top of page

|| सीतेचा जन्मवृत्तांत ||

Updated: Oct 17, 2020

-वै. ह. भ. प. सुधाकर शेंडगे.


विश्वामित्र ऋषींनी जनकराजाला रामाच्या वंशाचा व त्यांच्या पराक्रमांचा परिचय करून दिला. ते ऐकून जनकराजाला अत्यंत आनंद झाला. व माझी निजात्मजा सीतेसाठी हा वर म्हणून अनुरूप् आहे असे जनकाला वाटले. तो विश्वामित्र ऋषींना म्हणाला, माझी सीता अयोनिजा जन्मली आहे. शेतामध्ये नांगरत असताना त्याच्या फळाला अडकून एक पेटी सापडली. ती उघडताच त्यामध्ये सुंदर रूपवती अशी माझी आत्मजा होती. हा शब्द ऐकून अहिल्याकुमार शतानंद हा जनकराजाचा पुरोहित होता. त्याने याचा अनुवाद सांगण्यास प्रारंभ केला. क्रूर अज्ञानामुळे माझ्या मातेला ब्रह्मशापाने शीळा होवून पडावे लागले. ती श्रीराम नामामध्ये निमग्न असायची त्यामुळे श्रीरामाचा चरणस्पर्श होताच तिचा उध्दार झाला व ती मुक्त झाली आणि जगद्वंद्य झाली.



श्रीराम नाम महिमा -

श्रीरामाचे नाम अगाध आहे. त्यामुळे काम-क्रोध समूळ नष्ट होतात. जन्म मरणातून सुटका होते. वेदाचे अबध्द पठण केले तर निषेधाची बाधा लागते. परंतु रामनामाचा अबध्द जरी उच्चार केला तरी महापापी असणारा शुध्द होतो. याबाबतीत वाल्मिकीची किर्ती वाढली असे नारदमुनी सांगतात. त्याला राम म्हणता येत नव्हते. सर्वांना मारणे हा त्याचा. व्यवसाय होता. म्हणून महर्षि नारदाने वाल्मिकीला मारा मारा असा जप करण्यास सांगितला. त्यामुळे त्याचा उध्दार झाला व त्याने रामाच्या जन्माआधीच शतकोटी रामायणाची रचना केली. त्यामुळे त्याची त्रिभुवनात ख्याति झाली. असे हे राम केवळ ब्रह्ममूर्ति होते व सीता ही आदिशक्ती होती. अशा सीतेची उत्पत्ती कशी झाली ती मी नारदाकडून ऐकली तीच तुम्हाला सांगतो असे शतानंद म्हणाला.

पद्माक्षराजाचे अनुष्ठान -

फार वर्षापूर्वी पद्माक्षराजा होवून गेला. तो अत्यंत धार्मिकवृत्तीचा होता. त्याने कठीण अनुष्ठान करून लक्ष्मीला प्रसन्न केले. व तो म्हणाला, हे लक्ष्मी! तू माझे कन्यारत्न होवून जन्म घे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, हे राजा! मी अजन्मा आहे. मला जन्म घेता येत नाही. कारण केवळ परमात्म्याशी संबंध आल्यानेच मी प्रकट होते हे तू निश्चयाने जाण. हे ऐकून राजाने दृढ ध्यान आरंभले व भगवंताला प्रसन्न करून घेतले. आणि लक्ष्मी माझी कन्या व्हावी असा वर मागितला. मनात विषयवासना ठेवून लक्ष्मी प्राप्त झाली तर प्रथमदृष्टी ती गोड वाटते व ती विमुख झाल्यावर श्रीमंताला दुःखात लोटते. लक्ष्मीमुळे सुख प्राप्त होईल असे वाटते पण ती केवळ दुःखाला कारणीभूत होते. हे राजा हीच्यामध्ये जे सुख मानतात ते केवळ मूर्ख असतात. राजा म्हणाला, माझ्या मांडीवर तिने खेळावे एवढीच माझी इच्छा आहे असे म्हणून राजाने भगवान विष्णूचे पाय धरले आणि त्यांनी आपला निर्धार सात्विक असून माझे मनोरथ पूर्ण करण्याची विनंती केली.

विष्णुकडून वरप्राप्ती -

राजाचे हे मनोगत जाणून भगवान विष्णूने एक महाळुंगाचे फळ (मातुलिंग) पूर्णत्वाने दिले. आणि या मातुलिंगातून कन्या लक्ष्मी तुला प्राप्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे राजाने ते मातुलिंग दोन भाग करून पाहिले तर त्यामध्ये अति सुंदर कन्यारत्न दिसले. ते पाहून राजाच्या मनात ममता प्राप्त झाली. व ही माझी मुलगी म्हणून आनंद झाला. पद्माक्ष राजाच्या घरी जन्म झाला. म्हणून तिचे पद्मावती असे नाव ठेविले. तिचे रूप पाहूनी राजा उल्हासित झाला. जी मातुलिंगातून जन्मली ती दोन्ही शकले एक होताच ते मातुलिंग शक्तीच्या (देवी) हाती पडल्यावर तिलाच सप्तशती म्हणतात. 



