्यायोग्य आहेत  त्या भगवंताचेच, तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणाऱ्या भक्तीने, सर्व भावाने भजन कर. भगवान वासुदेवा विषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्मसाक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. असे अनंत कोटी ब्रम्हांडनायक परब्रह्म परमात्मा श्री पांडुरंगाने कपिल मुनींचा अवतार घेऊन आपली माता देवहुती हिला उपदेश केला.

याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात भगवंतांनी पितर व क्षुद्र देवतांना भजल्यावर ते त्या त्या योनीत जाऊन पडतात. त्यामुळे त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणजेच मुक्ती मिळत नाही. मने वाचा करणी | जयांची भजने देवांचीया वाहणी | ते शरीर जाती क्षणी | देवाची जाहले ||355 अथवा पितरांची व्रते | वाहती ज्यांची चित्ते |जीवित सरलिया तयाते | पितृत्व वरी ||56 का शूद्र देवतादि भूते | तियेचि जयांची परमदैवते | जी ही अभिचारीकी तयाते | उपासिले ||57 तया देहाची जवनिका फिटली | आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली | एवं संकल्प वशे फळली | कर्म तया ||58 जयांची जाणती मजचि शास्त्रे |  मी जोडे जयाचेनि मंत्रे | ऐसे जे चेष्टा मात्रे | भजले मज || 64 ते मरणा ऐलिचकडे | मज मिळोनि गेले फुडे |  मग मरणी आणिकीकडे | जातील केवी ||65

अर्थ : मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांद्वारे ज्यांचा भजन प्रवाह देवांच्या उद्देशाने आहे ते त्यांचे शरीर नाश पावताच दिव्य शरीरधारी देवच होतात. अथवा श्राद्धपक्षादि जी पितरांची व्रते आहेत, ती जे मनःपूर्वक पाळतात, त्यांना मरणोत्तर पितृ योनीची प्राप्ती होते. किंवा भूत वेताळ आदि क्षुद्र देवता हीच ज्यांची परमदैवते आहेत व ज्यांनी त्यांची घातक अशा जारण-मारण विद्येसाठी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांना मरणोत्तर भूतखेतादिकांचीच योनी प्राप्त होते. ज्यांचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे त्याला फल प्राप्त होते. यासाठी हे निरर्थक प्रयत्न करून मानव जन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा, माझे भक्त व्यवहारात कायिक, वाचिक, मानसिक कर्माद्वारा  फक्त माझेच भजन करतात, ते मरणा पूर्वीच माझ्या स्वरूपात येऊन मिळतात. मरणानंतर ते माझ्याशीच एकरूप होतात. मुक्त होतात.

एकनाथी भागवत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आपल्या एकादश स्कंधाच्या अकराव्या अध्यायात श्राद्धाचे कर्म श्रीकृष्णार्पण करावे, असा उपदेश देवांनी उद्धवाला सांगितला असे सांगतात. मज नार्पिता जे जे श्राद्ध |  ते त्याची कल्पना विरुद्ध | श्राद्ध संकल्प अविरुद्ध | मदर्पणे वेद गर्जती ||758 श्राद्धी मुख्य संकल्प जाण |  पितर स्वरूपी जनार्दन | ऐसे असोनिया जाण | नैवेद्य मदर्पण न करिती ||59 अन्न ब्रम्ह अहं ब्रह्म | हे श्राद्धीचे गुह्य वर्म | ऐसे नेणोनि शुद्ध कर्म | वृथा भ्रम वाढविती ||60 मी सकळ जगाचा जनिता | मुख्य पितरांचाहि मी पिता | त्या मज कर्म नार्पिता |  विरुद्ध सर्वथा ते श्राद्ध ||61 मज नार्पिता जे करणे | ते ते उपजे अभक्तपणे | विरुद्ध धर्माची लक्षणे | दुःख दारूणे अनिवार ||62 उत्तम भक्ताचे लक्षण | संकल्पे वीण जाण |  अन्नपानादी मदर्पण | करिती खूण जाणती ||63 ध्रुवाच्यापरी आढळ | जे माझ्या ठाई भजनशील | ते माझी भक्ती अचंचल | अति निश्चळ पावती ||64

अर्थ : मला अर्पण न करिता जे श्राद्ध करतात, त्यांची श्रद्धाची कल्पनाच विरुद्ध होय. श्राद्धसंकल्प माझ्या अर्पणाच्या विरुद्ध नाही. असा वेद मोठ्याने घोष करीत आहे. पितृस्वरूपी जनार्दन आहे. असा श्राद्धातील मुख्य संकल्प आहे. पण असे असतानाही ते मला नैवेद्य अर्पण करीत नाहीत. 'अन्न ब्रह्म, ब्रह्म आहं च ब्रह्म' अन्न ब्रह्म आहे व मी सुद्धा ब्रम्ह आहे. हे श्रद्धाचे मुख्य वर्मा आहे. पण ते न जाणता, मूढ लोक केवळ कर्माने व्यर्थ श्रम वाढवितात. मी सर्व सृष्टीचा उत्पादक, मुख्य पितरांचा ही पिता. पण अशा मलाही कर्म अर्पण न केल्यास ते श्राद्ध सर्वथा विरुद्ध होते. मला अर्पण न करता जे जे कर्म करावे, त्यामुळे अभक्तपणा मात्र उत्पन्न होतो. धर्माची अशी अनेक विरुद्ध लक्षणे आहेत की ज्यामुळे अनिवार दारुण दुःख प्राप्त होते. उत्तम भक्तांचे लक्षण म्हटले म्हणजे ते संकल्प वाचूनच अन्नपानादि सर्व मला अर्पण करतात. ही त्यांची खूण जाणावी. ज्याची माझ्यावर ध्रुवासारखी अढळ भक्ती असते, त्यांनाच माझी भक्ती प्राप्त होते.एकनाथी भागवतातील अकराव्या अध्यायात भगवंताच्या मुखातील हे ज्ञान, उद्धवासाठी नाथांनी विस्ताराने सांगितले आहे. आणि हेच सत्य आहे. 

