आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी तुळशीचा महिमा गायिला आहे. कारण गुरूची दीक्षा घेण्यासाठी तुळशीची पवित्र माळ गळ्यात घातल्याशिवाय शिष्यत्व प्राप्त होत नाही, असा भागवतधर्माचा नियम आहे. प्रत्येकाच्या दारात तुळशी वृंदावन असावे, त्यास दररोज पाणी घालून त्याची पूजा करावी, तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी ही प्रथा सर्वत्र पाळली जाते. अशा या पवित्र तुळशीच्या विवाहाची कथा आता आपण पाहू..
तुळशी विवाह कथा :
फार वर्षांपूर्वी जालंधर नावाचा एक महापराक्रमी योद्धा होता. त्याने देवतांशी युद्ध करून विजय मिळवला व देवांचे सर्व वैभव आपल्याजवळ आणून ठेवले. जालंधर अजिंक्य झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा ही महापतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यामुळे जालंधरला मृत्यू येत नसे. सर्व देवगण विष्णूकडे गेले. त्या वेळी विष्णूने जालंधरचे रूप धारण केले व कपट कारस्थान रचून जालंधर रणांगणात मृत्युमुखी पडला, असे भासवून विष्णूने दोन माकडांच्या हस्ते त्याचे शिर व धड आणून वृंदेपुढे ठेवले. ते पाहताच वृंदा शोकाने व्याकूळ झाली व धरणीवर पडली. पुढे एक साधू तेथे आला व त्याने संजीवन मंत्राने जालंधराच्या वेशातील विष्णूला जिवंत केले. आपला पती उठल्याचे पाहून तिने मोठ्या आनंदाने त्याला आलिंगन दिले. विष्णू तिच्या घरी काही दिवस राहिले. त्या वेळी नकळत तिचे पातिव्रत्य भ्रष्ट झाले. तिच्या हातून हे पातक होताच युद्धभूमीवर युद्ध करीत असलेला खरा जालंधर रणांगणात मृत्युमुखी पडला. काही काळाने वृंदेला सर्व खरा प्रकार समजला की, प्रत्यक्ष विष्णूने आपला घात केला आहे. संतप्त होऊन तिने विष्णूस शाप दिला की, तुला तुझ्या पत्नीचा वियोग होऊन तुला दोन माकडांचे साहाय्य घ्यावे लागेल. (हा प्रसंग राम अवतारात घडून आला.) नंतर वृंदाने अग्निप्रवेश केला. त्या वेळी भगवान विष्णू खिन्न होऊन तिच्या राखेजवळ बसून राहिले. काही दिवसांनी त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगम पावले. ती तुळस म्हणजे वृंदा आहे, हे जाणून ती विष्णूला प्रिय झाली. पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन कार्तिकी शुद्ध द्वादशीस श्रीकृष्णासोबत विवाह केला. तेव्हापासून दरवर्षी तुलसी विवाह करण्याची प्रथा आजही सुरू आहे.
तुळशी माहात्म्य : भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की,
वैकुंठलोकीची तुळशी। सत्य मृत्यूलोकाशी ।
पातकी उद्धरायासी । म्या आणिली निश्चये ।।
वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली ॥
वंदिती जय हरिहर । सर्व करिती नमस्कार ।।
देव इंद्रादिक सर्व । तुळशी पुजने गौरव ॥
ऐसे तुळस माउली । एका जनादर्शने वंदिली ।।
उठोनिया प्रातःकाळी । तुळस वंदावी माउली ।
तुळस संतांची सावली । मुकुट वाहिली विष्णूने ।
तुळस असे ज्याच्या दारी। लक्ष्मी वसे त्याच्या घरी।
येवोनि श्रीहरि । क्रीडा करी स्वानंदे ।। तुळशीसी मंजुळा येता । पळ सुटे यमदेवता । अद्वैत तुळ कृष्ण स्मरता। नासे दुरित चित्ताचे ।। जे जे तुळशी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख ।
नामा म्हणे पंढरीनायक । तुळशीजवळी उभा असे ॥
कृष्णाची सुवर्णतुला :
श्रीकृष्ण पत्नी सत्यभामेने अहंकाराने कृष्णाची सुवर्णतुला केली. एका पारड्यात श्रीकृष्ण व दुसऱ्यात सर्व सोळा हजार एकशे आठ राण्यांचे दागिने घातले. शेवटी द्वारकेतील सर्व घरांतील दागिने घातले. परंतु तुला होईना. शेवटी रुक्मिणीमातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरण वंदन करून एक तुळशीचे पान टाकताच पारडे, बरोबर झाले.
सर्व फुलझाडांमध्ये तुळसच सार आहे.
मंत्र - वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी।।
एतनामाष्टकं चैव स्रोतं नामर्थं संयुक्तम। य: पठेत तां च सम्पूज् सौऽश्रमेघ फललंमेता।।
तुळशीची आठ नावे :
१. वृंदा
२. वृंदावनी
३. विश्वपुजिता
४. विश्वपावनी
५. पुष्पसारा ६. नंदिनी
७. तुळशी
८. कृष्णजीवनी।
तुळशीचे महत्त्व :
तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती २४ तास ऑक्सिजन वायू बाहेर टाकते. त्यामुळे वातावरण शुद्ध होते. तुळशीची माळ गळ्यात घातल्यास त्वचारोग होत नाही. उचकी येत असल्यास तुळशीचा रस मधासोबत घ्यावा. भूक लागत नसेल तर रोज नियमित तुळशीचा रस घ्यावा. तुळशीचा काढा घेतल्याने सर्दी, पडसे व खोकला त्वरित थांबतो व थंडीपासून बाधा होत नाही. दलदलीच्या जागी तुळशीची लागवड केल्यास त्या जागेत डास होत नाहीत. तुळशी वृंदावन अंगणात असल्याने घरामध्ये शुद्ध हवा येऊन वातावरण निरोगी बनते. प्रामुख्याने कृष्णतुळस व रामतुळस असे दोन प्रकार असतात.
तुळशीची आरती : जयदेवी जयदेवी जय माये तुळसी। निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळसी ।। धृ.।। ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी। अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी।। सेवा करिती भावे सकलहि नरनारी। दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी ।। जयदेवी ॥१॥ शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी। मंजिरीची बहु आवड कमलारमणासी ।। तवदलविरहित विष्णु राहे उपलासी । विशेष महिमा तुझा शुद्ध कार्तिकमासी ।। जयदेवी || २ || अच्युत माधव केशव पीतांबरधारी। तुझे पूजनकाळी जो हा उच्चारी ।। त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी ।। गोसावी सुत विनवी मजला तू तारी।। जयदेवी ।।
देवाच्या नैवेद्यावर तुलसीपान ठेवूनच नैवेद्य दाखवावा.
- सुधाकर शंकर शेंडगे, पंढरपूर
Commenti