पद्मावती विवाह -

ती रूपवान असणारी कन्या हळूहळू वाढू लागली तसतसे ती अधिक सुंदर दिसू लागली. तिला पाहून अनेक राजपुत्र भाळले. आता कन्या स्वयंवरायोग्य झाली. म्हणून राजाने तिचा विवाह करण्याचे ठरविले. तिच्या सौंदर्याची ख्याति त्रिभुवनात पसरली. त्यामुळे त्या स्वयंवरामध्ये ऋषीगण येवून आपली योग्यता प्रकट करू लागले. तसेच देव, दानव, किन्नर, गंधर्व, सर्व राजेलोक हजर झाले. त्यामध्ये दैत्यसमुदायसुध्दा बळेच सामील झाला. तिचे स्वरूप पाहून तत्पर राक्षसहि आले. त्यामुळे अतिशय गोंधळ उडाला. ते पाहून राजाने सर्वांना गप्प बसावयास सांगितले व सांगितले की, मी एक कठीण पण केला आहे तो म्हणजे, आकाशाची सुनीळ उटी ज्याच्या अंगावर  सुंदर शोभेल त्यालाच ही रूपवान कन्या वरमाला घालील.

राजाचा हा अशक्य असणारा पण ऐकून सगळे सुर-असुर संतापले आणि त्या कन्येचे हरण करण्यासाठी तयार झाले. सर्व नरवीर पुढे सरसावले. राक्षस, यक्ष तिला धरण्यासाठी निघाले. ते पाहून पद्माक्षराजाला क्रोध आला. त्याने बाणाने संधान साधून शत्रूसमुदायास हैराण केले. निशाचरांना ग्रासले. राजांनी सर्वांना पांगवले. सुरवर आकाशात निघून गेले. दैत्य आणि पद्माक्ष यांचे दुर्धर युध्द जुंपले. दोन्हीकडून बाणांचा वर्षाव होत होता. तेव्हा दैत्यालाही पळविले. परंतू राजाला अतितीक्ष्ण बाण लागल्यामुळे त्याने रणांगणातच आपला प्राण सोडला.

पद्मावतीची अग्नीत उडी आणि बाहेर आगमन -

रणांगणावर सर्व युध्दाची समाप्ती झाल्यावर आपले कोणी हरण करू नये म्हणून पद्मावतीने अग्निकुंडात उडी घेतली. नवरी तर मिळाली नाहीच परंतु राक्षस अत्यंत क्षुब्ध होवून त्यांनी तेथील घरे पाडली व सर्व नगर उध्वस्त केले. सुरवर यांना पळवून लावून राजाने आपला प्राण सोडला. राणीनेही सहगमन केले. अशा प्रकारे लक्ष्मीमुळे श्रीमंतांना विघ्न प्राप्त झाले. ज्यांनी पालन केले ते प्राणाला मुकले, ज्यांनी अभिलाषा केली ते रणांगणी पडले. राहिलेले रडत घरी गेले. लक्ष्मीने असे सर्वांचे जीवन संपविले. मग ती अग्निकुंडातून बाहेर आली व  कुंडाच्या तीरावर बसली.

पद्मावतीला नेण्याचा रावणाचा प्रयत्न -

रावण विमानामधून आकाशमार्गे जात असता त्याचा प्रधान रावणाला म्हणाला, जिच्यासाठी हे रणकंदन झाले तीच ही नवरी मुलगी आहे. सुरअसुरांनी हिला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिने अग्निकुंडात उडी मारली होती. तीच ही बाहेर निघून अग्निकुंडाच्या तीरावर बसली आहे. रावणाने तिला पाहिले आणि तिच्या सौंदर्यांने तो तिच्याकडे आकृष्ट झाला व तिला धरण्यासाठी धावला. आणि त्या नवरीमुलीने पुन्हा अग्निप्रवेश केला. तेव्हा रावण हसून म्हणाला, तू जरी  अग्नि मध्ये लपली तरी सुरवरांना तू मिळणार नाही परंतु मी तुला शोधून काढीन. 



अग्निकुंडात पंचरत्न प्राप्ती-

रावणाने मोठ्या कष्टाने तो अग्निकुंड विझविला आणि पद्मावतीला शोधू लागला परंतु ती सापडेना. त्याऐवजी तेथे पंचरत्नेच सापडेना. त्याऐवजी तेथे पंचरत्नेच सापडली. त्या रत्नांचे तेजापुढे सूर्यसुध्दा लपून जाईल अशी ती महातेजाचा गाभाच होती. ती रत्ने पाहून रावण विस्मित झाला. स्वतःला सावरून त्यांनी त्या दिव्यरत्नाला मोठ्या सायासाने घेवून विमानात चढून लंकेत आला. ती दिव्यरत्ने मंदोदरीस भेट देण्यासाठी ती पेटी देव्हाÚयात ठेवली आणि स्वतः शयनगृहात गेला. आणि आपल्या पत्नीला गुहî गोष्ट सांगू लागला. मी आणलेली दिव्यरत्ने तुझ्या कंठात व मुकुटात अगदी शोभून दिसतील. देवघरात ती पेटी ठेवली आहे. तेव्हा तिने मोठ्या आनंदाने ती पेटी उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ती अजिबात उचलेना. रावण उपहासाने हसला आणि सरक मी उचलतो असे म्हणून उचलू लागला. पण पेटी हलेना. तेव्हा आपल्या वीस हातांनी उचलण्याचा त्याने प्रयत्न केला. पण सर्व शक्तीपणाला लावूनहि पेटी जरासुध्दा हलेना. तेव्हा रावणाचे चित्त चळले. त्याची शक्ती क्षीण झाली. तेव्हा तेथे प्रधान व सर्व आप्त झाले आणि ते म्हणाले, पेटीमध्ये कुठला अपूर्व लाभ आहे की धन आहे ते आपण उघडून पाहू.

