त्रिगुण असार, निर्गुण हे सार ||

Updated: Oct 17, 2020

 

प्रकृति-पुरुषांचे बुद्धिपूर्वक विवेचन केल्यावरही त्रिगुणांना जोवर पूर्णपणे जिंकले नाही, तोवर सुख-दु:ख-अहंकार वाढत असतो. तीन गुणांपासूनच देह बनला आहे. तेंव्हा त्या देहाने गुणांना जिंकणे शक्य नाही. परंतु ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ या न्यायाने सत्वगुण विवेकाला मिळतो. आणि हे दोघे मिळून तिन्ही गुणांचा उच्छेद होतो. व मुळचे निर्गुणत्व प्रकट होते. तेंव्हा गुणच्छेदनही मिथ्याच ठरते. वास्तविक हे तिन्ही गुण मिथ्या आहेत. स्वाभाविक निर्गुणत्व तेवढे नित्य सत्य आहे. या अर्थाचेच निरुपण भगवान श्रीकृष्ण करत आहेत.

सात्विक ब्रह्म जाणणाराच मुख्यत्वेकरून सत्वगुणाचे आश्रयस्थान आहे. ब्रह्मर्पण न करता जे स्वधर्माचरण करतात ते सात्विक ब्रह्म जाणणारे वेदोक्त अनुष्ठानाने ब्रह्म लोकांपर्यंत उर्ध्वगतीस जातात.

ते स्वर्गलोक महर्लोक यांचे आक्रमण करून जनलोकला जातात. तेथून तपलोकांचे उल्लंघन करून सत्यलोकी पोहोचतात. रजोगुण वाढला म्हणजे जीव शूद्रांदि हीन योनीत जन्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे फेरे अव्याहत भोगत असतात. तमोगुण वाढला म्हणजे स्थावरा पर्यंत पशु योनीत जन्म घेऊन डास, माशी, वृक्ष, पाषाण इत्यादी सर्व योनी जीवाला भोगाव्या लागतात आता जीवाच्या अंतकाळी त्याच्या देहातील जो गुण वाढतो, तसेच माझी अनन्य भक्ती केली असतात मरण समयी कोणती गती प्राप्त होते याचे सविस्तर विवेचन भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत.
मरण समयी गती :

संसारात तीन गुण मुख्य आहेत. सत्वगुण वाढला असता ज्याला मरण येते, तो दिव्य देह घेऊन स्वर्गातील सर्व सुख भोगतो. रजोगुणाचा  उत्कर्ष झाला असता मृत्यू आल्यास त्याला पुन्हा मनुष्य जन्मच येतो. मरणसमयी तमोगुण वाढला असता तो जीव दुःखदायक महा नरक भोगतो. माझ्या भक्ताने माझी सप्रेम भक्ती केली असता अंत:काली माझी दैदीप्यमान असलेली मूर्ती त्याच्या हृदयात प्रकट होते. शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादींनी युक्त पितांबरधारी श्रीकृष्णाचे ध्यान करीत असता ज्याला मरण येते, तो माझा भक्त वैकुंठात मद्रूप होतो. सर्व भूतमात्रात मीच आत्माराम पूर्ण भरलेला आहे असे ज्याचे अखंड भजन चालते, तो तिन्ही गुणांना जिंकून सगुणातून निर्गुणाला प्राप्त होतो. ज्याच्या देहाला दैवयोगाने जेव्हा मरण येते तेव्हा त्याला माझ्याशिवाय अन्य स्थान मिळत नाही तो परिपूर्ण आत्मानंदात स्वतः निर्गुण होऊन राहतो. माझे निर्गुण आत्मस्वरूप किंवा वैकुंठातील सगुण रूप ही दोन्ही एकच आहेत. सगुण आणि निर्गुण यांचे समसाम्य आहे. तीन गुणांच्या उत्कर्षामुळे स्वर्ग-नरक मृत्युलोक किंवा शुद्ध निर्गुण ब्रह्म यास प्राप्त होणाऱ्या साधकांच्या साधनांचे कौतुक श्रीहरी आता सांगत आहे.