संत एकनाथ महाराजांनी आपल्या गाथेतही पुढील अभंग लिहिला आहे.

जित्या माय बापा न घालिती अन्न | मेल्या प्रेतावर करिती पिंडदान || पहा पहा संसाराचा कैसा आचारु | जिता अबोला मा मेल्या उच्चारू || जित्या मायबापा न करिती नमन | मेल्या मागे करिती मस्तक वपन || जित्या मायबापा धड गोड नाही | श्राद्धी तळण-मळण परवडी पाही || जित्या मायबापा गाली प्रदान | मेल्या त्याचेनि नावे देती गोदान || जित्या मायबापा नेदि प्याया पाणी | मेल्या पितरा लागी बसती तर्पणी || प्याया पाणी न घालिती सासरा जीता | पिण्डापाशी येती मग दंडवता || एका जनार्दनी कृपेचे तान्हे | विधिनिषेध दोन्ही आतळो नेदी मने ||
जगद्गुरू संत तुकोबाराय आपल्या अभंगातून पितरांबद्दल उपदेश करतात ते पाहू भुके नाही अन्न | मेल्यावरी पिंडदान || हे तो चाळवाचाळवी | केले आपणचि जेवी || नैवेद्याचा आळा | वेचे ठाकणी सकळ || तुका म्हणे जड | मज न राखावे दगड ||

बापाला जिवंतपणी भूक लागली तर अन्न देत नाही. आणि मेल्यावर मात्र पिंडदान करतो. ही शुद्ध फसवाफसवी आहे. कारण श्रद्धा करिता शिजवलेले गोड-धोड पदार्थ आपणच खात असतो. देवाच्या नैवेद्याचे निमित्त करतो. आणि सर्व पक्वान्ने आपणच पोटात भरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा ! मला असे दगडासारखे मूढ ठेवू नका. माझ्याकडून देवाची व पितरांची जिवंतपणीच खरी सेवा घडू द्या.

देहपिंड दान दिला एकसरे | मूळची ते खरे टांकसाळ || मी माझा देह पिंड एकदा हरीला समर्पण केला आहे. म्हणून या देहावर श्रीहरीची सत्ता असल्यामुळे देहरूपी टांकसाळीतून नाम मुद्रांकित शब्दरूपी खरे नाणे बाहेर पडत आहे. 

पितररुपी तूची जनार्दन | सव्य ते कवण अपसव्य || तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती | देऊनी निश्चिंती मानीयेली || पितरस्वरूपी श्रीमंत जनार्दन तूच आहेस. तर मग श्राद्ध करून सव्य अपसव्य कशाला करीत बसू? तुकाराम महाराज म्हणतात, देवा! हा जीवरुपी पिंड तुझ्या हातात देऊन, मला समाधान मिळाले आहे.

पिंड पदावरी | दिला आपुलीये करी || माझे झाले गया वर्जन | फिटली पितरांचे ऋण || केले कर्मांतर |  बोंब मारली हरिहर || तुका म्हणे माझे | भार उतरले ओझे ||मी आपल्या हाताने विष्णू पदावर देहरूपी पिंड अर्पण केला आहे त्यामुळे माझा गया क्षेत्रातील पिंडदानाचा तीर्थ विधी संपला आहे व त्यायोगे पितरांचे ऋणही फिटले आहे. सर्व क्रिया कर्मे केली व शेवटी हरीहराच्या नावाने बोंब मारली. आता माझ्यावरील पितरांच्या ऋणांचे ओझे पूर्णपणे उतरले असून, काही करायचे राहिले नाही. वृक्षाच्या मुळाला पाणी घातले की, सर्व फांद्या सुद्धा टवटवीत होतात. त्याला वेगळे पाणी घालावे लागत नाही. त्याप्रमाणे हे अर्जुना, माझ्या विश्वरूपा मध्ये सर्व देव तर आहेतच परंतु पितरांची जी मुख्यदेवता "अर्यमा" तीही अंतर्भूत आहे. यासाठी फक्त माझी पूजा-भक्ती केली असता ती सर्वांना पोहोचते. म्हणून आपले कर्म व्यर्थ घालवू नको. मला एकट्यालाच शरण ये.

Comments


bottom of page