रत्नपेटीत तेजस्वी कन्यारत्न -

ती पेटी उघडताच सगळयांचे डोळे तेजाने दिपून गेले. रत्नासारखी सुंदर कन्यारत्न पाहून सगळयांना शंका आली. तेव्हा रावणाने सावधपणे या कन्येचा पूर्ववृत्तांत सांगितला. त्यावेळी मंदोदरी ते ऐकून म्हणाली, ही दुष्ट असून आपलाही कुळघात करेल. हिला येथे कशासाठी आणली. हिच्यामुळे माता-पिता व सर्वांचा नाश झाला.

रत्नपेटी भूमीत पुरावी -

मंदोदरी भविष्याचा विचार सांगू लागली. हिला इथे ठेवले तर आपल्या संपूर्ण कुळाचा नाश करील तेव्हा हिला त्वरीत दुसऱ्या राज्यात घेवून जावे. कारण हिला मारण्याचा प्रयत्न केला तर ती नृसिंहासारखी पेटीतून बाहेर येवून अनर्थ करेल. रावणाला ते पटले त्याने विमान आणून त्यात बसवून तिला भूमीतून पुरण्यास सांगितले. ती ज्याला सापडेल तो तिचा सांभाळ करेल आणि ती सुखाने नांदेल.


पेटीतून भविष्यवाणी-

पेटी विमानात ठेवताच आतून ध्वनी उमटला मी पुन्हा लंकेत येणार आहे. आणि सर्व राक्षसांचा संहार करीन. रावणाने माझी अपेक्षा केल्यास त्याचे मरण अटळ आहे. ही वाणी ऐकून रावण दचकला. त्यांनी दूतांना पेटी न्यायला सांगितली. विमानात नेऊन विदेह नगरीच्या सीमेवर उचलून ठेवली व तेथे मातीत पुरून परत निघून गेले.

नांगरताना ब्राह्मणाला पेटीची प्राप्ती -

ती भूमी जनकाने एका ब्राह्मणाला शेत पिकविण्यासाठी दिली होती. त्याने मुहूर्त पाहून शेतातील जमिनीवर नांगर फिरवायला सुरूवात केली. पहिल्याच पेरणीत नांगराच्या फाळाला पेटी लागली. त्याचे मित्र म्हणाले, तुझे भाग्य थोर तुला धनलाभ झाला. पण बाह्मण म्हणाला ही जमीन मला दान दिली आहे. परंतु या जमिनीतील मालमत्तेवर राजांचाच अधिकार आहे. असे म्हणून त्यांनी ती पेटी राजाला नेवून दिली. राजा म्हणाला, तू ते धन घे. पण ब्राह्मण ऐकेना. त्या ब्राह्मणाला द्रव्य लोभ नव्हता. मग सर्व साधूंनी सांगितले की, या पेटीत काय आहे ते आपण पाहू. ती पेटी उघडताच एक सौंदर्यांची तेजःपुंज कन्या पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तिचे सौंदर्य पाहून सर्वजन भारावून गेले.

जनकाकडून कन्येचा स्विकार -

तिचे लावण्य पाहून जनकाने तिला उचलून घेतले. हे माझे कन्यारत्न आहे असे म्हणाला. त्यावेळी आकाशातून मंगलवाद्यांचा गजर झाला. सर्व सभा जयजयकार करू लागली. ऋषीमुनी शांतिपाठ म्हणू लागले. वेदघोषही केला. त्याकन्येला जनकराजाने सांभाळले म्हणून तिला जनकात्मजा म्हणाले, पृथ्वीने गर्भात ठेवली म्हणून धरणिजा म्हणाले. परंतु ती अयोनिजा जगदंबा आहे. नांगराच्या फाळाला लागली म्हणून सीता जन्माला आली.

अशी ही सीतेच्या जन्मकथाची पूर्वस्थिती नारदमुनींनी मूळ स्कंधपुराणाकडून सांगितली. त्यातील कालिकाखंडामध्ये याचे संपूर्ण निरूपण वर्णन केले आहे. असे अहिल्येचा पुत्र व जनकराजाचा पुरोहित जो शतानंदस्वामी याने समर्थपणे वृत्तांत सांगितला.

कृष्णार्पणमस्तु

89 views0 comments
bottom of page