सर्व कर्मानुष्ठान संकल्पावाचून केले असता ते सहजच ब्रह्मार्पण होते. शोधीत सत्वाने ते निर्गुणस्वरूपाचे साधन आहे. फलाची इच्छा न धरता वर्णाश्रमाचे सर्व धर्म माझ्यावर निस्सीम प्रेम ठेवून आचरणे हेच केवळ सात्विक कर्म होय. माझे भजन हाच स्वधर्म यालाच स्वकर्म म्हणतात. हे वर्म ज्याला   कळते त्याच्या कर्माला सात्विक कर्म हे नाव आहे. आपला सगळा स्वधर्म आचरून इंद्रादी देवांचे यजन करणे हे ज्याचे शील आहे व जो इहपर लोकीचे सुखी इच्छितो त्याचे कर्म केवळ राजस होय. ज्या कर्मात उघड-उघड हिंसा घडते, ज्यामध्ये जारण-मारण आदि परपीडा असते, ज्या कर्माचे स्वरूपच ओंगळ असते ते कर्म तामस आहे असे समजावे. ज्यात दांभिक कर्माचरण असते साधुसंतांचा अत्यंत मत्सर घडतो, ज्यात दुसर्‍याची भरपूर निंदा असते ते हिंसात्मक, समत्सर व दांभिक कर्म तामस समजावे. आता त्रिगुण आणि निर्गुण यांचे चार प्रकारचे लक्षण वर्णन करतात.
ज्ञान :

भागवान देहात राहून देहातीत सगळ्या भूतातील भूतात्मा  व  सबाह्य व्यापणारा आहे हे सात्विक ज्ञान होय. भिन्न जाती, भिन्न आकार, भिन्न नावे व भिन्न क्रिया या सर्वांतील ब्रह्माला अभिन्न आकाराने पाहणे हे सात्विक ज्ञान होय.

वेदशास्त्रचा अभ्यास करून आत्मज्ञानाचा विचार करते वेळी स्वतःच विकल्प करणे हे राजसज्ञान जाणावे. वार्तिकापर्यंत अध्यापन करूनही मनात अद्वैत बाणत नाही म्हणून आपणच आपल्या तर्काने विकल्प करीत बसणे हे राज स ज्ञान होय.

वेदशास्त्राचे श्रवण करून विषयासक्त होणे, इंद्रियांच्या तृप्तीकडेच लक्ष ठेवणे हे राजसपणाचेच लक्षण जाणावे. मनाचा एक निश्चय न राहता क्षणोक्षणी चित्तात अगणित विकल्प उद्भवणे ही राजस ज्ञानवृत्ती होय.

आता तमोगुणाचा प्रकार ऐक. ज्ञानाची सगळी स्फूर्ति महा मोहाने ग्रासून टाकल्यामुळे ‘मी जड, अंध’ इत्यादिक निश्चय आणि नाशवंत पदार्थाविषयी आसक्ती हे तामसज्ञान होय. आहार, निद्रा, भय व मैथुन एवढेच जे पशुवृत्तीचे ज्ञान ते तामस जाणावे.

