top of page

देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला ॥

Updated: Jan 14





आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपेरत ऋषि -मुनींनी निसर्गाचा सर्वतोपरी अभ्यास करून बारा महिन्यातील सर्व ऋतुमध्ये मानवाच्या जीवनावर आरोग्यदृष्ट्या होणारे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी सण, वार, व्रत वैकल्ये, उपवास सांगितले आहेत. हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीन ऋतूमध्ये असणाऱ्या हवामानानुसार मानवांचा आहार समतोल रहावा असे नियमही घालून दिले आहे.


त्यालाच अनुसरुन पौष महिन्यात येणारा संक्रांती पर्वकाळ हा सण स्त्री- पुरुष व अबाल वृद्ध मोठ्या प्रेमाने व उत्साहाने साजरा करतात. हा थंडीचा काळ असलेने या सणामध्ये तीळ आणि गुळाचे मिश्रण सेवन करणे व ते इतरांनाही वाटणे ही मुख्य भावना त्यात दडली आहे. तीळ हे उष्ण असलेने थंडीच्या दिवसात ते गुळाबरोबर सेवन केल्यास शरीराला व आरोग्याला हितवर्धक ठरते. परमार्थामध्ये स्नेह या अर्थी तेलाची उपमा दिली जाते.

उदा- 'कोंड्याचीच भाकर ॥ आंबड्याची भाजी ॥ वर तेलाची धारच नाही? मला असला नवरा नकोग बाई.॥

ह्या नाथांच्या भारुडाचा अर्थ म्हणजे वरील भाजी व भाकर हे मानवाच्या जीवनातील अत्यंत रुक्ष अन्न आहे. त्यावर तेल घातल्यास त्याला थोडी चव तर येईल.याप्रमाणे मानवाचा दुःखमय संसार हा रुक्ष असलेने यामध्य भक्तीप्रेमाची जर जोड असेल तर त्याचे सुखात रुपांतर होईल. प्रेम किंवा स्नेह याचे उत्पतीस्थान हृदय असलेने त्या आकाराचे तीळ व मनाची गोडी हे प्रेमाचे प्रतिक एकमेकांबद्दल जवळीक निर्माण करणारे आहे. म्हणून हा सण सर्व सणात आनंदी व श्रेष्ठ मानला जातो. यावर तुकाराम महाराजांनी एका अभंगातून संक्रांतीचे महत्व सांगितले आहे.


'देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला ॥ साधला हा पर्वकाळ ॥ गेला अंतरीचा मळ ॥

पाप पुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥





तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की, आज मकर संक्रमणाच्या पर्वकाळी देव तिळा मध्ये प्रकटला आहे. आणि ते तीळ खाऊन मूळचाच गोड सुखरूप असलेला जीव देवाच्या गोडीने सुखाने तृप्त झाला आहे. आशारितीने आजचा हा मकर संक्रमणाचा पर्वकाळ साधला असून अंतःकरणातील कामक्रोधरुपी मळ गेले आहेत. ज्ञानगंगेच्या एकाच स्नानाने संचित पाप पुण्ये नष्ट झाली व क्रियमाण पाप पुण्ये लागेनासी झाली आहेत. त्यामुळे माझी वाणी जनामध्ये जनार्दनरुपाने स्थित आहे. असे समजून सर्वांशी शुद्ध व गोड बोलत आहे व आपले प्रेम व्यक्त करीत आहे.





प्रत्येक माणसा माणसात परमेश्वर पाहिल्यावर सर्वांबद्दल प्रेमाची भावना हृदयामध्ये उत्पन्न होऊन अवघा आनंदाचा क्षण निर्माण होतो. आणि तो आनंद तीळगुळाच्या रुपाने एकमेकांना वाटून व्यक्त करणारा हा सण म्हणजे एक पर्वकाळ मानला आहे. तसेच हा सण पंधरा दिवस रथसप्तमीपर्यंत सर्व महिला व पुरुष मंडळी साजरा करतात. शत्रुलासुद्धा मित्रत्वाचा मान देणारा सण सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. या कालावधीत स्त्रिया एकमेकींना घरी बोलावून सामुदायिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. प्रेमाने तीळ-गुळ देऊन तीळगुळ घ्या गोड बोला, असे वारंवार म्हणतात. व प्रेमाचे प्रतिक म्हणून एखादी छोटीवस्तू भेट देऊन आपला आनंद व्यक्त करतात. पंढरपूर तीथक्षेत्री अनेक महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळे आहेत प्रत्येक भजनी

मंडळ इतर भजनी मंडळाला एके ठिकाणी आमंत्रित करून मोठ्या प्रेमाने सामुदायिक भजनाचे कार्यक्रम होतात. शेवटी तिळगुळाचे लाडू किंवा वडया प्रसाद म्हणून वाटतात व त्यातच धन्यता मानतात. याशिवाय इतर व्यावसायिक संस्था, संघ, मंडळ, शैक्षणिक क्षेत्रे आदी ठिकाणी मंडळी, कार्यकर्ते एकमेकांना मिटींग घेऊन तिळगुळ समारंभ करण्याची पद्धत आहे. येथे जाती भेद न मानता सर्व समभावाची वृत्ती असते. यामुळे एकमेकांत जिव्हाळा निर्माण होतो. निर्वैर व निर्मत्सरता निर्माण होते. या सणामुळे सर्वाठायी आनंद, समाधान व प्रेम याची वृद्धि व समृद्धि होते. यासारख्या मोठा सण कुठलाच नसतो म्हणून याला पर्वकाळ असे म्हटले आहे.





प्रत्येकाच्या जीवनात तीळाएवढी माया व गुळासारखी गोडी मिळाल्यास याशिवाय दुसरे काय हवे? बरेचजण संक्रांती | निमित्त तिळगुळावर प्रेमरूपी काव्य करून त्याचे कार्ड व तीळगुळ परगावी एकमेकांना पाठवितात व आपले प्रेम पुन्हा जिवंत व अखंड ठेवतात. हिवाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने तीळगुळाच्या पोळ्या शरीरास पोषक असतात. तसेच या संक्रांतीच्या आदले दिवशी स्त्रिया भोगी साजरी करतात. तेव्हा उष्णतेचे प्रतिक म्हणून बाजरीची भाकरी व लोणी खातात. यामध्येही आरोग्याचाच भाग असतो आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले हे सणवार फक्त भारतीयामध्येच आहेत.


1,361 views0 comments
bottom of page