आतां निर्गुणाचा विभाग ऐक. उद्धवा! कार्य, कर्ता, कारण या त्रिगुणाच्या त्रिपुटीस शून्य करून केवळ जे चैतन्यरूप तेच त्रिगुण ज्ञान होय. सत्त्वाच्या उल्हासाने सर्व इंद्रियात जे ज्ञान प्रकट होते, ते ज्ञानच मुळी व्यर्थ आहे. कारण मी ज्ञानरूपाने अनादि आहे. समुद्राच्याच पाण्याचे रुपांतर नद्यांमध्ये होऊन त्या वाहू लागतात व त्या समुद्राला येऊन मिळाल्या असता  त्यात समुद्राला जसा उल्हास वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी ज्ञानस्फुर्तीची मोठी प्रतिष्ठा मानीत नाही. रजोगुणाने त्याच्या मनात एखादी इच्छा उद्भवली, तरी तो तिच्या योगाने क्षुब्ध होत नाही. तो समजतो की, माझ्यामुळेच जरी काम्यकर्म चालत असले तरी मी  निष्काम असून त्याने लिप्त होत नाही. तमोगुण वाढला असता महामोहाचा वेढा पडतो, परंतु त्या मोहाला झाडून न टाकता तो त्याचे स्वरूप पक्के ओळखून असतो. आत्मस्वरुपनिष्ठेला महामोहाचे संकट भासत नाही. याप्रमाणे सत्व-रज-तम हे तिन्ही गुण अंगावर येऊन आदळले  तरीही जो य:किंचितही डळमळत नाही तोच खरा आत्मनिष्ठ निर्गुणवृत्तीचा जाणावा. मोह्ग्रस्ताची बाधा त्याच्या ज्ञानात कधी बदल घडवत नाही. अज्ञानाच्या प्रसंगी तो ज्ञानाची चाड धरीत नाही. विषयांमध्ये प्रवृत्त असता निष्कामाची अपेक्षा करीत नाही. तर माझा भक्त माझ्यावर दृढ निष्ठा ठेवून त्रिगुणातच निर्गुण होऊन राहतो. त्रिगुणांच्या तीन प्रकारचे वास्तव्य आणि आणि निर्गुणाची वस्ती श्रीकृष्ण आता सांगत आहे.


वास्तव्य :

पवित्र तीर्थाच्या ठिकणी, निर्जन वनात किंवा एकांत जागी राहण्यात ज्याला समाधान वाटते तो खरोखर सात्विक होय. व्यवहाराच्या जागी वास्तव्य, सन्मानाने राजदरबारी राहणे किंवा विवाहादि समारंभात वस्ती करणे, द्रव्य, संपत्ती व स्त्रिया यांचा सहवास प्रिय वाटणे, जो शहरात किंवा गावात नेहमी राहतो तो राजस जाणावा. जेथे मन मान-सन्मानाची इच्छा करीत असते, सतत विषयासक्तीने क्षुब्ध झालेले असते ते स्थल निश्चयाने राजस समजावे. ज्याठिकाणी साधूंची निंदा होत असते, दृष्टी नेहमी गुणदोष पाहते, जेथे मन अविवेकी होते, जेथे कलहाचे कारण असते अशी वेश्यागृहे, जुगरीचे अड्डे, दारूचे गुत्ते इत्यादी हि तामस निवासस्थाने होत.

उद्धवा! देवालयातील सुंदर मूर्ती पाहून मन प्रसन्न होते, ती निर्गुणाची वस्ती समजावी. अद्वैत बुद्धीने माझी भक्ती करणाऱ्या माझ्या भक्ताचे जे हृदयमंदिर तेच मज निर्गुणाचे माहेरघर आहे. तेथे ज्याचे चित्त मोठ्या सुखाने स्थिर होते, ती खरी निर्गुण वस्ती समजावी. जेथे परब्रम्ह प्रकट होते तेच निर्गुणाचे वसतिस्थान जाणावे. उद्धवा! विषयांच्या पलीकडील जी आत्मस्थिती त्यात वृत्ती एकरूप होणे, निराकारात सुखसंपन्न होणे व त्यातच वृत्ती पूर्णपणे स्थिर करणे हेच जनातील किंवा वनातील निर्गुणाचे निवासस्थान होय. तीन गुणांच्या योगे तीन प्रकारचे कर्ते आणि निर्गुणाच्या लक्षणाचा चौथा कर्ता यांची स्थिती अशी